Agriculture Technology: दुभत्या पशुधनाच्या संतुलित आहारासाठी ‘टीएमआर मशिन’

Dairy Farming Technology: भारतातील दुग्ध व्यवसायात पशुधनाच्या संतुलित आहाराचा मोठा अभाव आहे. पारंपरिक खाद्यात प्रथिने, ऊर्जा, खनिजे आणि जीवनसत्त्वे यांचे प्रमाण असंतुलित असते, याचा परिणाम उत्पादनक्षमतेवर होतो. या समस्येवर तोडगा म्हणून टीएमआर (Total Mixed Ration) मशिन आधुनिक डेअरी उद्योगात महत्त्वाची भूमिका निभावत आहे.
TMR Machine
TMR MachineAgrowon
Published on
Updated on

डॉ. सचिन नलावडे

Livestock Feeding System: भारतात दुभत्या जनावरांना सामान्यतः स्थानिक पातळीवर उपलब्ध तेलबियांच्या पेंडी, चारा, पीक अवशेषांना पूरक म्हणून कोंडायुक्त खाद्य दिले जाते. यात प्रथिने, ऊर्जा, खनिजे आणि जीवनसत्त्वे प्राण्यांच्या पोषक गरजांपेक्षा कमी किंवा जास्त असल्याने एकंदरीत संतुलनाचा अभाव असतो. त्याचा विपरीत परिणाम जनावरांची उत्पादकता, आरोग्य, पुनरुत्पादनाची क्षमता, एकूणच गुणवत्ता आणि सुरक्षितता यावर होतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकूण दूध उत्पादन खर्चाच्या ७० टक्क्यांपर्यंत खर्च आहारावर करूनही अपेक्षित उत्पादन मिळेलच याची खात्री राहत नाही.

दूध उत्पादनासाठी दुभत्या जनावरांची आनुवंशिक क्षमता जितकी महत्त्वाची असते, तितकेच त्यांना योग्य ती पोषक तत्त्वे पुरवली जातात की नाही, हेही महत्त्वाचे असते. दिली जाणारी योग्य पोषक तत्त्वे ही जनावरांच्या आनुवंशिक क्षमतेला उद्युक्त करण्यासाठी उपयुक्त ठरतात. हे लक्षात घेऊनच भारतात अल्पभूधारकांच्या पशुधनाला संतुलित आहार पुरवण्याच्या उद्देशाने एका कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. त्यांच्याकडील जनावरांचे वर्गीकरण हे दूध उत्पादनाच्या आधारे १) कमी उत्पादक (< ८ किलो/दिवस), २) मध्यम उत्पादक (८ ते १२ किलो/दिवस) आणि ३) जास्त उत्पादक (>१२ किलो/दिवस) या तीन वर्गात केले गेले.

स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या खाद्य संसाधनांच्या वापरातून कमी किमतीत संतुलित शिधा तयार करणे शक्य व्हावे, यासाठी, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबी) या संस्थेने सामान्य शेतकऱ्यांनाही वापरता येईल, अशा प्रकारचे शिधा संतुलन सॉफ्टवेअर विकसित केले आहे. ही संगणकीय प्रणाली शिधा संतुलन कार्यक्रमाचा (रेशन बॅलन्सिंग प्रोग्राम- आरबीपी) कणा आहे.

TMR Machine
Dairy Farming : 'लक्ष्मी'मुळे दुग्ध व्यवसायात भरारी

या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी स्थानिक संसाधन व्यक्ती (एलआरपी) निवडलेल्या आहेत. त्या स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या खाद्य संसाधनांतून संतुलित शिधा तयार करण्यासाठी प्रशिक्षण व सल्ला देतात. पोषणष्ट्या संतुलित शिधा उपलब्ध केल्यामुळे खाद्य रूपांतरण कार्यक्षमता वाढून दैनंदिन दूध उत्पादन, त्यातील फॅटची पातळीवर वाढते. परिणामी, शेतकऱ्यांच्या पशुआहारावरील खर्चात बचत होते आणि निव्वळ उत्पन्नात वाढ होते.

आधुनिक डेअरी उद्योगामध्ये एकूण मिश्रित शिधा (टोटल मिक्स्ड रेशन - टीएमआर) ही प्रमुख खाद्य प्रणाली बनली आहे. देशभरातील संशोधन आणि शास्त्रज्ञ सातत्याने संशोधन आणि चाचण्यांमधून उत्तम शिधा निर्मितीबाबतच्या शिफारशी करत असतात. त्याला अनुभवी पोषणतज्ज्ञाची जोड देऊन संतुलित मिश्रित शिधा निर्मितीची संगणकीय प्रणाली (रेशन बॅलन्सिंग सॉफ्टवेअर) तयार केलेली आहेत. त्यामुळे त्याद्वारे दिलेल्या फॉर्म्युलेशन्सप्रमाणे वेगवेगळे घटक एकत्रित करण्यासाठी टीएमआर मशिन मोलाची भूमिका निभावतात.

त्यामध्ये मिक्सर-वॅगन किंवा डाएट फीडर यंत्र हे प्रत्येक घटकाचे योग्य व अचूकपणे वजन करून मिसळण्याचे काम करते. हे मिसळलेले खाद्य गोठ्यामध्ये जनावरांच्या समोर नेऊन ओतण्यासाठी ट्रॅक्टरचलित मिक्सर-वॅगन उपयोगी ठरतात. त्यांचा आकार ५ ते ४५ घनमीटरपेक्षा जास्त असू शकतो. काही स्वयंचलित मिक्सर वॅगन यापेक्षाही मोठे असू शकतात. शिध्यातील कोरड्या घटकाच्या (ड्राय मॅटर) प्रमाणानुसार वजन बदलते. त्यातील ओलाव्याच्या प्रमाण अधिक असल्यास वजन वाढते. उदा. १४ घनमीटर क्षमतेच्या मिक्सर-वॅगनमध्ये ४५ टक्के कोरडे घटक असणारा शिधा साधारणतः ३ टन इतका बसतो. तो ६० गायींसाठी पुरेसा ठरतो.

TMR Machine
Dairy Farming: गोपालनात आहार, आरोग्य, गोठा व्यवस्थापनावर भर

मिक्सर-वॅगनमध्ये काय असते?

ट्रॅक्टर पॉवर युनिटला जोडण्यासाठी एक ट्रॉली, एक किंवा अधिक एक्सल आणि लाइटिंग यंत्रणा बसवलेली असते. एका चॅसिसवर जोडलेल्या मिश्रण युनिट (मिक्सिंग बॉडी) मध्ये प्रत्येक कोपऱ्यात एक या प्रमाणेत चार वजन सेन्सर असतात. हे वजन सेन्सर्सद्वारे काम करणारा एक डिजिटल वजन काटा संगणकाला माहिती पुरवत राहतो. विशेष प्रणाली जोडलेल्या संगणकात नऊपेक्षा अधिक वेगवेगळ्या मिश्रित शिध्याची पाककृती व त्यातील सुमारे ९९ पेक्षा अधिक घटक त्यांच्या योग्य प्रमाणानुसार नोंदवलेल्या असतात. त्यात जनावरांच्या जन्मापासूनचा कालावधी किंवा वजनानुसार किंवा त्या देत असलेल्या दुधाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या पाककृती नोंदवलेल्या असतात.

त्यामुळे प्रणाली कोणत्याही निवडलेल्या क्रमाने मिश्रणातील सर्व घटकांचे वजन करून योग्य ती पातळी गाठताच एक दृश्यमान आणि ऐकू येणारा संदेश चालकाला सतर्क करतो. घटक पूर्ण होईपर्यंत चमकणारा प्रकाश आणि ‘बीप’ आवाजाची जलद आणि जलद पुनरावृत्ती होत असते. प्रमाण पूर्ण झाल्यावर सिग्नल २ सेकंदांसाठी सतत राहतो. त्यानंतर संगणक पुढील भरायच्या घटकाचे नाव आणि त्याचे संभाव्य वजन प्रदर्शित करतो. हे लोडिंग सामान्यतः मिक्सर-वॅगनच्या कटिंग आणि लोडिंग यंत्रणेद्वारे किंवा उच्च क्षमतेचे ट्रॅक्टरचलित लोडर तसेच टेलिस्कोपिक हँडलर वापरून केले जाते.

मिश्रण युनिटचे तीन मुख्य प्रकार

पॅडल : मिश्रण युनिटेमध्ये मध्यवर्ती आसावर अनेक पॅडलची फिरत असतात. ते शिधा सामग्री फिरवत उत्तम प्रकारे मिसळण्याचे काम करतात.

उभे गिरमीट (ऑगर) : एक, दोन किंवा तीन ऑगरसह शिधा सामग्री वरपासून खालपर्यंत हलविण्यासाठी वापरली जाते.

एक ते पाच आडवे गिरमीट (ऑगर) ः सामग्री समोरून मागे आणि खालून वरपर्यंत फिरविण्यासाठी वापरली जाते.

मिक्सिंग पॅडल, रोटर्स किंवा ऑगर हे ट्रॅक्टरच्या पॉवर टेक-ऑफ (PTO) शाफ्टशी एका प्लॅनेटरी गिअरबॉक्स / पुली किंवा चेन यंत्रणेद्वारे जोडलेले असतात.

स्थिर पत्यांच्या आणि मिक्सिंग रोटर यांच्यामध्ये लांब तंतू (फायबर) कापले जातात. मिक्सिंग दरम्यान रेशन एकजीव करण्यासाठी गुळपाणी किंवा मळी किंवा मोलॅसेससारख्या द्रव पदार्थांचाही वापर केला जातो. ते खाद्यात मिसळण्यासाठी एक हायड्रॉलिक झडप असते.

तयार झालेले मिश्रण बाहेर सोडण्यासाठी ‘अनलोडिंग सिस्टिम’ असून, ती हायड्रॉलिकवर खाली-वर करता येते.

TMR Machine
Dairy Farm Success Story : दुग्ध व्यवसायाच्या मार्गावर तांबिले कुटुंबाचा संघर्ष आणि विजय!

टीएमआरची रचना व निवड

जागतिक पातळीवर टीएमआर मशीनच्या आरेखनावर (डिझाइन) सातत्याने काम केले जात आहे. प्रक्षेत्र चाचण्या, ग्राहकांचे अभिप्राय आणि अनुभव यातून आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतात. त्यामुळे बाजारामध्ये एकाच वेळी

वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या आरेखनाचे मिक्सर उपलब्ध आहेत. त्यातील “सर्वोत्तम मिक्सर

डिझाइन कोणते?” या प्रश्‍नावर चर्चा, वादविवाद होऊ शकतात आणि वैयक्तिक मतेही असू

शकतात. मात्र एका शेतासाठी सर्वोत्तम काम करणारी मिक्सरची रचना दुसऱ्या शेतासाठी सर्वोत्तम पर्याय असेलच असे नाही. त्याऐवजी “माझ्या

परिस्थितीसाठी कोणता मिक्सर चांगला आहे?” या विचारातून निवड पद्धती राबविल्यास अधिक फायद्याचे राहू शकेल.

चाऱ्याचा आकार महत्त्वाचा : बाजार आणि ग्राहकांच्या मागणीनुसार डिझाइनमध्ये बदल होतात. उदा. मिक्सर रेशनमध्ये लांब कोरड्या गवताचा समावेश करण्याची मागणी असल्यास तसे मिक्सर मागणीनुसार तयार केले जातात. सामान्यतः गवताचा आकार कमी करून मिक्सिंग करण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यानुसार त्याचा प्रकार, आकार, शक्ती, वेळ, वेग आणि कार्यक्षमता या बाबी ठरणार आहेत. आपल्याला चारा किती बारीक लागणार आहे, हे प्रथम निश्चित करा. नंतरच त्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या मिक्सरची तुलना करा.

मिक्सरचे कार्य : दोन किंवा अधिक पदार्थ एकत्र व एकजीव करणे, हे मिक्सरचे मुख्य कार्य आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे, आर्द्रतेचे आणि घनतेचे कण योग्य प्रमाणात एकसारखे मिसळेले जाणे अपेक्षित असते. त्यातून तयार झालेले अंतिम उत्पादन हे एक सारख्या आकाराचे व एकजीव असणे गरजेचे असते. वितरणाच्या सुरुवात, मध्यभागी आणि शेवटी काढलेले नमुने समान व एकसारखेच असले पाहिजेत.त्यामुळे प्राण्यांना एकसारख्या चवीचे, संरचनेचे खाद्य मिळू शकेल. सामान्यतः कमी स्वादाच्या घटकांना प्राणी तोंड लावत नाहीत. त्यामुळे त्यांना असे पदार्थ वेगळे लागता कामा नयेत.

मिश्रणासाठी कणांची हालचाल सर्व बाजूने होण्यासाठी ऑगर्स, रील्स, चेन आणि ड्रम यांचा वापर केला जातो. एका बाजूला, लांब कोरड्या गवताचे तुकडे करण्यास सक्षम असलेले मिक्सर दुसऱ्या बाजूला त्याचे फारच लहान तुकडेही करणार नाही, यांचे संतुलन राखणे आवश्यक असते.

मिक्सर निवडताना विचारायचे प्रश्‍न ...

बाजारात टीएमआर मशिन वेगवेगळ्या प्रकारात, आकारात उपलब्ध आहेत. खरेदीदारांनी आपल्या गरजा व गोठ्यातील परिस्थिती प्रथम निश्चित करावी. त्यासाठी खालील प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपल्या परिस्थितीसाठी योग्य मिक्सर निवडता येईल.

सध्याचे पशुधन व त्यातील संभाव्य वाढ यानुसार कोणत्या आकाराचे मिक्सर आवश्यक आहे?

माझ्या मिश्रित खाद्यामध्ये कोणत्या प्रकारचे घटक असणार आहेत?

हे मिक्सर माझ्या सध्याच्या खाद्य घटकांना सामावून घेऊ शकेल का?

हे मिक्सर रेशनमध्ये आवश्यक असलेल्या कोरड्या गव्हाचे प्रमाण समाविष्ट करू शकेल का?

मिक्सर एकसमान मिश्रण देईल का?

मिक्सर दिवसातून किती तास वापरला जाईल?

स्थानिक वितरक, देखभाल व अन्य सेवा उपलब्ध आहेत का?

मिक्सरची बनावट मजबूत आणि कामायोग्य आहे का?

ट्रेलर किंवा ट्रक माउंटवर मिक्सर उपलब्ध आहे का?

कोणत्या प्रकारची मापे (स्केल) वापरली जातात?

या ब्रॅण्डचे अन्य मिक्सर किंवा अन्य ब्रॅण्डचे मिक्सर उपलब्ध आहेत का? असल्यास ते तपासून निर्णय घेणे शक्य आहे का?

माझे बजेट किती आहे?

डॉ. सचिन नलावडे ९४२२३८२०४९

(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com