Flower Farming
Flower FarmingAgrowon

Flower Farming : फुलशेतीच्या बळावर फुलवला संसार

पुणे जिल्ह्यातील कुसूर (ता. जुन्नर) येथील अरुण आणि विमल या लांडगे दांपत्याकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. तरीही शेतातच वास्तव्य करून एकमेकांच्या साथीने परिश्रम करीत शेवंती, बिजली व ॲस्टर या फुलांच्या शेतीतून आपला संसार फुलविला आहे. त्यातून कौटुंबिक व शेतीचे अर्थकारण उंचावले आहे.
Published on

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका भाजीपाला शेतीसाठी (Vegetable Farming) प्रसिद्ध आहे. या भागातील बहुतांश शेतीमाल (Agriculture Produce) मुंबई व पुणे बाजारपेठेत नियमित जात असतो. तालुक्यातील कुसूर येथील अरुण आणि विमल या लांडगे दांपत्याची सुमारे सव्वापाच एकर शेती आहे. त्यात सोयाबीन (Soybean) तसेच अन्य हंगामी पिके ते घेतातच. मात्र शेतीचे खरे अर्थकारण त्यांनी फुलशेतीतून (Flower Farming) उभे केले आहे. शेवंती, बिजली व ॲस्टर अशी तीन पिके ते घेतात. अन्य कोणत्याही पिकांपेक्षा ही पिके वर्षभरातील बहुतांश काळ ताजे उत्पन्न देत राहतात. शिवाय जोखीमदेखील कमी असते, असे अरुण यांचे म्हणणे आहे.

Flower Farming
Flower Farming : फुलांच्या शेतीतून अकोळनेरला मिळाली ओळख

फुलशेतीची पद्धत

गणेशोत्सव, दिवाळी, दसरा आणि मार्गशीर्ष महिना या काळात उत्पादन मिळत राहील अशा नियोजनातून लागवडीचे नियोजन केले जाते. शेवंतीची मेअखेरीस, तर बिजली व ॲस्टर यांची लागवड ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात होते. शेवंतीचे काही वाण वर्षभर देखील उत्पादन देत राहतात. फक्त त्यांची निगा त्याप्रमाणे चांगली करावी लागते असे अरुण सांगतात. उर्वरित दोन फुलपिके फेब्रुवारीपर्यंत उत्पादन देत राहतात. दोन बोअर असून त्या आधारे पाणी व्यवस्थापन केले जाते.

Flower Farming
Marigold Flower : झेंडू फुलाचा असाही सन्मान

ॲस्टररबाबत बोलायचे तर एक एकर क्षेत्र त्यासाठी निवडले जाते. त्याच्या प्रति रोपापासून सुमारे २५ फुले मिळतात. दर आठवड्याला तोडा सुरू असतो. ॲस्टर फुलाच्या शेतीत कष्ट भरपूर आहेत. लागवड, काढणीपासून ते जुड्या बांधणीपर्यंत मनुष्यबळ भरपूर लागते. लांडगे दांपत्याकडे ते कमी असल्याने ठरावीक पैसे देऊन एका व्यक्तीकडून ही शेती करवून घेतली जाते. विक्रीसाठी ॲस्टर व बिजली यांची पाच फुलांची जुडी तयार केली जाते. बारदानामध्ये पाचशे जुड्यांचा बंच बांधला जातो. दादर (मुंबई) येथील फुलबाजारात ही फुले हुंडेकऱ्यांमार्फंत पाठविली जातात.

Flower Farming
Flower Farming : शेतकऱ्यांनी फळबाग, फुलशेतीकडे वळावे

...असे मिळतात दर

मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या पूजा सर्वत्र केल्या जातात. या दरम्यान ॲस्टरला मोठी मागणी वाढलेली असते. हंगाम सुरू होण्याआधी किंवा त्यावेळी १०० जुडीला एकहजार ते बाराशे रुपये असा सर्वाधिक दर मिळतो. हंगामातील सरासरी दर ३०० रुपये असतो. संपूर्ण हंगामात सुमारे ५० हजार ते ६० हजार फुलांपर्यंत उत्पादन होत असावे असा अरुण यांचा अंदाज आहे.

उत्पादन खर्च मजुरीसह एक लाख रुपयांपर्यंत येतो. शेवंतीचे उत्पादन दसरा दिवाळीच्या नियोजनानुसार होते. यातील निवडलेल्या वाणाच्या फुलाला जास्त आणि जाड पाकळ्या असल्याने झेंडूसारखे ते मोठे दिसते. वजनालाही जास्त असल्याने त्यास बाजारपेठेत चांगली मागणी आहे. त्यास २०० ते २५० रुपये प्रति किलो दर मिळतो. बिजलीलाही प्रति शेकडा जुडीस २५० ते ३०० रुपये दर मिळतो. प्रत्येक फूल प्रति हंगामात किमान ६० हजार ते कमाल एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवून देते. त्यातून ताजे उत्पन्न सुरू राहते.

फुलशेतीतून प्रगती

याच फुलशेतीच्या जोरावर मुलीला संगणक अभियंता करणे, मुलाला चांगले शिक्षण देणे, घर बांधणे शक्य झाल्याचे अरुण सांगतात. फुलशेतीचे मुख्य व्यवस्थापन पत्नी विमल पाहतात. कोरोना काळात विमल यांना या रोगाची लागण झाली. एक महिन्याच्या उपचारांनंतर त्या मृत्यूच्या दारातून परत आल्या. या काळात मुलगा, पती आणि नातेवाइकांनी केलेले प्रयत्न या आठवणी सांगताना त्यांचा कंठ दाटून आला.

ॲस्टरची पुणे बाजारपेठ

पुणे बाजार समितीमध्ये ॲस्टर फुलांची आळंदी, धोंडकरवाडी (सासवड) आणि नगर जिल्ह्यांतून आवक होते. यामध्ये जुड्या आणि सुट्या (लूज) फुलांचा समावेश असतो. सध्या चार फुलांच्या जुडीला ८ ते १५ रुपये, तर सुट्या फुलांना प्रति किलो ५० ते ८० रुपये दर असल्याचे फुलबाजार अडते असोसिएशनचे समन्वयक सागर भोसले यांनी सांगितले.

अरुण लांडगे, ९९७००४२४७८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com