Silk Farming :
शेतकरी नियोजन
रेशीम शेती
शेतकरी : भगवान ऊर्फ राजू रामदास कचरे
गाव : कचरेवाडी ता.जि. जालना
तुतीचे क्षेत्र : पावणेपाच एकर
जालना जिल्ह्यातील कचरेवाडी येथील भगवान ऊर्फ राजू कचरे यांचे शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत. कुटुंब विभाजनामुळे वाटणीनंतर आलेली साडेसहा एकर शेतीमध्ये सुरुवातीला ते पारंपरिक कपाशी, सोयाबीन, मका अशी पिके घेत असत. त्यातून कसाबसा उदरनिर्वाह होत होता.
मात्र अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी वीस वर्षांपूर्वी एक एकर तुती लागवड करत रेशीम शेती सुरू केली. विविध संकटे आली, तरी सातत्य ठेवल्यामुळे तुतीखालील लागवड आता पावणेपाच एकरांपर्यंत पोहोचली आहे. या उद्योगामुळे त्यांचे अर्थकारण सक्षम झाले आहे. या शिवाय शिल्लक राहणाऱ्या तुती पाल्यावर दोन गीर गाईंचे पालनही शक्य झाले आहे.
वर्षात दहा ते अकरा बॅच
वर्षभरात ऑक्टोबर महिना वगळता सर्व ११ महिने दोन शेडमधून किमान २५० अंडीपुंजाच्या सुमारे १० ते ११ बॅच राजू कचरे घेतात. ऑक्टोबर हीटमध्ये प्रचंड तापमानामुळे अनेकदा रेशीम कीटक बळी पडत असल्यामुळे अपेक्षित उत्पादन होत नाही.
लागवड अंतर, खरड छाटणीत केले काळानुसार बदल
सुरुवातीला पाच बाय दोन फूट अंतरावर तुती लागवड केली होती. त्या वेळी ते तुतीची खरड छाटणीही घ्यायचे. अलीकडे काही वर्षांत त्यांनी सहा बाय दीड फूट आणि साडेआठ बाय दीड फूट अंतरावर तुती लागवड केली आहे.
त्यामुळे हवा खेळती राहून रोगांचे प्रमाण कमी राहते. पूर्वी खरड छाटणीत खोड ठेवले जात नव्हते. आता छाटणी करताना खोड ठेवून छाटणी केली जाते. परिणामी, त्याला चांगले फुटवे फुटतात.
पूर्वीच्या तुलनेमध्ये दीड पट पाला उत्पादन अधिक मिळते. दर दीड महिन्याला पाला काढणीसाठी येतो. प्रत्येक बॅचला पाला कमी पडणार नाही, अशा प्रकारे नियोजन केले जात असल्याचे कचरे सांगतात.
खत, अन्नद्रव्य व्यवस्थापन
अलीकडे तीन फुटांच्या गादीवाफ्यामध्ये एकर सहा ट्रॉली शेणखत वापरून तुती लागवड केली जाते. परिणामी, जमिनीची सुपीकता वाढली असून, रासायनिक खतावरील खर्चात ५० टक्क्यांनी बचत शक्य झाली आहे.
कचरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेमध्ये छाटणी झाली, की चौदाव्या दिवशी एकरी एक बॅग नत्र, दोन बॅग सुपर फॉस्फेट, अर्धी बॅग पोटॅश दिले जाते. यासोबत दर तीन महिन्याला मॅग्नेशिअम २५ किलो या प्रमाणात तुती बागेला दिले जाते. पहिली सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी व साडेतीन फुटांचे झाड झाल्यानंतर दुसरी सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी घेतली जाते.
सिंचनासाठी ठिबक आणि स्प्रिंकलरचा वापर
सिंचनासाठी कचरे यांच्या शेतीत एक विहीर आहे. त्यातून हिवाळा पावसाळा तीन तास मोटर पंप चालू शकतो. तर उन्हाळ्यात केवळ पाऊण तास पंप चालतो. परिणामी, पाण्याचा काटेकोर वापर करताना तुती बागेच्या सिंचनासाठी पूर्णपणे ठिबक वापरले जाते.
दर पाच दिवसाला एक ते सव्वा तास मोटर पंप चालवतात. रेशीम कीटकांना पाला खाऊ घालण्याआधी एक वेळ स्प्रिंकलरने पाणी देण्याचे नियोजन असते. त्यामुळे पाल्यावरील धूळ व इतर अपायकारक बाबी धुऊन निघतात.
२१ ते २७ दिवसांत कोष उत्पादन येते हाती
कचरे यांच्या अनुभवानुसार पावसाळ्यात साधारणतः २१ ते २२ दिवसांत, तर हिवाळा - उन्हाळ्यात २२ ते २७ दिवसांत रेशीम कोषाचे बॅचचे उत्पादन त्यांच्या हाती येते. प्रति १०० अंडीपुंजांमागे साधारणतः ८० ते १०० किलो रेशीम कोषाचे उत्पादन त्यांना मिळते. आजवरच्या अनुभवानुसार एका बॅचपासून दरातील चढ-उताराप्रमाणे ८० हजारांपासून एक लाख ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.
निर्जंतुकीकरणावर विशेष भर
दररोज शेडमधील निर्जंतुकीकरणावर कचरे यांचा विशेष भर असतो. त्यासाठी ते चुना व निर्जंतुकीकरण पावडरचा वापर करतात. याचा फायदा प्रत्येक मोल्टच्या वेळी कात टाकणाऱ्या रेशीम कीटकांच्या जखमांच्या संरक्षणासाठी, विषाणूजन्य रोगापासून बचाव होतो. चुन्यामुळे कीटकांची विष्ठा सुकून जाऊन बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावही टाळता येत असल्याचे कचरे सांगतात.
सुरू झाला दुग्ध व्यवसाय
जवळपास पाच वर्षांपूर्वी एक गीर गाय विकत घेऊन रेशीम उद्योगाला जोड म्हणून दुग्ध व्यवसाय त्यांनी सुरू केला. तुती बागेतून काढल्या जाणारे गवत व तुतीच्या गळफांद्या याचा चारा म्हणून उपयोग होतो. आज त्यांच्याकडे दोन गीर गाई आहेत.
पत्नी मुलामुलींची मोठी मदत
कचरे हे गंमतीने तुती या शब्दाची फोड करत ‘तू’ आणि ‘ती’ दोघांनी मिळून करायचा रेशीम उद्योग असल्याचे सांगतात. खरोखरच या रेशीम उद्योगात राजू यांना पत्नी द्वारकाबाई यांची मोठी मदत होते.
शिवाय कृषी पदवी घेत असलेला मुलगा अभिषेक आणि औषध शास्त्राची पदवी घेणारी मुलगी भारती यांचीही मोठी मदत होते. घरातून मिळणाऱ्या या मदतीमुळे संपूर्ण बॅचमध्ये केवळ एक दिवस कोष काढणीच्या वेळी बाहेरून सुमारे १५ मजूर कोष काढणीसाठी घ्यावे लागतात. अन्यथा मजुरांवर कुठलाही खर्च करावा लागत नाही.
महत्त्वाचे
आजवर प्रति क्विंटल कोशाला किमान १४ हजार रु. आणि कमाल ७५ हजार रुपये असा दर मिळाला आहे.
वीस वर्षांपासून रेशीम उद्योगात सातत्य.
बंगलोरला रेशीम कोष विक्रीसाठी नेणाऱ्या पहिल्या मोजक्या शेतकऱ्यांपैकी एक.
अन्य ४५ रेशीम कोष उत्पादकांना उद्योगासाठी आवश्यक ते मार्गदर्शन व मदत केली.
चार वर्षांपूर्वी परिसरातील पहिले चॉकी सेंटर उभारले असून, अन्य शेतकऱ्यांनाही सुदृढ चॉकी पुरवली जाते.
रेशीम उद्योगातील उत्पन्नांवरच अडीच एकर शेती विकत घेणे व बंगला उभारणी शक्य झाल्याचे कचरे सांगतात.
राजू कचरे, ९७६४०९०५३०
(शब्दांकन : संतोष मुंढे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.