Vertical Farming : भाजीपाला उत्पादनासाठी ‘व्हर्टिकल फार्मिंग’

Vegetable Production : ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील संशोधकांनी एक गुंठ्यापेक्षा कमी जागेत‘व्हर्टिकल फार्मिंग'चे मॉडेल तयार केले आहे.
Vegetable Production
Vegetable Production Agrowon

संघर्ष तायडे, डॉ.विनायक पाटील

'Vertical Farming' for Vegetable Production : गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला शेतीचा एक प्रकार म्हणजे स्तरीय शेती (व्हर्टिकल फार्मिंग). दूरवर पसरलेली शेती हे सर्वसाधारण रूप आपल्याला परिचित आहे. काही गुंठे क्षेत्रावर उभारलेल्या बंदिस्त हरितगृहातील शेती आपल्याला चांगलीच माहीत आहे. मात्र वन रूम किचन पेक्षा कमी जागेत करता येऊ शकेल अशा व्हर्टिकल फार्मिंबाबत जगभरामध्ये वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत.

व्हर्टिकल फार्मिंग पद्धती ही शहरी भागासाठी अतिशय उपयुक्त आहे. शहरांमध्ये वाढणारी लोकसंख्या, तिच्या अन्नाच्या वाढत्या आणि बदलत्या गरजा, पारंपरिक शेतीमधून पुरवल्या जाणाऱ्या शेतमालाच्या वाहतुकीच्या आणि ताजेपणाच्या समस्या, शहरात काही ठिकाणी गलिच्छ परिस्थितीत पिकवलेली निकृष्ट उत्पादने अशा अनेक प्रश्नांना उत्तर म्हणून व्हर्टिकल फार्मिंगकडे पाहिले जाते.

सध्या विनामातीची शेती, निव्वळ पाण्यातील शेती, माती आणि पाणी विरहित शेती असे अनेक प्रकार प्रचलित होत आहेत. त्यांचा वापर करून कमी खर्चात, कमी जागेत अधिक उत्पादन आणि उत्पन्न मिळवण्याचा मार्ग म्हणून व्हर्टिकल फार्मिंग पद्धतीकडे पाहिले जाते.

आधुनिक तंत्रज्ञान वापरून पाणी, पोषण आणि प्रकाशयोजना स्वयंचलित पद्धतीने नियंत्रित करता येते. तापमान, आर्द्रता, हवेतील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण यांचे योग्य नियोजन करून पिकांच्या वाढीचा कालावधी कमी करता येऊ शकतो.

ऑस्ट्रेलियातील व्हर्टिकल फार्मिंग

दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प आणि संस्थागत विकास योजनेच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न सिडनी विद्यापीठात आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांना संधी मिळाली.

याठिकाणी अभ्यास दौऱ्यामध्ये आम्ही व्हर्टिकल पॅच कंपनीला भेट दिली. सिडनी शहराच्या स्मिथफील्ड या एका गजबजलेल्या उपनगरात या कंपनीने व्हर्टिकल फार्मिंग सुरू केले आहे. २०१८ मध्ये वेन फोर्ड यांनी ही कंपनी सुरू केली.

Vegetable Production
Sericulture Farming : रेशीम शेतीतून रोजगारनिर्मिती

उच्च दर्जा आणि टिकाऊ अन्न पदार्थ विशेषतः भाजीपाला वर्षभर उत्पादित करून ग्राहकांना त्यांच्या गरजेप्रमाणे पुरवणे हे कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. शाश्वत अन्न उत्पादन साखळीतील एक महत्त्वपूर्ण घटक बनण्याचे कंपनीने ठरवले आहे. शेतजमीन तसेच पर्यावरणाचे नुकसान कमी करणे,

स्थानिक व्यवसायांशी भागीदारी करून स्थानिक पातळीवर उत्पादित उत्पादनांच्या आधारे पीक उत्पादनात शाश्वतता आणण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे. त्याचप्रमाणे २०२५ पर्यन्त शंभर टक्के कार्बन न्यूट्रल होण्याचा संकल्प कंपनीने केला आहे. पाण्याचा वापर ९५ टक्क्यांनी कमी केला आहे.

असे आहे मॉडेल

एक गुंठ्यापेक्षा कमी जागेत हे व्हर्टिकल फार्मिंगचे मॉडेल उभे आहे. वेस्टर्न सिडनी विद्यापीठातील डॉ. इयान अॅन्डरसन आणि संशोधकांची मदत घेऊन हा प्रकल्प राबविलेला आहे. आपल्याला माहिती असलेल्या रॅक आणि ट्रे सिस्टिमपेक्षा या मॉडेलची रचना वेगळी आहे.

हे मॉडेल संपूर्णपणे बंदिस्त वातावरण तयार केलेले असून त्यामध्ये पिकांना पाणी, पोषक द्रव्ये आणि प्रकाश सुद्धा आतल्या आत मिळेल अशी व्यवस्था आहे.

प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक त्या तरंगलांबीचे किरण उत्सर्जित करणारे एलईडी दिवे बसवलेले आहेत.

या मॉडेलमध्ये दोन खोल्या तयार केलेल्या आहेत. त्यातील बाहेरच्या खोलीत संपूर्ण युनिट मधील वातावरण नियंत्रित करणारी यंत्रणा बसवलेली आहे. याच बाहेरच्या खोलीत भाजीपाला उत्पादनासाठी रॅक आहेत. या रॅकवरील ट्रे मध्ये रॉकवूल, वर्मीक्युलाईट, पर्लाईट अशी पाणी शोषून धरून ठेवणारी माध्यमे वापरून त्यामध्ये बियांची टोकण केली जाते.

लागवडीसाठी दहा फूट उंचीचे चांगल्या प्रतीच्या पीव्हीसीपासून बनवलेले पोकळ टॉवर्स आहेत. त्यामध्ये कोकोपीट भरले जाते. त्यामध्ये रुजून आलेली रोपे लावली जातात. छताकडे एक आडवी मांडणी केलेली असून तिला हे टॉवर्स उभे टांगून ठेवण्याची सोय केलेली आहे. ही मांडणी सरकत राहते त्यामुळे ठराविक कालावधीनंतर आतील बाजूची रोपे बाहेर अशी फिरत राहतात.

Vegetable Production
Vegetable Production : भाजीपाल्यांच्या नियमित उत्पन्नातून बसवली आर्थिक घडी

पोषणयुक्त पाण्याने हे स्तंभ आवश्यक तेवढे संपृक्त राहतील अशी व्यवस्था केलेली आहे. बंदिस्त आणि स्वच्छ वातावरणामुळे रोपांवर कोणत्याही प्रकारचे रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव होत नाही. शिवाय तण वाढण्याची कोणतीच शक्यता नाही. त्यामुळे या प्रकल्पातील उत्पादने कीटकनाशक आणि तणनाशकांपासून मुक्त असतात.

या प्रकल्पामध्ये मुख्यत्वे पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये विशेषतः स्थानिक कोबीवर्गीय भाज्या (बेजा, रोजेन, टेंडिटा, अॅस्टोर्गा, कोकोनिनो), मोहरी, कोथिंबीर, पुदीना, कांदा पात, माठ, वाटाणा, ओवा इत्यादींचा समावेश आहे.

पालेभाज्या, कोवळ्या भाज्या आणि औषधी भाज्या अशा तीन प्रकारांत ग्राहकांना विक्री केली जाते. पालेभाज्या आणि औषधी भाज्यांची पाने खुडून किंवा मुळांसह विक्री होते.

ट्रे मध्ये कोकोपीट, रॉकवूलमध्ये कोवळ्या भाज्या रुजून आल्यावर लगेचच विक्री केली जाते. त्यासाठी लहान टिकाऊ आणि हवेशीर प्लॅस्टिकचे कंटेनर वापरतात.

भाजीपाला उत्पादनाचे मॉडेल वेन फोर्ड यांच्यासह त्यांचे दोन सहकारी चालवतात. अल्पावधीतच त्यांचा भाजीपाला उत्पादनाचा व्हर्टिकल पॅच ब्रॅण्ड तयार झालेला आहे. वेन फोर्ड यांनी सिडनी शहरातील अनेक उपहारगृहांसोबत करार केलेले आहेत.

तेथील मुख्य आचाऱ्यांकडून पुढील तीन महिन्याचा मेनू मागवून घेतला जातो. त्यानुसार हॉटेलला लागणाऱ्या भाज्यांच्या उत्पादनाचे चक्र सुरू ठेवले जाते.

अशा प्रकारच्या व्हर्टिकल फार्मिंगचे मॉडेल उभारणी करण्यासाठी सुरवातीला जास्त खर्च येतो. त्याचप्रमाणे विजेचा खूप वापर होतो. मात्र एकदा उत्पादन सुरू झाले आणि विक्रीची व्यवस्था नीट बसली की या प्रकारच्या शेतीचे फायदे दिसायला लागतात. एका १०० वर्गमीटर जागेच्या युनिटमधून वर्षाला सरासरी ६० टन भाज्यांचे उत्पादन होते,

हे ऐकून आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो. कमी जागा,कमी मनुष्यबळाची आवश्यकता, वाहतूक खर्चात बचत, अधिक हिरव्या व अधिक ताज्या भाज्यांना मिळणारे वाढीव दर यामुळे हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर ठरतो. सेंद्रिय पोषक द्रव्यांचा वापर केल्यास ही किंमत अजून वाढते. सौरऊर्जेचा वापर करून विजेची बचत आणि खर्चात कपात करण्याचे नियोजन असल्याचे वेन फोर्ड यांनी सांगितले.

- डॉ. विनायक पाटील, ९४२३८७७२०६

( लेखक डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com