
Shrimp Processing: कोळंबी प्रक्रियेमधील शिल्लक राहणारा टाकाऊ भाग म्हणजे त्यांचे कवच. त्याच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान सर्वांत मोठे आहे. अशा स्थितीमध्ये कवचाच्या विल्हेवाटीसाठी महाराष्ट्रातील लॉन्गशोर टेक्नॉलॉजीज प्रा. लि. या कंपनीने बायोरिफायनरी प्रकल्प उभारण्यात पुढाकार घेतला आहे.
देशातील या पहिल्याच कोळंबी कवच बायोरिफायनरी प्रकल्पाला भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या कोची येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी (सीआयएफटी) तांत्रिक पाठिंबा देत आहे. कोळंबी प्रक्रिया उद्योगातून अधिक नफा मिळवण्यासोबतच पर्यावरणीय दृष्टीने शाश्वतता आणण्यामध्ये या प्रकल्पाचे महत्त्व मोलाचे ठरणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतातील कोळंबी प्रक्रिया उद्योगाला कोळंबी कवच व अन्य टाकाऊ घटकांच्या व्यवस्थापनाचे आव्हान भेडसावत आहे. त्यामुळे अशा प्रकल्पांना पर्यावरणीय ओझे किंवा परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने अनारोग्यकारक मानले आहे. मात्र या कोळंबी कवचातून उच्च मूल्य असलेली चिटिन, चिटोसॅन आणि कोळंबी प्रोटीन हायड्रोलायसेट यासारखी उप-उत्पादने मिळवणे शक्य आहे.
या घटकांचा वापर कृषी, औषधे आणि सौंदर्यप्रसाधने उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. या उप-उत्पादनाच्या निर्मितीसाठी ‘सीआयएफटी’ ने बायोरिफायनरीचे प्रगत तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यातून भारताच्या नील अर्थव्यवस्थेला शाश्वत प्रोत्साहन मिळणार आहे. कारण एका प्रक्रियेतून निर्माण झालेले टाकाऊ भाग (कचरा) दुसऱ्या प्रक्रियेमध्ये कच्चा माल म्हणून वापरला जातो.
या विषयी बोलताना ‘आयसीएआर - सीआयएफटी’ चे संचालक डॉ. जॉर्ज निनान यांनी सांगितले, की हा प्रकल्प भारताच्या मत्स्यव्यवसाय उद्योगासाठी व्यावहारिक आणि विस्तारक्षम बनविण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आमची संस्था मूलभूत वैज्ञानिक संशोधन आणि त्याचा प्रत्यक्ष उद्योगातील वापर या दरम्यान असलेली दरी भरण्याच्या दिशेने काम करत आहे. कोणत्याही उद्योगामध्ये पर्यावरणपूरक शाश्वत तंत्रज्ञान क्रांती आणू शकते. त्यामुळे उद्योजकता वाढीसोबतच रोजगाराच्या संधीही निर्माण होऊ शकतात.
(स्रोत : आयसीएआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी, कोची)
...असे झाले संशोधन
२०२० मध्ये सीआयएफटीच्या वेरावल संशोधन केंद्रामध्ये या प्रवासाची सुरुवात झाली. एक तरुण उद्योजक आणि ‘ईडीआयआय, गुजरात’ येथील पदवीधर असलेले अमेय नाईक यांनी कोळंबी कचऱ्यावर काम सुरू केले. शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नाईक यांना चिटिन आणि चिटोसन आधारित उत्पादनांमध्ये तीव्र रस निर्माण झाला. यामुळे तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी कोची येथील ‘सीआयएफटी’ शी त्यांनी भागीदारी केली.
२०२२ ते २०२३ पर्यंत, ‘सीआयएफटी’ मधील मत्स्य प्रक्रिया विभाग आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. बिंदू जे. यांच्या नेतृत्वाखाली डॉ. एलावरसन के. यांच्यासह डॉ. रेणुका व्ही., डॉ. जयकुमारी ए. आणि डॉ. तेजपाल सी.एस. यांनी सहविकासक म्हणून काम केले. या शास्त्रज्ञांच्या गटाने नाईक यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी अथक परिश्रम केले. या पथकाने पथदर्शी पातळीवर अनेक चाचण्या घेत प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. आवश्यक तिथे एमपीईडीए आणि चिटिन उत्पादकांसह प्रमुख भागधारकांशी सहकार्य केले.
पर्यावरणपूरक व्यवसायाच्या दिशेने...
सध्या मुंबईतील लॉन्गशोर टेक्नॉलॉजीज प्रा. लि. ही कंपनी दररोज दोन टन कोळंबी कवचांवर प्रक्रिया करते. त्यातून कोळंबी प्रथिने हायड्रोलायसेट, चिटिन आणि चिटोसॅन तयार करते. कोळंबी प्रक्रिया उद्योगासाठी कचऱ्यावर ही प्रक्रिया असल्याने पर्यावरणपूरक ठरते. सध्या वार्षिक ४०० टन कोळंबी कचऱ्यावर प्रक्रियेची त्यांची क्षमता असून, त्यात सात व्यक्तींना कायमस्वरूपी रोजगार निर्माण झाला आहे. या व्यवसायातून प्रति वर्ष २५ लाख रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.