Vegetable Farming : एकीच्या बळावर फुललं शिवार...

मानवत (जि. परभणी) येथील चौधरी बंधू तीस एकर शेतीमध्ये बारमाही भाजीपाला, फळ पिकांचे उत्पादन घेतात.
Vegetable Farming
Vegetable FarmingAgrowon

मानवत (जि. परभणी) येथील चौधरी बंधू तीस एकर शेतीमध्ये बारमाही भाजीपाला, फळ पिकांचे उत्पादन घेतात.

एकीच्या बळावर भाजीपाला शेतीतून चौधरी कुटुंबाने आर्थिक समृद्धी आणली आहे. मोठ्या क्षेत्रावर भाजीपाल्याचे उत्पादन घेणारे ‘मास्टर शेतकरी’ म्हणून चौधरींची ओळख तयार झाली आहे.

दर्जेदार उत्पादनामुळे व्यापारी थेट शेतातून भाजीपाला खरेदी करतात. या शेतीमुळे महिला मजुरांना बारमाही रोजगाराची हमी मिळाली आहे.

Vegetable Farming
एकीच्या बळावर मावलगाव होतेय सुजलाम सुफलाम 

कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्गावरील परभणी जिल्ह्यातील मानवत हे तालुक्याचे ठिकाण. हे गाव शेतीमाल तसेच कापडाची प्रसिद्ध बाजारपेठ आहे.

मानवत येथील सोपानराव सखारामजी चौधरी यांच्या कुटुंबाचा भाजीपाला उत्पादनासह विक्रीचा पारंपरिक व्यवसाय आहे. वडिलोपार्जित जमिनीतून सोपानरावांच्या वाट्याला २० एकर जमीन आली. त्या वेळी सिंचनासाठी एक विहीर होती.

तेव्हा बारमाही ४ ते ५ एकरांवर विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन होत असे. शहरातील आठवडी बाजारात भाजीपाल्याची विक्री केली जायची.

Vegetable Farming
Flower Farming : फुलशेतीच्या बळावर फुलवला संसार

उर्वरित क्षेत्रावर मूग, कापूस, ज्वारी, गहू आदी पिकांची लागवड असायची. सोपानरावांना रमेश, व्यंकटेश, बाळाभाऊ ही मुले आहेत.

सध्या त्यांच्या संयुक्त कुटुंबात १७ सदस्य आहेत. भाजीपाला तसेच हंगामी पिकांच्या उत्पन्नातून बचत करत शिल्लक रकमेतून त्यांनी टप्प्याटप्प्याने जमीन खरेदी केली. सध्या चौधरी यांची मानवत शिवारात ८० एकर आणि मानोली शिवारात ३० एकर अशी एकूण ११० एकर शेती आहे.

सिंचनासाठी ७ विहिरी आणि १० कूपनलिका आहेत. भाजीपाला, फळे पिके तसेच हंगामी पिकांच्या उत्पादनातून चौधरी यांना खर्च वजा जाता एकरी ९० हजार ते एक लाखांपर्यंत उत्पन्न मिळते.

शेती उत्पन्नातून चौधरी बंधूंनी जमीन खरेदी केली तसेच कुटुंबासाठी दोन मजली पक्के घर बांधले आहे.

सिंचन स्रोतांचे बळकटीकरण ः
चौधरी यांची सहा किलोमीटरवरील झरी (ता. पाथरी) येथे जमीन खरेदी करून तेथे विहीर खोदली. तब्बल सहा किलोमीटर पाइपलाइन टाकून मानवत शिवारातील शेतामध्ये पाणी आणले आहे.

भाजीपाला आणि फळपिकांना ठिबक सिंचन प्रणालीद्वारे आणि अन्य पिकांना तुषार सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. काटेकोर पाणी वापरावर भर दिला आहे.

थेट शेतातून विक्री व्यवस्था ः
भाजीपाला, कलिंगड, केळीची थेट शेतातून विक्री होते. हव्या त्या प्रमाणात शेतीमाल एकाच ठिकाणी मिळत असल्यामुळे व्यापारी थेट शेतात येऊन खरेदी करतात.

व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार भाजीपाल्याची काढणी केली जाते. स्वच्छता, प्रतवारी, पॅकिंग करून शेतावर वजन करून विक्री केली जाते. थेट विक्रीमुळे वाहतूक खर्चात बचत होते.

व्यापाऱ्यांच्या खरेदीनंतर शिल्लक भाजीपाल्याची चौधरी बंधू स्वतःच्या वाहनाद्वारे स्थानिक मार्केटमध्ये विक्री करतात.

Vegetable Farming
लोकसहभागाच्या बळावर मुळेगाव बनले स्मार्टग्राम

नियोजनानुसार कामाची विभागणी ः
एकमेकांबद्दल आदर, आपुलकीसह कामांचे नियोजन आणि अंमलबजावणीमुळे चौधरी बंधूंनी शेती व्यवसायात प्रगती केली आहे.

वैविध्यपूर्ण पीक पद्धतीतून उत्पन्नाचे स्रोत तयार केले. आवडीनुसार कुटुंबातील सदस्यांमध्ये कामाची विभागणी आणि जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे.

रमेश आणि बाळाभाऊ यांच्याकडे शेती, पीक व्यवस्थापन, काढणी, विक्री आदी कामांची जबाबदारी आहे. सोपानराव आणि व्यंकटेश यांच्याकडे कृषी सेवा केंद्राची जबाबदारी आहे.

रमेश यांच्या पत्नी सौ. आश्‍विनी तसेच वहिनी सौ. सीमा, सौ. राधा यांची देखील शेती नियोजनात चांगली मदत होते.

जमा खर्चाच्या नोंदी ः
चौधरी बंधू चर्चा करून दरवर्षी विविध पिकांचे नियोजन करतात. बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा,

तसेच मजुरी आदी बाबींवर होणारा खर्च तसेच शेतीमाल विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या नोंदी ठेवल्या जातात.

तपशीलवार नोंदीमुळे दरवर्षीच्या जमा खर्चाचा ताळेबंद तयार होतो. नफा-नुकसान समजते, त्यानुसार पुढील वर्षीचे नियोजन केले जाते.

बारा महिने रोजगाराची हमी ः
चौधरी यांच्याकडे आठ सालगडी आहेत. भाजीपाला लागवड ते काढणीपर्यंतच्या विविध कामांसाठी बारमाही २५ महिला मजूर दररोज रोजंदारीवर कामाला असतात.

अनेक मजूर महिला आठवड्याची सुट्टी न घेता कामावर असतात. केवळ मजुरीवर दररोज सरासरी दहा हजार रुपये खर्च होतो.

शेतीकामासाठी दोन बैलजोड्या, एक ट्रॅक्टर आहे. शेतीमाल वाहतुकीसाठी एक वाहन आहे.


पीक नियोजन ः
१) एकूण जमिनीपैकी दरवर्षी २५ ते ३० एकरावर विविध भाजीपाला पिकांची लागवड. मिरची, टोमॅटो, कांदा, काकडी, दुधी भोपळा लागवडीवर भर.


२) मिरची ३ ते ५ एकर, कांदा ७ ते ८ एकर, खरबूज ६ एकर, टरबूज ८ एकरांमध्ये लागवड.


३) केळी ३ ते ४ एकर, कापूस २५ एकर, सोयाबीन ६० एकर, हरभरा ३० एकर. उर्वरित क्षेत्रावर मूग, करडई, गहू आदी पिकांची लागवड.

मिरचीमध्ये हातखंडा ः
दरवर्षी मिरचीचे लागवड क्षेत्र ३ ते ५ एकर असते. खरिपातील मूग काढणीनंतर जमीन तयार करून सप्टेंबर महिन्यात दोन ओळींतील अंतर ४ फूट आणि दोन झाडांमध्ये सव्वा फूट अंतर ठेवून लागवड केली जात होती.

परंतु आंतरमशागतीसाठी अडचण येऊ लागल्याने यंदा दोन ओळींमध्ये ५ फूट आणि दोन झाडांमध्ये सव्वा फूट अंतर ठेवले आहे.

बाजारपेठेच्या मागणीनुसार योग्य जातींची निवड, एकात्मिक पद्धतीने कीड, रोगनियंत्रण, वाढीच्या टप्प्यानुसार योग्य खतांचा वापर केल्याने दर्जेदार उत्पादन मिळते. नोव्हेंबर ते एप्रिल असा हंगाम असतो. एकरी २५ ते २७ टन उत्पादन मिळते.

रब्बी कांदा उत्पादन ः
गेल्या चार वर्षांपासून कांदा लागवड क्षेत्राचा विस्तार केला आहे. दरवर्षी रब्बी हंगामात ७ ते ८ एकरावर लागवड असते.

पहिल्या टप्प्यात सप्टेंबरमध्ये तीन ते चार एकर, दुसऱ्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये ३ ते ४ एकरांवर लागवड केली जाते. जमीन तयार झाल्यानंतर बियाणे फेकून लागवड होते.

योग्य प्रकारे खते, पाणी आणि कीड, रोग नियंत्रणातून दर्जेदार उत्पादनावर चौधरी यांचा भर आहे. एकरी २५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते.

केळी लागवड ः


गेल्या सहा वर्षांपासून चौधरी बंधू उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड करत आहेत. साधारणपणे जुलै, ऑगस्ट महिन्यांत रोपांची लागवड पाच बाय पाच फूट अंतरावर केली जाते.

योग्य खत, कीड, रोगनियंत्रण आणि पाणी व्यवस्थापनातून एकरी ३५ टनांची सरासरी मिळते.

वेलवर्गीय भाजीपाला नियोजन ः


१) काकडीची दरवर्षी दोन एकरांवर चार बाय सव्वा फूट अंतरावर लागवड. बांबू साह्याने तार बांधून वेलीस आधार. फळमाशी नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर.

ठिबक सिंचनाद्वारे पाणी नियोजन. एकरी २५० ते ३०० क्विंटल उत्पादन.


२) दुधी भोपळ्याची दरवर्षी एक एकरावर लागवड. सहा बाय दीड फूट अंतरावर लागवड. एकरी १५० ते २०० क्विंटल उत्पादन.

खरबूज, टरबूज लागवड ः
१) बाजारातील मागणीचा कालावधी लक्षात घेऊन दरवर्षी खरबूज ६ एकर आणि टरबुजाची ८ एकरांवर लागवड.


२) योग्य जात, ठिबक सिंचन, एकात्मिक पीक व्यवस्थापन, मल्चिंग पेपरचा वापरातून दर्जेदार उत्पादनावर भर.


३) गतवर्षी खरबुजाला प्रति किलो १८ रुपये, टरबुजाला ९ रुपये जागेवर दर. एकरी १६ ते १८ टन उत्पादनाची सरासरी.

संपर्क ः रमेश चौधरी ः९९६०००८७०५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com