Sugarcane Management: ऊस खोडवा व्यवस्थापनाचे तंत्र

Agricultural Techniques: राज्यातील एकूण ऊस लागवड क्षेत्रापैकी ४० टक्के खोडव्याचे क्षेत्र असते. उत्पादनात मात्र खोडव्याचा हिस्सा फक्त ३० टक्के आहे. ऊस पिकाचे सरासरी उत्पादन वाढविण्यासाठी लागणीच्या उसाइतके खोडवा पिकाला महत्त्व देणे आवश्यक आहे. यासाठी सुधारित तंत्राचा अवलंब महत्त्वाचा ठरतो.
Sugarcane
Sugarcane Agrowon
Published on
Updated on

डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ. किरणकुमार ओंबासे, डॉ. दत्तात्रय थोरवे

Agricultural Solutions: खोडवा पिकासाठी पूर्वमशागत करावी लागत नसल्यामुळे ३० टक्के खर्च वाचतो. शेतीच्या  तयारीसाठी लागणारा वेळ आणि श्रम यांची बचत होते. खोडवा घेतल्यामुळे ऊस बेणे, बेणेप्रक्रिया, लागवड इत्यादी खर्चात बचत होते. खोडवा पीक लागणीपेक्षा एक ते दीड महिना लवकर तयार होते. खोडवा पिकास फूट होण्यासाठी जमिनीतील कांड्यावर भरपूर डोळे असतात.

त्यामुळे फुटवे आणि गाळपालायक उसाची संख्या लागणीच्या उसापेक्षा जास्त आढळते. हे पीक पाण्याचा ताण जास्त प्रमाणात सहन करते. त्यामुळे पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात फारशी घट येत नाही. खोडवा पिकात पाचटाचा पूर्ण वापर करणे सहज शक्य होते. पाचटाचा आच्छादन म्हणूनही उपयोग होत असल्याने पाण्याची कमतरता असल्यास खोडवा पीक चांगले तग धरते. यांत्रिकी पद्धतीने तोडणी केल्यास बुडख्यावरील पाचट बाजूला करणे, बुडखे छाटणीची कामे करावी लागत नाही.

Sugarcane
Sugarcane Management : खोडवा ऊस उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या टिप्स

खोडवा पीक घेताना विचारात घ्यावयाच्या बाबी

सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवावा. त्याच्यानंतर खोडवा घेतल्यास खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो.

ज्या लागवडीच्या उसाचे उत्पादन हेक्टरी १०० टन पेक्षा जास्त आहे, अशा उसाचा खोडवा ठेवावा.

पीक विरळ झाल्यास रोपे लावून नांग्या भराव्यात.

खोडवा हलक्या, कमी खोलीच्या तसेच निचरा न होणाऱ्या क्षारपड किंवा चोपण जमिनीत घेऊ नये.

शिफारशीत जातीचा खोडवा ठेवावा.

पाचटाचा आच्छादन म्हणून प्रभावीरीत्या वापर करण्यासाठीची पूर्वतयारी ऊस लागणीपासूनच करायला हवी. यासाठी उसाच्या दोन सऱ्यांमधील अंतर कमीत कमी १.२० मीटर (४ फूट) असावे किंवा जमिनीच्या मगदुरानुसार रुंद सरी किंवा जोडओळ पद्धतीने लागण करावी म्हणजे पट्ट्यात पाचट चांगले बसते, फूट चांगली होते.

खोडवा पीक १२ ते १४ महिने वयाचे असताना ऊस तोड होणार असेल तरच खोडवा ठेवावा.

खोडवा राखण्याची योग्य वेळ

ऊस तोडणी ऑक्टोबरपासून एप्रिल/मेपर्यंत केली जाते. या उसाचा खोडवा ठेवला जातो. जसजसा खोडवा राखण्यास उशीर होतो, तसतसे उत्पादन कमी होत जाते. म्हणून १५ फेब्रुवारीनंतर तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवू नये. पाडेगाव येथे झालेल्या संशोधनानुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास अधिक उत्पादन मिळते. आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू हंगामातील तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवल्यास पूर्वहंगामी उसापासून ठेवलेल्या खोडव्याचे अधिक उत्पादन मिळते.

Sugarcane
Sugarcane Harvester Subsidy: ऊसतोडणी यंत्रांचे ७० कोटींचे अनुदान रखडले

खोडवा ठेवताना या गोष्टी करू नयेत

पाचट जाळणे, पाचट शेता बाहेर काढणे. बुडख्यांवर पाचट ठेवणे

आंतरमशागत व मोठी बांधणी करणे. बगला फोडणे, जारवा तोडणे

पाण्याचा अतिवापर करणे, रासायनिक खतांचा फोकून वापर करणे.

खोडवा व्यवस्थापन कार्यपद्धती

ऊस तोडणीच्या वेळी, पाचट ओळीत न लावता जागच्या जागी ठेवावे. शेतात एखाद्या ठिकाणी पाचटाचा ढीग राहिल्यास तो पसरून द्यावा. त्यानंतर बुडख्यावर असलेले पाचट बाजूला सरीमध्ये लोटावे. बुडखे मोकळे करावेत, जेणेकरून त्यावर सूर्यप्रकाश पडून येणारे नवीन कोंब जोमदार येतील.

बुडखे मोठे राहिल्यास ते जमिनीलगत धारदार कोयत्याने छाटून घ्यावेत. त्यामुळे जमिनी खालील कोंब फुटण्यास वाव मिळतो. फुटव्यांची संख्या वाढते. जमिनीखालील येणारे कोंब जोमदार असतात. बुडख्यांची छाटणी न केल्यास जमिनीच्या वरील कांडीपासून डोळे फुटतात. असे येणारे फुटवे कमजोर असतात. क्वचितच त्यांचे उसात रूपांतर होते.

ऊस तोडणी यंत्राचा वापर केल्यास पाचटाचे आपोआप लहान तुकडे होतात. जमिनीलगत छाटले जातात त्यामुळे पुन्हा बुडखे छाटणी करावी लागत नाही. खोडव्याची फूट सुद्धा चांगली होते.

बुडख्यांच्या छाटणीनंतर लगेचच कार्बेन्डॅझिम (१ ग्रॅम कार्बेन्डॅझिम प्रति लिटर पाणी) या बुरशीनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे मातीतून होणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रतिबंध होतो.

शेतात सरीमध्ये ठेवलेल्या पाचटावर प्रति एकरी ३२ किलो युरिया आणि ४० किलो सिंगल सुपर फॉस्फेट पसरावे. त्यानंतर ४ किलो पाचट कुजविणारे जीवाणू संवर्धन सेंद्रिय खतामध्ये किंवा ओलसर मातीमध्ये मिसळून समप्रमाणात पाचटावर पसरून टाकावे. पाचट कुजण्यासाठी नत्र, स्फुरद आणि पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंची गरज असते.

खोडवा उसाला पाणी द्यावे. पाचटामुळे सुरवातीस पाणी पोहोचण्यास वेळ लागतो. त्यामुळे सर्वत्र पाणी बसेल याकडे जातीने लक्ष द्यावे. पाचट जास्त असल्यास जमीन ओली असताना सरीतील पाचट पायाने दाबून घ्यावे किंवा जनावरांच्या पायाने दाबून घ्यावे. पाचटाचा मातीशी संबंध येऊन हळूहळू कुजण्याची क्रिया सुरू होते.

पाणी दिल्यानंतर नांग्या पडल्याने पीक विरळ दिसत असल्यास प्लॅस्टिक ट्रेमधील तयार केलेली रोपे वापरून नांग्या भराव्यात.

पाणी दिल्यानंतर ३ ते ४ दिवसांनी वाफसा आल्यावर रासायनिक खतांची पहिली मात्रा द्यावी. खते देण्यासाठी पाडेगाव येथे विकसित केलेल्या नवीन पद्धतीनुसार रासायनिक खतांची मात्रा पहारीसारख्या अवजाराच्या साह्याने जमिनीत वापसा असताना, दोन समान हप्त्यांत द्यावी. पहिली खतमात्रा १५ दिवसांच्या आत पूर्ण करावी. यासाठी पहारीने बुडख्यांपासून १० ते १५ सेंमी अंतरावर वरंब्याच्या बगलेत १५ ते २० सेंमी खोल छिद्र घेऊन दोन छिद्रामधील अंतर ३० सेंमी ठेवून सरीच्या एका बाजूला पहिली खतमात्रा द्यावी. दुसरी खतमात्रा विरुद्ध बाजूस त्याच पद्धतीने १३५ दिवसांनी द्यावी आणि खते दिल्यानंतर नेहमीप्रमाणे पाणी द्यावे.

Chart
Chart Agrowon

टीप : दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादनात घट येऊ नये तसेच पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता पिकात येण्यासाठी एकरी २५ किलो म्युरेट ऑफ पोटॅश या खताची जादा मात्रा खोडव्याच्या खत मात्रेबरोबर द्यावी.

(युरीया एक बॅग : ४५ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅशची एक बॅग ५० किलो)

पहारीच्या अवजाराने खते दिल्यास होणारे फायदे

खत मुळांच्या सान्निध्यात दिले जाते, त्यामुळे ते पिकास त्वरित उपलब्ध होते.

दिलेल्या रासायनिक खतांचा वातावरणाशी प्रत्यक्ष संबंध येत नसल्याने हवेव्दारे फारच कमी प्रमाणात खतांचा ऱ्हास होतो. खत मातीआड झाल्याने वाहून जात नाही.

खत तणास न मिळाल्याने प्रादुर्भाव फारच कमी दिसून येतो. खुरपणीवरील खर्चात ५० ते ७५ टक्क्यांनी बचत होते.

रासायनिक खतांची पिकांच्या गरजेनुसार हळूहळू उपलब्धता होऊन खतांची कार्यक्षमता वाढते. उसाची जोमदार वाढ होऊन भरघोस उत्पादन मिळते. सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात खत वापरणे शक्य होते.

- डॉ. राजेंद्र भिलारे, ९८२२०७२४२८, (ऊस विशेषज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com