
रिंकेश गोसावी, गणेश कहार, डॉ. अभिमान सावंत
Agricultural Innovation: द्रवरूप आणि पेस्ट स्वरूपातील पदार्थापासून भुकटी निर्मितीसाठी स्प्रे ड्रायिंग तंत्रज्ञान उपयोगी ठरते. या प्रक्रियेतील मूळ पोषक, चव आणि सुगंध टिकवला जातो. या तंत्रज्ञानावर आधारीत प्रक्रिया उद्योगाच्या उभारणीमध्ये मोठ्या संधी आहेत.
स्प्रे ड्रायिंग म्हणजे काय ?
या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये फळांचे रस, गरयुक्त पदार्थ किंवा पेस्ट ही अत्यंत सूक्ष्म थेंबांच्या स्वरूपामध्ये गरम हवेच्या संपर्कात सोडले जातात. त्यामुळे त्यातील आर्द्रतेचे पूर्णपणे बाष्पामध्ये रूपांतर होते. ते बाष्प संपूर्णपणे बाहेर काढून टाकले जाते. त्यानंतर मिळालेली भुकटी (पावडर) फिल्टर प्रक्रियेमध्ये वेगळी केली जाते. या प्रक्रियेमध्ये मूळ फळांची पोषणमूल्ये, चव आणि सुगंध टिकून राहते.
...अशी केली जाते फळांवर
स्प्रे ड्रायिंग प्रक्रिया
चांगल्या प्रतीची फळे निवडून त्यांचा रस किंवा पेस्ट तयार केली जाते. त्यातील अशुद्धी काढून टाकतात.
स्प्रे ड्रायिंग यंत्रणेमध्ये फळांचा रस किंवा पेस्ट सोडली जाते. या यंत्रामध्ये उच्च दाबाच्या साह्याने अत्यंत बारीक थेंबामध्ये त्यांची फवारणी केली जाते. या कक्षामध्ये एका बाजूने हवेचा प्रवाह सोडलेली असतो. त्यामुळे सूक्ष्म थेंबातील आर्द्रता, ओलावा गरम हवेसोबत बाहेर काढला जातो. हे थेंब भुकटीच्या स्वरूपात पडतात.
तयार झालेल्या भुकटी गुणवत्ता विविध कसोट्यांवर तपासली जाते. उदा. पावडरची चव, पोषणमूल्य इ.
फळांची भुकटी
भारत फलोत्पादनामध्येही आघाडीवर असून, दरवर्षी ९० दशलक्ष मेट्रिक टन फळ उत्पादन घेतले जाते. मात्र बहुतांश फळांसाठी प्रक्रियेच्या सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे उत्पादित फळातील सुमारे २५ ते ३० टक्के फळे वाया जातात. हे टाळण्यासाठी भुकटी निर्मितीच्या प्रक्रियेला चालना देण्याची आवश्यकता आहे. १ किलो पावडर निर्मितीसाठी फळातील घन पदार्थांच्या प्रमाणानुसार साधारणतः ५ ते ७ लिटर फळांचा रस आवश्यक असतो.
दूध पावडर निर्मिती
सध्या भारतातील दूध उत्पादन प्रति दिन ३५० ते ४०० दशलक्ष लिटर असून, त्यातील फारच कमी दुधावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे दूध पावडर निर्मितीला चालना मिळाल्यास वाया जाणारे दूध वाचवणे शक्य होईल. स्प्रे ड्रायिंग यंत्रणेमध्ये दूध उकळून आधीच त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करून घेतले जाते. नंतर ते लहान तुषाराच्या स्वरूपात यंत्रामध्ये फवारले जाते. त्यातील पाणी हे उष्ण हवेद्वारे काढून घेतले जाऊन दूध पावडर तयार होते. दुधापासून पावडर बनविण्यासाठी दुधातील घनसामग्री साधारणपणे १२-१३ टक्के धरल्यास साधारणपणे ६-७ लिटर दूध लागते. दूध पावडर दीर्घकाळ ताजे राहते. ते साठवणेही सोयीचे ठरते.
गुंतवणूक आणि साधनसामग्री
यंत्रे : स्प्रे ड्रायर, पॅकेजिंग यंत्रणा, फिल्टर सिस्टिम.
कच्चा माल : उच्च प्रतीची फळे.
प्रशिक्षण : प्रक्रियेसाठी कुशल कर्मचारी, कामगार व व्यवस्थापकांना प्रशिक्षण देणे गरजेचे असते.
खर्च व नफ्याचे प्रमाण
१ किलो दूध पावडर तयार करण्यासाठी ७-८ लिटर दूध लागते. त्याचा खर्च २६० ते २८० रुपये असून पावडरची किंमत ४०० रुपये धरली तरी एकूण नफा १२० ते १३० रुपये प्रति किलो होईल.
१ किलो फळ पावडर निर्मितीसाठी फळातील घन पदार्थांच्या प्रमाणानुसार साधारणतः ५ ते ७ लिटर फळांचा रस आवश्यक असतो. त्याचा प्रत्येक फळाप्रमाणे वेगळा असून, त्यावर खर्च काढता येतो. फळांच्या भुकटीला प्रकारानुसार कमी अधिक, ८०० ते १००० रुपये प्रति किलो असा दर मिळू शकतो.
फळांच्या भुकटीचा वापर
आंबा पावडर : आमरस, पेये आणि मिठाईमध्ये वापरली जाते.
केळी पावडर : शिशू आहार, स्नॅक्स आणि आरोग्यवर्धक पेयासाठी उपयुक्त.
संत्री पावडर : पेय पदार्थ, मिठाई आणि औषधांमध्ये वापरली जाते.
डाळिंब पावडर : आरोग्यपूरक पदार्थांसाठी उत्तम.
स्ट्रॉबेरी आणि इतर बेरीज पावडर : बेकिंग आणि आइसक्रीमसाठी वापरली जाते.
व्यवसायाच्या संधी
अन्नप्रक्रिया उद्योग : फळांची पावडर तयार करून खाद्यपदार्थ निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना विक्री करता येते.
किरकोळ विक्री आणि ई-कॉमर्स : पॅकबंद पावडर थेट ग्राहकांना विकता येते.
निर्यात व्यवसाय : विविध फळांच्या विशेषतः नैसर्गिक आणि सेंद्रिय भुकटीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
कंत्राटी प्रक्रिया उद्योग : लहान उत्पादकांसाठी कंत्राटी स्वरूपात स्प्रे ड्रायिंग सेवा देऊन उत्पन्न वाढवता येते.
नवीन उत्पादने विकसित करणे :फळ पावडरचा उपयोग करून आरोग्यपूरक पेये, स्नॅक्स आणि प्रथिनयुक्त पदार्थ तयार करता येतात.
रिंकेश गोसावी ९७६७३९६२६६
(आचार्य पदवी विद्यार्थी, प्रक्रिया आणि अन्न आभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.