Sericulture
SericultureAgrowon

Sericulture : धाडस अन् अभ्यासातून रेशीम शेतीत मिळवली मास्टरी

Silk Farming : पुणे येथे इंजिनिअरिंग क्षेत्रातील कंपनीतील नोकरी सोडून महेश झोडगे (रा. शिंगवे पारगाव, जि. पुणे) पूर्णवेळ शेतीत उतरले. मित्रांच्या प्रेरणेतून त्यांनी शेतीला पूरक रेशीम शेती सुरू केली.
Published on

Agrowon Success Story : पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील शिंगवे पारगाव येथील महेश बाळासाहेब झोडगे यांची नऊ एकर शेती आहे. त्यात कांदा, ऊस, टोमॅटो व अन्य भाजीपाला शेती ते करतात. त्यांनी ‘मेकॅनिकल डिप्लोमा’ घेतला आहे. पुणे येथील इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीत ते नोकरीस लागले.

रोज ते जाऊन येऊन करायचे. त्यांच्या तरुण वयातच आईचे निधन झाल्याचे दुःख त्यांना पचवावे लागले. नोकरीतील ओढाताण, वडिलांवर असलेला शेतीचा पूर्ण भार या गोष्टी पाहता नोकरी सोडण्याचा त्यांनी विचार केला आणि विचार प्रत्यक्ष अमलात आणला देखील.

शेती व पूरक व्यवसाय

महेश आता पूर्णवेळ शेती पाहू लागले. मात्र पारंपारिक पिकांना पूरक उद्योग करण्याचा विचार ते करीत होते. गावातच रवी कासार आणि संतोष गोरडे यांचा रेशीम शेतीचा व्यवसाय आणि त्यातील अनुभव त्यांच्या पाहण्यात आला. दोघांकडून प्रेरणा मिळाली. पुणे येथील रेशीम संचालनालयातील अधिकारी संजय फुले,प्रमोद शिरसाट व डॉ. कविता देशपांडे यांचे संपूर्ण मार्गदर्शन मिळाले.

पूर्ण अभ्यास करून महेश तीन वर्षांपूर्वी रेशीम शेतीत उतरले. घरची आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने पुरेसे भांडवल नव्हते. मग शेती तारण ठेऊन गावातील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था तसेच महाराष्ट्र बॅक यांच्याकडून सुमारे प्रत्येकी पाच ते साडेपाच लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यातून ८० बाय ३० फूट आकाराची दोन रेशीम संगोपन शेडस आकाराला आली. शेजारी एक एकर तुतीची लागवड केली.

Sericulture
Sericulture Farming : काळानुसार रेशीम शेतीत केले आवश्यक बदल

रेशीम शेतीतील प्रगती

कष्ट, सातत्य व स्वअभ्यासातून महेश यांनी तीन वर्षांच्या अनुभवातून रेशीम शेतीत कौशल्य संपादन केले आहे. आजमितीला तुती तीन एकर व दोन शेडस असल्याने दर महिन्याला एक तर वर्षभरात सुमारे ११ ते १२ बॅचेस घेण्यापर्यंत त्यांनी हातखंडा तयार केला आहे. प्रति बॅच २५० ते ३०० अंडीपुंजांची असते.

रेशीम शेतीत सुरवातीपासून ते बॅचच्या अखेरपर्यंत पाला व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे ते सांगतात. तोंडातून पिवळा द्राव स्रवणे व अळ्या काळ्या पडणे या दोन रोगांच्या प्रादुर्भावापासून अळ्यांना रोखणेही गरजेचे असते. त्यादृष्टीने महेश दक्ष असतात. याशिवाय अळ्या मोठ्या होत असताना प्रोटिन पावडर, विजेता पावडर, निर्जंतुकीकरण या अनुषंगानेही ते व्यवस्थापन करतात.

उत्पादन व विक्री व्यवस्था

प्रति २५० अंडीपुंजांपासून २२०, २४० ते कमाल २५० किलो रेशीम कोष उत्पादनही महेश घेतात. बारामती, बीड व जालना या तीन बाजारात ते विक्री करतात. त्यातही बीड येथे व्यापारी अधिक असतात. त्यामुळे तेथे विक्रीला अधिक प्राधान्य असते. गावात सुमारे २७ पर्यंत रेशीम उत्पादक तयार झाले असून सुमारे ५० एकर क्षेत्रावर तुतीची लागवड आहे. त्यामुळे सर्व शेतकरी एकत्रितपणे आपले कोष एकाच वाहनातून घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे वाहन भाडे देखील परवडते.

अलीकडील काळाच्या अनुषंगाने बोलायचे तर सर्वाधिक प्रति किलोला ६८५ रुपये तर सर्वात कमी दर ४५० रुपये दर बीड बाजार समितीमध्ये मिळाल्याचा महेश यांचा अनुभव आहे. प्रति बॅच किमान १५ हजार ते २० हजार रुपये खर्च येतो. हवामान अनुकूल असल्यास, उत्पादन व दरही चांगले मिळाल्यास प्रति बॅच ७० हजार ते ७५ हजार रुपये उत्पन्न मिळवण्याची संधी असते असे महेश सांगतात.

Sericulture
Sericulture : रेशीम उद्योजकांना देणार धागा निर्मितीचे प्रात्यक्षिक

चॉकी सेंटर व नर्सरीही

रेशीम कोष उत्पादनाबरोबरच महेश यांनी चॉकी सेंटर देखील उभारले आहे. त्यातून ते परिसरातील आणि शिरूर तालुक्यातील मिळून महिन्याला २५ ते ३० शेतकऱ्यांना ते चॉकीची म्हणजे बाल्यावस्थेतील अळ्यांची विक्री करतात. प्रति शंभर अंडीपुंजांमागे तीनहजार रुपये असा आपला माफक दर असल्याचे ते सांगतात. अन्यत्र ठिकाणी हेच दर ३८०० ते चारहजार रुपयांपर्यंत आहेत.

अर्थात चॉकी व्यवसायातून खूप मोठा आर्थिक फायदा होत नाही. मात्र शेतकऱ्यांसोबत संपर्क किंवा नेटवर्क टिकून राहते असे ते म्हणतात. शिवाय तुतीची नर्सरी उभारून वर्षाला ५० हजार ते दीड लाखांपर्यंत त्यांनी रोपेही विकली आहेत. त्यातूनही उत्पन्न जोडले आहे. ऊसशेतीला दीड वर्षाचा कालावधी लागतो. मग पैसा हाती येतो. त्या तुलनेत रेशीम शेती दर महिन्याला ताजे व शाश्‍वत उत्पन्न देते. अर्थात या शेतीत भांडवल देखील खूप लागते. पावसाळा किंवा ऋतुनुसार उत्पादन कमी मिळू शकते. गुणवत्ता घटल्यास दारांवरही परिणाम होतो असे महेश सांगतात.

कुटुंबाची साथ

महेश यांना काका दत्तात्रेय झोडगे यांनी वेळोवेळी सहकार्य केले आहे. वडिलांचे मार्गदर्शन तर असतेच. पत्नी योगिता पतीच्या खांद्याला खांदा लावून रेशीम शेतीत झटतात. दांपत्याला हर्षल व स्वरा अशी दोन गोंडस मुले आहेत. महेश सांगतात की आंबेगाव, शिरूर या तालुक्यांत रेशीम शेती वाढत आहे. आमच्या गावासह या तालुक्यांतील शेतकऱ्यांना एकत्र करून रेशीम उत्पादक शेतकरी कंपनी स्थापन करण्याचा विचार आहे.

महेश झोडगे ९८६०६०१४०७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com