
Agriculture Success Story : पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील पश्चिम घाट परिसरातील काही गावांमध्ये स्ट्रॉबेरी शेती फुलू लागली आहे. कांजळे गावचे युवा शेतकरी कुणाल कामठे त्यापैकीच एक. डोंगर उतारावरील तीन एकर सपाट भागात त्यांची तीन एकर शेती आहे. त्यात टोमॅटो, कांदा, ज्वारी आदी पिके ते घेत. त्यांच्या पाहुण्यांची स्ट्रॉबेरीची शेती असल्याने सुमारे शंभर रोपे त्यांच्याकडे शिल्लक राहिली होती.
घरगुती खाण्यापुरती म्हणून कुणाल यांना ती लागवडीसाठी दिली. त्यातून उत्पादन चांगले मिळाले. मग उत्साह वाढला. या पिकाची व्यावसायिक शेती का करू नये असे कुणाल यांना वाटले.परिसरासह महाबळेश्वर, वाई परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादकांच्या शेतांना भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. अर्थकारण तपासले.
पाच गुंठ्यांपासून सुरुवात
सुमारे तीन वर्षांपूर्वी पाच गुंठ्यात प्रायोगिक तत्त्वावर लागवड केली. त्याचे ‘मदर प्लॅंट्स’ महाबळेश्वर येथून आणले व रोपांची लागवड केली. पहिल्या वर्षी दर चांगला मिळून पाच गुंठ्यांत साठ हजार ते सत्तर हजारांचे उत्पन्न झाले. त्यातून उत्साह वाढला. पुढील वर्षी १० गुंठ्यांत लागवड केली.
या हंगामातून कुणाल यांनी चक्क एक लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले. आता हे पीकआपण चांगल्या प्रकारे करू शकतो याचा आत्मविश्वास आला. त्यानुसार यंदा ३० ते ३५ गुंठे क्षेत्रात त्याची लागवड केली आहे. सध्या लालचुटूक, आकर्षक अशा स्ट्रॉबेरीची काढणी जोमात सुरू आहे. या प्रयोगातूनही नक्कीच चांगल्या उत्पन्नाची कमाई होईल अशी कुणाल यांना आशा आहे.
लवकर येणाऱ्या वाणाचा फायदा
कुणाल सांगतात, की विंटर डाउन या वाणाची निवड मी केली आहे. त्याची कारणे सांगायची तर अन्य वाण लागवडीनंतर ६० ते ७० दिवसांनी सुरू होतात. हे वाण ४५ दिवसांनी सुरू होते. त्यामुळे बाजारपेठेत त्याची लवकर विक्री सुरू करता येते. त्याला फळांची संख्याही चांगली आहे. कमी, मध्यम, तीव्र थंडीतही हे वाण चांगले उत्पादन देऊ शकते. त्याची चव गोड- आंबट आहे.
व्यवस्थापनातील बाबी
यंदा महाबळेश्वरहून आठशे मदर प्लॅंट्स आणून रोपे तयार केली आहेत. गादीवाफा, ठिबक सिंचन व पॉली मल्चिंगचा वापर केला आहे. यातील पेपरचा वापर लागवडीनंतर १५ दिवसांनी केला आहे. सुरुवातीला त्यासाठी महाबळेश्वर येथील कुशल कामगारांना बोलावून त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले होते. लागवडीनंतर सुमारे ४५ दिवसांनी काढणी सुरू होते. आठवड्यातून तीन वेळा तर महिन्यातून सुमारे १२ वेळा तोडणी होते. प्रति तोड्याला साधारण १०० ते १५० किलो माल मिळतो. संपूर्ण पिकाचा कालावधी साडेचार ते पाच महिन्यांचा आहे.
पॅकिंग व विक्री व्यवस्था
पहाटे लवकर काढणी झाल्यानंतर फळांची प्रतवारी केली जाते. त्यानंतर पनेटमध्ये पॅकिंग केले जाते. यात वरती व खाली प्रत्येकी नऊ अशी १८ फळे ठेवली जातात. अशा आठ पनेट्सचा एक बॉक्स होतो. कुणाल सांगतात, की आमच्याकडे प्रति बॉक्सवर दर दिले जातात. कुणाल अनेक वर्षांपासून टोमॅटो पीक घेतात. त्याचबरोबर कलिंगड व खरबूजही त्यांनी घेतले होते. त्यातून त्यांचे व्यापाऱ्यांसोबत चांगले नेटवर्क आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या विक्रीसाठीही फार अडचण आली नाही.
गावात भाजीपाला घेऊन जाणारी काही वाहने दररोज येतात. त्यातून स्ट्रॉबेरी गुलटेकडी- पुणे बाजार समितीत पाठविलीजाते. मागील तीन वर्षांत प्रति ट्रे २०० ते २५० रुपयांच्या आसपास दर मिळाला आहे. यंदा आतापर्यंत नऊ तोडे झाले आहेत. कुणाल सांगतात, की गणेशोत्सव समाप्ती झाल्यानंतर रोपांची लागवड करतो. त्यामुळे स्ट्रॉबेरी नोव्हेंबरमध्येच बाजारात विक्रीस येते. त्याचा चांगले दर मिळण्यात फायदा होतो. पुढे अन्य ठिकाणाहून स्ट्रॉबेरी सुरू झाल्यानंतर दर घसरू लागतात. सध्या प्रति बॉक्स २८० रुपये दर मिळतो आहे.
सर्व कुटुंब राबते शेतीत
कुणाल यांचे संपूर्ण कुटुंब शेतीत राबते. शेतीतूनच त्यांची कौटुंबिक व आर्थिक प्रगती झाली आहे. गावापासून शेत जवळ असल्याने शेतीकडे पूर्ण लक्ष देता येते. वडील विठ्ठल व पत्नी वर्षा यांची समर्थ साथ आहे. कृषी क्षेत्रात शिक्षण झालेल्या मित्रांचे मार्गदर्शन कुणाल घेतात. यंदा त्यांचे टोमॅटोचे नियमित पीक सोबतीला आहेच.
पण स्ट्रॉबेरीमध्ये लसूण पिकाचीही लागवड मल्चिंग पेपरवर केली आहे.कुणाल सांगतात, की टोमॅटो पिकात मांडव उभारणीपासून ते काढणीपर्यंत देखभाल व खर्चही खूप आहे. त्या तुलनेत स्ट्रॉबेरी हे पीक कमी कालावधीत चांगले उत्पादन व उत्पन्न देऊन जाते.आमच्या परिसरातील गावांमध्ये काही शेतकरी हे पीक घेतात. पण आमच्या गावात या पिकाची लागवड करणारा मी पहिलाच शेतकरी ठरलो आहे.
कुणाल कामठे ९०४९६८२०६२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.