Goat Management : वाढत्या तापमानातील शेळ्यांचे व्यवस्थापन

Goat Farming : उन्हाळ्यात शेळ्यांना त्यांच्या शरीराचे तापमान योग्य त्या प्रमाणात ठेवण्यास अडचणी निर्माण होतात. त्याचा परिणाम शेळ्यांचे दूध उत्पादन, वाढ आणि आरोग्यावर होताना आपणास दिसतो.
Goat Management
Goat ManagementAgrowon
Published on
Updated on

डॉ. विष्णू नरवडे

Goat Rearing : उन्हाळ्यात शेळ्यांना अल्प खाद्य, कमी व वाळलेला चारा, अल्प पाणी आणि अति उष्णता यांचा त्रास होतो. याचा परिणाम शरीरावर झाल्याने प्रजनन क्रिया थांबते किंवा प्रजनन क्रियेस हानी होऊ शकते. उष्णतेचा ताण बसल्यास गाभण शेळ्यांमध्ये गर्भपात होतो किंवा अकाली प्रसूती होऊ शकते. शरीरातील क्षारांचे संतुलन बिघडल्यामुळे आम्ल पित्ताचा त्रास होऊन जुलाब होऊ शकतात. अति उष्णतेमुळे शेळ्यांमधील प्रतिकारशक्ती कमी होऊन उत्पादनाबरोबर आरोग्यावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होते.

उन्हाळ्यात अति उष्णतेमुळे श्वसन दर वाढतो. त्याचा परिणाम लघवी व शौचास होण्याचे कमी प्रमाणावर होतो. त्यामुळे शेळ्यांमध्ये आहार घेण्याचे प्रमाण कमी होऊन शरीराला लागणाऱ्या ऊर्जेची ३० टक्क्यांपर्यंत गरज वाढते. ही ऊर्जा उन्हाळ्यात न भागल्यामुळे एकूणच शेळ्यांमध्ये इनझायमॅटिकचे बिघडलेले कार्य, हार्मोन असंतुलन होते. याचा परिणाम शेळ्यांची वाढ, आरोग्य, प्रजनन आणि मांसाच्या गुणवत्तेवर होतो. उन्हाळ्यात तापमान आर्द्रता निर्देशांक ७२ च्या पुढे गेल्यावर शेळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन उत्पादन व प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो.

गोठा व्यवस्थापन

शेळ्यांना जास्तीत जास्त सावली पुरविणे आवश्यक आहे. गोठा हवेशीर असावा. गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी जागा असावी.

गोठ्याच्या आजूबाजूने झाडे लावावीत जेणेकरून वातावरण थंड राहील. छताच्या पत्र्याला वरच्या बाजूने पांढरा रंग दिल्यास उष्णतेचे परावर्तन होऊन उष्णतेचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

गोठ्यात हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावावेत. गोठ्याच्या भोवती बारदान किंवा पाणी धरणारा कपडा बांधावा. जेणेकरून आत येणारी गरम हवा थंड होऊन येईल. आतील थंड हवा आतच राहील.

शेळ्यांना जास्तीत जास्त वेळा पाणी पिण्यास उपलब्ध असेल, पाणी थंड असेल याची दक्षता घ्यावी.

ज्यांच्याकडे शेड नसेल अशा शेतकऱ्यांनी तात्पुरते शेड उभारून शेळ्यांचे उन्हापासून संरक्षण करावे. यासाठी शेड नेट, प्लॅस्टिक कपडा, उसाचे पाचट, ज्वारीचे काड, गवताचे काड इत्यादींचा वापर करून निवारा करावा. त्यामुळे शेळ्यांचे तापमान व श्वसन दर सामान्य राहण्यास मदत होते.

Goat Management
Goat Farming : शेळ्यांना पौष्टिक खाद्यासाठी विविध चारा पिकांचे नियोजन

आरोग्य व्यवस्थापन

उन्हाळ्यात अपुरा चारा व निकृष्ट आहारामुळे शेळ्या अशक्त बनून त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते. विविध आजारांना बळी पडण्याची शक्यता असते.

शेळ्यांतील लेंड्यांद्वारे अमोनिया बाहेर पडत असतो. उन्हाळ्यात अमोनिया बाहेर पडण्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळेस हा वायू शेळ्यांना घातक ठरण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी गोठा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. दररोज स्वच्छता करणे गरजेचे आहे.

अस्वच्छ गोठे असल्यास त्वचेचे आजार, कासदाह, फुप्फुसाचे आजार, पचनाचे विकार, खुरांचे आजार होतात.

जिवाणूजन्य आजारांमध्ये आंत्रविषार, घटसर्प, न्यूमोनिया, कोलायबॅसिलोसिस, तर विषाणूजन्य आजारांमध्ये लाळ्या खुरकूत, पीपीआर, कॉन्टजीयस एकथायमा, देवी यासारखे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते. आजाराच्या नियंत्रणासाठी लसीकरण आवश्यक आहे.

लसीकरणाचे वेळापत्रक

आजार सुरुवातीची मात्रा नियमित लसीकरण

आंत्रविषार ३-४ महिने वय दर सहा महिन्यांनी

लाळ्या खुरकूत ३-४ महिने वय दर सहा महिन्यांनी

पीपीआर ३-४ महिने वय दर वर्षी

देवी ३-४ महिने वय दर वर्षी

घटसर्प ३-४ महिने वय दर सहा महिन्यांनी

शेळ्यांना जंताचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होण्याचे कारण म्हणजे त्यांची चराऊ कुरणावर चरण्याची सवय. शेळ्यांना गोलकृमी, चपटेकृमी, पर्णकृमी जंताचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी दर तीन महिन्यांनी जंतनाशक पाजणे आवश्यक आहे. यामुळे अशक्तपणा, यकृत, पोटाचे आजार टाळता येऊन उत्पादकता टिकवून ठेवता येते.

बाह्य कीटक जसे माश्‍या, डास, पिसवा, गोचीड यांचे नियंत्रण करावे. कारण यापासून शेळ्यांना विविध आजार जसे न्यूमोनिया, गोचीड ताप, केस गळणे, खरूज, त्वचेचे विकार होतात. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने नियंत्रणाचे उपाय करावेत. १० मिलि नीम तेल, १० मिलि करंज तेल, २० ग्रॅम साबण चुरा एक लिटर पाण्यात मिसळून घ्यावा. हे द्रावण दोन तास भिजवून ठेवल्यानंतर गोठा आणि शेळ्यांच्या अंगावर फवारल्यास किटकांचा प्रादुर्भाव कमी होतो.

Goat Management
Goat Management : तापमानाचा अंदाज घेऊन शेळी व्यवस्थापनावर भर

खाद्य, चारा व्यवस्थापन

शेळ्यांना दिवसभरात लागणारा चारा एकावेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा. चाऱ्याची कुट्टी करून हिरवा व वाळलेला चारा यांचे मिश्रण करून द्यावा. वाळलेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचे किंवा गुळाचे पाणी शिंपडावे जेणेकरून शेळ्या आवडीने चारा खातात.

शेळ्यांना जास्त चावावा लागणारा चारा हा सकाळ किंवा सायंकाळी द्यावा. जेणेकरून शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होणार नाही. या कालावधीत शेळ्यांना अतिरिक्त ऊर्जा पुरविणे गरजेचे आहे. ताण सहन करण्यासाठी शरीरातील बिघडलेल्या क्षारांचा समतोल साधण्यासाठी योग्य प्रमाणात खनिज मिश्रण देणे गरजेचे आहे.

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे संतुलन ठेवण्यासाठी सोडियम, पोटॅशिअमचे प्रमाण चांगल्या पातळीवर ठेवणे गरजेचे असते. कारण वाढलेल्या तापमान काळात पोटॅशियम जास्त प्रमाणात बाहेर टाकले जाते. यासाठी यांचा खाद्यातून पुरवठा करावा.

उन्हाळ्यात शारीरिक तापमान समतोल साधण्यासाठी अॅन्टिऑक्सिडंट्‍स जसे जीवनसत्त्व क आणि ई चा आहारात समावेश करावा.

उन्हाळ्यात शेळ्यांची भूक कमी होते, अशावेळी कमीत कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त पोषक घटक देऊन उत्पादन घेता येते. त्यासाठी बायपास फॅटचा वापर करावा. शेळीच्या पोटात बायपास फॅटवर कुठलीच प्रक्रिया होत नसल्याने कोठी पोटाचे तापमान कमी राखण्यास मदत होते.

उपलब्ध चारा, खाद्य घटकांचे पचन अधिक वाढविण्यासाठी बायपास फॅटबरोबरच प्रजननासाठी कॅल्शिअम व इतर नैसर्गिक खनिजे, रुमेन बफर व यीस्ट कल्चर, अॅसिडिटी रेग्युलेटर, रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सेलेनियम व बायोटीन यांचा वापर पशुवैद्यकांच्या सल्ल्याने करावा. यामुळे शेळ्या वेळेवर माजावर येण्यास, गाभण राहण्यास मदत होते. योग्य खाद्य पचनामुळे उत्पादकता टिकवून ठेवण्यास मदत होते.

उन्हाळ्यात पशुआहारात बटाट्याचा वापर केल्यास, बटाट्यातील स्टार्च व जीवनसत्त्व क च्या उपलब्धतेमुळे ताण कमी करण्यास मदत होऊन दुधाची उत्पादकता वाढते.

चराऊ शेळीपालनामध्ये चरण्याच्या वेळा बदलाव्यात. सूर्योदयापूर्वी व सायंकाळी शेळ्या चरावयास सोडाव्यात, जेणेकरून बराचसा काळ शेळ्या गोठ्यात राहतील. उन्हाचा ताण येणार नाही. उन्हाळ्यात खाद्यामध्ये कमी तंतुमय घटक असलेले रेशन दिल्यास त्याचा पचनक्रियेवर चांगला परिणाम होऊन उत्पादकता टिकून राहते.

उन्हाळ्यातील दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध असलेल्या सर्वच प्रकारच्या सुक्या व निकृष्ट चाऱ्यावर जसे की, गव्हाचे काड/कोंडा, सोयाबीन कुटार, तूर/हरभरा भुसा, वाळलेली वैरण यांच्यावर १०० किलोसाठी युरिया २ किलो, गूळ किंवा मळी १ किलो, क्षार मिश्रण १ किलो, खडे मीठ १ किलो आणि पाणी २० लिटर या प्रमाणे प्रक्रिया करून चाऱ्याची पौष्टिकता वाढविता येते. पशुखाद्याचा खर्च आटोक्यात येऊन उत्पादकता टिकवून ठेवता येईल.

डॉ. विष्णू नरवडे, ९२२५५२२९२७

(वरिष्ठ शास्त्रज्ञ, अ.भा.स. संगमनेरी शेळी सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com