Vegetable Crop Management : शेतकरी नियोजन पीक : भाजीपाला

भाजीपाला लागवडीतून वर्षभर घरगुती खर्चासाठी उत्पन्न मिळते. त्यातून घरखर्च आणि शेतीकामांचा खर्च निघण्यास मदत होते.
Aubergine
AubergineAgrowon

Buldhana : बुलडाणा जिल्ह्यातील लोणी गवळी (ता. मेहकर) येथील शरद भीमराव जाधव यांची ४ एकर शेती आहे. त्यात १ एकरामध्ये भाजीपाला पिकांची लागवड (Vegetable Crop Cultivation) केली जाते. वर्षभर विविध भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतले जाते.

बाजारपेठेचा अंदाज घेऊन हंगामानुसार पिकांची निवड केली जाते. फेब्रुवारीमध्ये दोडका (Chinese okra) , एप्रिलमध्ये कारले (Bitter melon), मे महिन्यात पत्ताकोबी (Cabbage) , जूनमध्ये वांगी, तर हळद (Turmeric) पिकामध्ये मिरचीची लागवड केली जाते.

भाजीपाला लागवडीतून वर्षभर घरगुती खर्चासाठी उत्पन्न मिळते. त्यातून घरखर्च आणि शेतीकामांचा खर्च निघण्यास मदत होते. सद्यःस्थितीत वांग्याची तोड सुरु असून पत्ताकोबीचा हंगाम आटोपला आहे.

शेतकरी ः शरद भीमराव जाधव

गाव ः लोणी गवळी, ता. मेहकर, जि. बुलडाणा

एकूण क्षेत्र ः ४ एकर

भाजीपाला लागवड ः १ एकर

Aubergine
Vegetable Market : गटाराकडेला बसूनच भाजीपाला विकण्याची वेळ

वांगी लागवड नियोजन ः (Aubergine Cultivation)

१) वांगी पिकाची अर्धा एकर क्षेत्रावर लागवड करण्याचे नियोजन होते. त्यानुसार लागवडीच्या दीड महिन्यापूर्वी गादीवाफ्यावर रोपवाटिका तयार केली.

२) रोपांच्या पुनर्लागवडीपूर्वी लागवडीपूर्वी जून महिन्यात शेताची नांगरट करून घेतली. त्यानंतर चांगले कुजलेले शेणखत २ ट्रॉली अर्धा एकर प्रमाणे दिले.

३) लागवडीसाठी ५ बाय ३ फूट अंतराचे बेड तयार केले. बेडवर सिंचनासाठी ठिबकच्या नळ्या अंथरून घेतल्या.

४) दीड महिने वयाची रोपे झाल्यानंतर त्यांची पुनर्लागवड केली.

व्यवस्थापनातील बाबी ः

१) साधारण ३ महिन्यांच्या अंतराने छाटणीचे नियोजन केली जाते. त्यानुसार सप्टेंबर महिन्यात १ आणि डिसेंबर महिन्यात १ छाटणी केली आहे.

२) मागील काही दिवसांपूर्वी हलकी छाटणी करून घेतली. आणि पिकास १०ः२६ः२६ खताची मात्रा दिली.

३) सध्या पीक चांगले बहरले आहे. छाटणी केल्यामुळे आणि खतमात्रा दिल्यामुळे मालाची प्रत सुधारली आहे.

४) आवश्यकतेनुसार निंदणी करून तण व्यवस्थापन केले जाते.

सिंचन व्यवस्थापन ः

१) सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे पाण्याची बचत होते.

२) थंडीच्या काळात फळांची चांगली वाढ होण्यासाठी विशेष काळजी घेतली जाते. सिंचन आणि खत व्यवस्थापनावर भर दिला जातो.

३) सकाळच्या वेळी तीन दिवसांतून एक वेळ १ तास ठिबक संच चालू ठेवला जातो.

कीड-रोग व्यवस्थापन ः

१) ) मागील आठवड्यात सकाळच्या वेळी धुके पडत होते. त्यामुळे पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. धुक्यामुळे फूलगळ होण्याची शक्यता असते. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बुरशीनाशकांची फवारणी घेतली. तसेच सिंचनावर भर दिला.

२) छाटणीवेळी झाडावर रोगग्रस्त फांद्या काढून टाकल्या. त्यांची योग्य विल्हेवाट लावली.

३) थंडीच्या काळात १५ दिवसांतून एकदा रासायनिक कीटकनाशकांची आवश्यकतेनुसार फवारणी घेतली.

४) पिकाचे कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी सातत्याने निरिक्षण केले जाते. वांगी पिकावर आतापर्यंत शेंडा खाणारी आणि फळ पोखरणाऱ्या अळीचा मुख्यतः जास्त प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यासाठी रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली आहे.

काढणी आणि उत्पादन ः

१) सध्या बाजारात वांगी दरात सुधारणा झाली आहे. त्यामुळे दर ८ दिवसांच्या अंतराने फळांची तोड केली जाते.

२) एका तोड्यामध्ये साधारण अडीच ते ३ क्विंटल उत्पादन मिळते.

३) बाजारातील दरांच्या चढ-उताराचा अंदाज घेऊन तोडणी करण्यावर भर दिला जातो.

४) उत्पादित सर्व मालाची मेहकर, डोणगाव येथील स्थानिक बाजारात ठोक विक्री केली जाते.

५) वांगी तोडल्यानंतर त्यांची प्रतवारी केली जाते. त्यानंतर व्यवस्थित क्रेटमध्ये भरून माल विक्रीसाठी पाठवला जातो. प्रतवारी केल्यामुळे बाजारात चांगला दर मिळण्यास मदत होते.

६) आतापर्यंत सरासरी १०० ते ८०० रुपये प्रति क्रेट इतका दर मिळाला आहे.

Aubergine
Vegetable Farming : ‘कीटकनाशके उर्वरित अंशमुक्त भाजीपाला प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा’

दोडका लागवड ः

१) अर्धा एकरातील पत्ता कोबीची काढणी जानेवारी महिन्याच्या शेवटी पूर्ण झाली आहे. त्या क्षेत्रामध्ये उन्हाळी हंगामात दोडका लागवडीचे नियोजन आहे.

२) त्यानुसार शेताची नांगरणी, वखरणी करून पूर्वमशागत केली आहे.

३) लागवडीसाठी ६ बाय ३ फुटांचे बेड करून त्यावर ठिबकच्या नळ्या अंथरल्या आहेत.

४) बेडवर चांगले कुजलेले शेणखत व १०ः२६ः२६ या रासायनिक खतांचा बेसला डोस दिला आहे.

५) साधारण १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान बियाण्यांची टोकण करण्याचे नियोजन आहे.

६) त्यासाठी सव्वा फुटावर एका बियाणे या पद्धतीने बियाण्यांची टोकण केली जाईल. उगवणीनंतर ३ फुटांवर १ रोप याप्रमाणे विरळणी केली जाईल.

७) वेलींना आधार देण्यासाठी बांबू व तारांचा वापर करून मांडव तयार केले जातात.

८) वेल उगवणीपर्यंत एक दिवसाआड १५ मिनिटे ठिबक संच चालू ठेवला जाईल.

९) लागवडीपासून साधारण ४५ ते ५० दिवसांनी पहिला तोडा सुरू होतो.

शरद जाधव, ९७६४६०२१५५ (शब्दांकन ः गोपाल हागे)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com