Vegetable Production : भाजीपाल्यांच्या नियमित उत्पन्नातून बसवली आर्थिक घडी

Vegetable Cultivation : सातारा जिल्ह्यातील काशीळ येथील तरुण शेतकरी संतोष सूर्यवंशी यांनी अभ्यासातून स्वतःची पीकपद्धती बसवली आहे. नगदी पिकांना नियमित हिरवा, लाल माठ आणि पापडी घेवडा या पिकांची जोड दिली आहे.
Vegetable shopping
Vegetable shoppingAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : काशीळ गावातच कृष्णा व उरमोडी नदीचा संगम असून, बारमाही मुबलक पाण्यामुळे प्रामुख्याने नगदी पिके घेतली जाते. त्यात सर्वाधिक ऊस, आले, हळद यांच्यासोबतच सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा, भाजीपाला इ. हंगामी पिकेही घेतली जातात. येथील संतोष उत्तम सूर्यवंशी हा तरुण शेतकरी.

वडील लहानपणीच वारल्यामुळे आईने कष्टातून दोन्ही मुलांचे शिक्षण केले. त्या काळात घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. मुळातच संघर्षाची स्थिती असलेल्या संतोष यांचे बी.कॉम., तर संभाजी यांचे बी.ए.पर्यंत शिक्षण झाले.

त्यानंतर अर्थार्जनासाठी संतोष यांनी मुंबई गाठली. तिथे दिवसा खासगी बॅंकेत नोकरी करतानाच रात्री तीन ते सकाळी नऊ या दरम्यान मित्रासोबत भागीदारीत चहाचा व्यवसायही करत होते. त्यामागे तिथला सर्व खर्च भागवून घरी पैसे देऊन जास्तीत जास्त साठविण्याचा त्यांचा उद्देश होता.

अशी सात वर्षे नोकरी व व्यवसाय तारेवरची कसरत करत होते. दुसऱ्या बाजूला घरच्या तीन एकर १५ गुंठे शेतीमध्ये सुधारणा करण्याचे नियोजनही सुरू होते. कमी शेतीमध्ये कोणती भाजीपाला पिके करता येतील, मागणी किती, कोणत्या काळात असते, याविषयी माहिती घेत होते. साठवलेल्या रकमेत मोठे बंधू संभाजी यांच्या बरोबरीने शेतीमध्ये पूर्ण वेळ उतरले.

संतोष यांनी थेट विक्रीवर भर द्यायचे ठरवून ग्राहकांकडून कधी, किती मागणी आहे, यानुसार पिकांचे उत्पादन सुरू केले. स्वतःच्या शेतीसोबत ९-१० एकर शेती खंडानेही घेतली. घरच्या तीन एकरांत अर्धा एकर ऊस, एक एकर आले; एक एकर १५ गुंठे क्षेत्रात भाजीपाल्याचे नियोजन केले.

खंडाने घेतलेल्या शेतीमध्ये ऊस व त्याला फेरपालट म्हणून भाजीपाल्याचे नियोजन केले जाते. २०१३ मध्ये यशकथेच्या वाचनामुळे मेथी, कोथिंबीर, पालक, पुदिना, लाल माठ, अंबाडी, आंबट चुका, करडई, चाकवत, तांदळी, मुळा अशा अकरा प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन २०२० पर्यंत घेत होते. त्या नंतर कमी उत्पादन खर्च, मागणी व मिळणारा दर यांची सांगड घालत थोडे बदल केले. लाल व हिरवा माठ व पापडी घेवडा ही पिके वर्षभर घेतली जाऊ लागली.

Vegetable shopping
Agriculture Success Story: सुरुवातीला टोमणे मारली, शेवटी त्यांनीच कौतुक केलं; खडकाळ माळरानावर पठ्यानं फुलवली शेती!

वर्षभर पिकांचे नियोजन ः

लाल व हिरवा माठ -

भाजीपाल्यांमध्ये वर्षभर किमान एक एकर क्षेत्रामध्ये लाल व हिरव्या माठाचे नियोजन केले जाते. तसेच आल्यामध्ये आंतरपीक म्हणूनही या भाज्यांची लागवड करतात. या भाज्यांच्या बियाही स्वतःच्या शेतात तयार करत असल्याने भांडवली खर्चात बचत होते. प्रत्येक प्लॅाट हा पाच ते दहा गुंठे क्षेत्रावर केला जातो. वर्षात साधारण दहा प्लॅाट होत असल्याचे संतोष सांगतात.

पाच ते सात गुंठ्यांत महिन्याला दोन्ही भाज्यांच्या दहा हजार पेंढ्यांचे उद्दिष्ट ठेवले जाते. लागवडीपासून साधारणपणे २५ दिवसांनी भाजी काढणीस सुरुवात होते व ३५ दिवशी प्लॅाट संपवला जातो. पहिला प्लॅाट संपण्याआधी दुसरा प्लॅाट सुरू होईल, असे नियोजन असते. नियमितपणे आठवड्यातून सहा दिवस भाजी काढून कऱ्हाड बाजार समितीतून कोकणातील व्यापाऱ्यांना पाठवली जाते.

Vegetable shopping
Agriculture Success Story: फळबागेतून मिळवला आर्थिक नफा; शेतकऱ्याने प्रगती कशी साधली?

वर्षभर सरासरी तीन ते चार रु. प्रतिपेंडी दर मिळतो. मशागतीपासून भाजी मार्केट पोहोचेपर्यंतचा खर्च वजा करता प्रति पेंढी दोन ते तीन रुपये मिळतात. एका प्लॅाटमधून २० ते २५ हजार रुपये निव्वळ नफा मिळतो.

विशेषतः गणपती उत्सवात कोकणातून या भाज्यांना अधिक मागणी असते. ती लक्षात घेता या काळात ३० गुंठे ते एक एकरापर्यंत अधिक क्षेत्र वापरले जाते. या काळात भाजीला दरही चांगला म्हणजे प्रति पेंडी सहा ते सात रुपये दर मिळतो.

पापडी घेवडा

सूर्यवंशी बंधू पापडी घेवड्याचेही वर्षातून १५ ते २० गुंठ्यांचे तीन ते चार प्लॉट घेतात. पहिला प्लॉट संपण्याअगोदर दुसरा प्लॉट येईल, असे नियोजन केले जाते. प्रत्येक सातव्या दिवशी शेंगाची तोडणी केली जाते. प्रत्येक तोडणीला सरासरी २०० किलो पापडी घेवडा मिळतो. हंगामनिहाय दरात चढ-उतार होत असले तरी सरासरी ३५ रुपये प्रति किलो असा दर मिळतो. मात्र शेंगा तोडण्यासाठी मजूर जास्त लागतात. त्यामुळे उत्पादन खर्च थोडा अधिक (५० टक्क्यांपर्यंत) राहतो.

आर्थिक नियोजन

- निव्वळ शेतातील उत्पन्नावर ट्रॅक्टर, थ्री व्हीलर, पॉवर टिलर, पाचट कुट्टी यंत्र खरेदी केला आहे. स्वतःच्या शेतीकामांसाठी म्हणून ट्रॅक्टर व ही वाहने भाड्याने देण्याचा व्यवसाय केला जातो. त्यातूनही वर्षाला सरासरी चार लाख रुपये येतात.

Vegetable shopping
Vegetable Production : भाजीपाला उत्पादनावाढीसाठी आवश्यक घटक कोणते आहेत?

-दरवर्षी दोन एकर शेती खंडाचे ६० हजार रुपये दिले जातात. तर वाट्याने घेतलेल्या ८ एकर शेतीतील शेतीमालाचा निम्मा वाटा मूळ मालकाला दिला जातो. त्यानंतर सर्व खर्च वजा जाता वर्षाकाठी भाजीपाल्यापासून पाच ते सहा लाख, तर नगदी पिके ऊस, आले यातून पाच ते सहा लाख असे सुमारे १० ते १२ लाख रुपये वर्षाकाठी मिळतात.

- विमा पॅालिसी, पोस्टाच्या योजनांमध्ये मासिक पाच हजाराची गुंतवणूक केली जाते.

- सातारा येथे मुलांचे शिक्षण व भावी काळातील सोय म्हणून फ्लॅट खरेदी केला आहे.

- दोन्ही भावांच्या चार मुलांचा शैक्षणिक खर्च, कर्जाचे हप्ते व शेतातील भांडवली खर्च वजा जाता आठ ते नऊ लाख रुपये शिल्लक राहतात.

शेतीची वैशिष्ट्ये...

- हंगामनिहाय पिकांत बदल केला जातो.

- आले पिकांत या पालेभाज्यांचे आंतरपीक. भाजीनिहाय दोन, तीन ते त्याहून अधिक वेळा घेतले जाते.

- बाजारात ताजा व प्रतवारी केलेलाच माल नेला जातो.

- दररोज स्वतःच्या वाहनातून स्वतःच्या भाजीपाल्यांसोबत अन्य शेतकऱ्यांचाही शेतीमाल नेला जातो.

- वाहतूक व मशागतीस स्वतःची वाहने असल्याने भांडवली खर्चात बचत होते.

संपूर्ण कुटुंब देते कष्टात साथ

स्वतः संतोष यांचा दिवस पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास सुरू होतो. इतक्या पहाटे कऱ्हाड येथे शेतीमाल घेऊन जातात. सकाळी आठपर्यंत माघारी आल्यानंतर संध्याकाळनंतर भाज्यांची प्रतवारी, पेंढ्या बांधणे, मार्केटसाठी शेतीमाल भरून ठेवणे आदी कामे होतात.

संतोष यांच्या पत्नी सौ. ज्योती, थोरले बंधू संभाजी, त्यांच्या पत्नी सौ. शुभांगी आणि आई शीला असे सर्व जण शेतीकामात कायम रमलेले असतात. बहुतांश कामे घरची माणसे स्वतः करत असल्याने प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी होते. अर्थात, तोडणीसह आवश्यक तिथे मजूर घेतले जातात.

- आईला संपूर्ण भारत फिरवून आणण्याचे स्वप्न होते. त्यानुसार जम्मू ते कन्याकुमारीपर्यंत बहुतेक महत्त्वाच्या ठिकाणी व देवस्थानास आईस पाठवता आल्याचा मोठा आनंद संतोष व्यक्त करतात.

-शेती व्यवसायातून आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करत असल्यामुळे संतोष यांचा सातारा गौरव पुरस्काराने सन्मानही झाला आहे.

- ‘ॲग्रोवन’सह घरी रोज तीन वर्तमानपत्रे येतात. मुलांच्या हाती मोबाइलऐवजी असे पेपरच असले पाहिजेत, असे आम्हा कुटुंबीयांना वाटत असल्याचे संतोष सांगतात.

-भविष्यात भाजीपाला प्रक्रिया उद्योगामध्ये उतरण्याचा संतोष यांचा मानस आहे.

संतोष सूर्यवंशी, ९९२२७७७२१२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com