Strawberry Farming: भीमाशंकरमध्ये स्ट्रॉबेरीचा बहर! शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

Bhimashankar Agriculture: पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध भीमाशंकरच्या प्रदेशात आर्थिक प्रगतीसाठी पीकबदल म्हणून स्ट्रॉबेरीचे क्लस्टर विकसित करण्यात येत आहे. त्याअंतर्गत लागवडीचे तंत्रज्ञान शेतकरी आत्मसात करीत आहेत. सध्या थोड्या गुंठ्यावरील प्रयोग असले, तरी दर्जेदार उत्पादन व थेट ग्राहक बाजारपेठ मिळवण्यात येथील शेतकरी यशस्वी होत आहेत.
Strawberry Farming
Strawberry FarmingAgrowon
Published on
Updated on

गणेश कोरे

Agriculture Innovation: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका व त्यातही प्रसिद्ध भीमाशंकर परिसरात स्ट्रॉबेरीचे क्लस्टर विकसित करण्यात येत आहे. एकात्मिक आदिवासी प्रकल्प, घोडेगाव (ता. आंबेगाव) आणि कृषी विभाग यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. येथील दुर्गम, आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक स्रोत वाढवणे तसेच खरीप भात काढणीनंतर रोजगारासाठीचे स्थलांतर रोखणे ही त्यामागील उद्दिष्टे आहेत.

त्या अंतर्गत २५८ शेतकरी गटातील ५५ शेतकऱ्यांनी सात एकरांत स्ट्रॉबेरी लागवड केली आहे. दर्जेदार उत्पादनाच्या दृष्टीने हे शेतकरी लागवड तंत्रज्ञान आत्मसात करताना दिसत आहेत. प्रकल्प संचालक प्रदीप देसाई म्हणाले, की प्रत्येक शेतकऱ्याला पाच गुंठे लागवडीसाठी प्रति गुंठा १० हजार रुपयांप्रमाणे ५० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. स्ट्रॉबेरीची थेट खरेदी करून आदिवासी आश्रमशाळांच्या मुलांना आहारात ती देण्यात येत आहे.

लागवड तंत्रज्ञानाचा प्रयोग

फळोदे (ता. आंबेगाव) येथील दीपक ढवळा रढे यांचा प्रातिनिधिक अनुभव सांगायचा, तर त्यांची २२ एकर शेती आहे. या भागात खरिपात पाऊस भरपूर पडतो. मात्र डोंगराळ भाग असल्याने उन्हाळ्यात तीव्र टंचाई असते. त्यामुळे विहिरीच्या उपलब्ध पाण्यावर एखादेच पीक घेणे शक्य होते. त्यामुळे दीपक खरिपात साडेतीन एकरांपर्यंत भातशेती करतात. त्यातील उत्पन्न मर्यादित असल्याने पीकबदल त्यांच्यासाठी महत्त्वाचा होता. दीपक यांना स्थानिक एक- दोन संस्थांकडून दोन वर्षांपूर्वी स्ट्रॉबेरी पिकाचा पर्याय सुचविण्यात आला.

नवे पीक असल्याने दीपक यांनी महाबळेश्‍वर गाठले. दोन दिवस तेथे राहून अनुभवी शेतकऱ्यांकडून स्ट्रॉबेरी लागवड तंत्रज्ञान शिकून घेतले. सुमारे अडीच ते तीन गुंठ्यात दीपक यांनी अधिक तापमानातही चांगला प्रभाव दाखवणाऱ्या व टिकवणक्षमताही चांगली असलेल्या जातीची निवड केली. मागील वर्षी लागवड उशिरा झाली. सुमारे ३५० किलोपर्यंत (अपेक्षेपेक्षा कमी) उत्पादन मिळाले. यंदा सहा गुंठ्यांत ऑक्टोबरच्या दरम्यान लागवड केली. दीड महिन्याच्या काळात आतापर्यंत ४२० किलो मालाची विक्री करण्यात यश मिळाले. अजून दीड महिन्यांचा कालावधी बाकी असून त्यात २०० ते २४० किलोपर्यंत उत्पादनाची अपेक्षा आहे.

Strawberry Farming
Strawberry Farming : केंजळेत फुलली लालचुटूक स्ट्रॉबेरी

विक्री व्यवस्था केली तयार

मागील वर्षी मिळाला किलोला २५०, ३०० व कमाल ४०० रुपयांपर्यंत तर यंदा २५० ते ३५० रुपयांदरम्यान दर.

पुणे शहरात सोशल मीडिया, मित्रपरिवार व संस्थांच्या मदतीने ग्राहक तयार केले. त्यांना घरपोच माल पुरवठा.

भीमाशंकर देवस्थान परिसरातही स्टॉल उभारणी. या भागात येणारे पर्यटक स्ट्रॉबेरी खरेदी करतात. -पुण्यातील तारांकित हॉटेललाही पुरवठा.

मागील वर्षी ५० हजारांपर्यंत नफा. यंदा ८० हजार ते एक लाखांपर्यंत उत्पन्नाची आशा.

स्ट्रॉबेरीतून साधलेला पीकबदल आर्थिक प्रगतीसाठी फायदेशीर ठरत असल्याचे दीपक म्हणतात.

तंत्रज्ञान वापरातील ठळक बाबी

नांगरट, त्यानंतर शेणखत, रोटाव्हेटर असा वापर. त्यानंतर गादीवाफे (बेड) तयार करून घेतले. सुमारे एक ते सव्वा फूट उंच व अडीच फूट त्यांची रुंदी.

ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाच्या द्रावणात रोपे बुडवून पॉली मल्चिंगवर लागवड.

यंदा सहा गुंठ्यांत अंदाजे तीन हजार रोपे.

शेताच्या चारही बाजूंना सहा फूट उंचीची हिरवी जाळी. जेणेकरून किडींना प्रतिबंध. प्रत्येक पाच-सहा फुटांवर एक याप्रमाणे निळ्या व पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर.

जिवामृत, दशपर्णी अर्क, व्हर्मिवॉश, कडुनिंब तसेच गुळवेलच्या पानांचा अर्काचा वापर. अधिकाधिक सेंद्रिय निविष्ठांचा वापर.

ठिबकद्वारे पाणी वापर.

Strawberry Farming
Strawberry Farming : पालघरमध्येही बहरणार स्ट्रॉबेरीचे मळे

अन्य शेतकऱ्यांच्या नियोजनातील बाबी

फळांचा दर्जा राखण्यासाठी पहाटे लवकर थंड वातावरणात काढणी.

ऊन वाढण्याच्या आता सकाळी लवकर बाजारपेठेत फळे नेली जातात.

पनेटमध्ये प्रतवारी केलेल्या फळांचे पॅकिंग.

१८ ते २५ मिमी. आकाराच्या फळांचा वापर. यामुळे ग्राहक आकर्षित होतो.

भीमाशंकर देवस्थान हा परिसर भाविकांनी गजबजलेला. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादकांना तयार झाली हक्काची बाजारपेठ.

२०० ते २५० ग्रॅमपर्यंतच्या पनेटला ५०, ६० ते ८० रुपये दर.

परिसरातील खेड, वाडा, मंचर, घोडेगाव येथील आठवडे बाजारांतही विक्री. या थेट विक्री पद्धतीमुळे मोठ्या शहरांतील बाजार समितीपर्यंत जाण्याची गरज उरलेली नाही.

तंत्रज्ञान वाढीस चालना

आंबेगाव तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे म्हणाले, की कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना महाबळेश्‍वर येथे अभ्यास दौरा व आत्मा अंतर्गत प्रशिक्षण दिले आहे. त्यातून लागवड तंत्रज्ञानात शेतकरी कुशल होण्याला चालना मिळत आहे. भीमाशंकर परिसरातील थंड वातावरण स्ट्रॉबेरीस पोषक आहे. भविष्यात स्ट्रॉबेरी उत्पादकांची कंपनी स्थापन करून भीमाशंकर ब्रॅण्ड व प्रक्रिया उद्योग उभारण्याचे प्रयत्न आहेत.’’

दीपक रढे ९०७५१८७२४८

दोन वर्षांपूर्वी स्‍ट्रॉबेरीच्या ५० रोपांच्या लागवडीचा प्रयोग केला. पाच गुंठ्यांसाठी ५० हजार रुपयांचे अनुदान मिळाले आहे. यंदा चांगले उत्पादन व उत्पन्नाची आशा आहे.
सखूबाई गोविंद लोहोकरे, ९६८९९५२१०४, शेतीनिष्ठ शेतकरी, पोखरी, ता. आंबेगाव
तीन वर्षांपासून पाच गुंठ्यात स्‍ट्रॉबेरी घेत आहे. मागील दोन वर्षांत ७५ हजार रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले. यंदा १० गुंठ्यात लागवड आहे. विक्री भीमाशंकर देवस्थान परिसरात करीत असून चांगला फायदा होत आहे. भातानंतर या पिकाचा चांगला आधार मिळाला आहे.
लक्ष्मण महादू मावळे, ९०२१९२६३२७ पाटण, ता. आंबेगाव
आदिवासी प्रकल्पांतर्गत यंदा पाच गुंठ्यांत लागवड आहे. नुकतेच उत्पादन सुरू झाले असून, प्रति तोड्यातून २५ ते ३० किलो उत्पादन मिळाले आहे. आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे प्रति किलो १९० रुपये दराने खरेदी होत आहे.
आश्‍विनी उभे, ९४०५७०७६११ गोहे बुद्रुक, ता. आंबेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com