Sericulture Farming : रेशीम शेतीतून शोधला शाश्‍वत उत्पन्नाचा मार्ग

Silk Production : मस्सा- खंडेश्‍वरी (ता. कळंब, जि. धाराशिव) येथील युवा शेतकरी गणेश थोरात यांनी रेशीम शेतीतून शाश्‍वत उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. सध्या एक एकरात तुती लागवड व वर्षभरात चार बॅचेसमधून त्यांनी पिकांपेक्षाही भरपूर व ताजे उत्पन्न मिलवण्यास सुरुवात केली आहे.
Silk Farming
Silk FarmingAgrowon
Published on
Updated on

Sericulture Farming Success Story : अठरा एकर जमीन, त्यात एक विहीर व बोअरच्या उपलब्ध पाण्यातून ऊस व अन्य पिके घेत होतो. पण शाश्‍वत उत्पन्न मिळत नव्हते. घरखर्चाची तोंडमिळवणीही होत नव्हती. अपुरा पाऊस झाला की सिंचनासाठी पाणी उरत नव्हते. शेतीला ठोस पर्याय शोधणे गरजेचे होते. त्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात गेलो. तेथे शेळीपालन व रेशीम शेतीची माहिती मिळाली.

चर्चेतून व चिंतनातून रेशीम शेतीला प्राधान्य द्यावे व त्यातील उत्पन्नातून शेळीपालन सुरू करावे असे ठरवले. प्रशिक्षण घेतले. एक एकर तुतीची लागवड केली. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला रेशीम शेतीचा हा प्रवास आता कायदेशीररीत्या स्थिरावत चालला आहे. म्हणूनच एक एकर तुतीचे क्षेत्र यंदा वाढवणार आहे. मस्सा- खंडेश्‍वरी (ता. कळंब, जि. धाराशिव) येथील युवा शेतकरी गणेश बापूराव थोरात (वय ३२) यांनी रेशीम शेतीतील आपली आश्‍वासक वाटचाल कथन केली.

थोरात यांची रेशीम शेती

एक एकरात उपलब्ध होणाऱ्या तुती पाल्याचा अंदाज घेऊन वर्षभरात रेशीम कोष उत्पादनाच्या सुमारे चार बॅचेस घेण्यात येतात. धाराशिव भागात तीव्र उन्हाळा असल्याने त्या काळात कोष निर्मिती शक्य होत नाही. रेशीम शेतीसाठी ‘नरेगा’मधून तीन वर्षांपर्यंत सुमारे साडेतीन लाखांच्या अनुदानाची सोय आहे.

पैकी सुमारे दीड लाख रुपये हाती आले आहेत. साठ बाय २८ फूट आकाराचे हवेशीर शेड उभारले आहे. त्यामध्ये माशी किंवा अन्य कीटक जाऊ नयेत यासाठी त्या पद्धतीने नेटची बांधणी केली आहे. अकलूज (जि. सोलापूर) येथील नवनाथ रसाळ यांच्याकडून अंडीपुंज घेण्यात येतात. त्यामुळे चॉकी संगोपनाचे दहा दिवस कमी होऊन सुमारे २१ ते २५ दिवसांत बॅच पूर्ण होते.

Silk Farming
Sericulture Farming : श्रमातून श्रीमंत करणाऱ्या रेशीम शेतीकडे वळा

कसरतीचा व्यवसाय

तुतीचा पाला दर्जेदार मिळेल यासाठी व्यवस्थापन काटेकोर ठेवावे लागते. अत्तर, धूम्रपान, तंबाखू आदींच्या गंध वा धुरांपासून रेशीम अळ्या दूर राहतील अशी व्यवस्था केली जाते. शेतालगतचे शेतकरी जेव्हा कीडनाशकांची फवारणी करीत असतात, त्या वेळीही दक्षता घ्यावी लागते.

फवारणीचे थेंब तुतीच्या पानांवर किंवा शेडमध्ये येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते. फवारणी करताना परिधान केलेल्या वस्त्रांसह शेडमध्ये जाता येत नाही. त्यासाठी स्वतंत्र वस्त्रे ठेवावी लागतात. प्रत्येक बॅचची सुमारे ४५ दिवसांची कसरत डोळ्यात तेल घालूनच सुरू असते असे गणेश यांची आई सोजरबाईंनी सांगितले.

Silk Farming
Sericulture Farming : एकेकाळी केली रोजंदारी रेशीम उद्योगातून घेतली भरारी

फायदेशीर अर्थकारण

गणेश यांनी पहिल्याच वर्षी रेशीम शेतीतील उत्पन्नातून ठिबकसाठी घेतलेले कर्ज फेडले.ते पाहून परिसरातील मित्र-सहकाऱ्यांनाही या शेतीतील अर्थकारण व महत्त्व समजले. आज सात जणांचा रेशीम उत्पादक गट स्थापन झाला आहे. सर्वांचे मिळून कोष रामनगर (कर्नाटक) येथे पाठवले जातात. त्यातून वाहतूक खर्च व श्रम कमी झाले आहेत.

गणेश यांना प्रति दीडशे अंडीपुंजाच्या बॅचपासून १३०, १४० ते १५० किलोपर्यंत कोष उत्पादन मिळते. गट असल्याने एकाच वेळी बॅचची सुरुवात केली जाते. अलीकडील काळात कोषांना प्रति किलो तीनशे, चारशे रुपयांपासून सहाशे रुपयांपर्यंत दर मिळतो.

खर्च वजा जाता प्रति बॅच ६० ते ७० टक्के नफा मिळतो. गणेश सांगतात, की पिकांच्या तुलनेत रेशीम शेतीतील जोखीम कमी आहे. पिकाचा संपूर्ण कालावधी, मिळणारे उत्पन्न यांचा विचार करता रेशीम शेतीतून प्रति बॅच मिळणारे उत्पन्न अधिक आहे.

घरातील सर्वांचे श्रम

गणेश यांचे वडील बाबूराव, आई सोजरबाई, लहान भाऊ रामेश्‍वर व भावजय शिवानी असे सर्व जण रेशीम शेतीतील कामांमध्ये पारंगत झाले आहेत. मजुरांवरील अवलंबित्व व त्यावरील खर्चही त्यामुळे कमी झाला आहे. केवळ वेचणीच्या काळात मजुरांची मदत घ्यावी लागते. घराचे बांधकाम केले आहे.

एकेकाळी दुसऱ्यांच्या शेतात मजुरीवर जाण्याची वेळ यायची. परंतु रेशीम शेतीतून इतरांना रोजगार उपलब्ध करून दिल्याचे समाधान असल्याचे गणेश सांगतात. ट्रॅक्टर व अन्य अवजारे त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे अन्य शेतकऱ्यांचीही कामेही ते करून देतात.

गणेश थोरात ७२७६८१३०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com