
Water Conservation : नाशिक जिल्ह्यातील अंतापूर (ता. सटाणा) येथील प्रगतिशील शेतकरी रोहिदास नानाजी जाधव यांची ९० एकर शेती आहे. त्यापैकी सुमारे ५० ते ५५ एकरांत ते दरवर्षी कांदा घेतात. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये त्यांचे लागवडीचे नियोजन असते. क्षेत्र मोठे असल्याने साहजिकच पाण्याचा वापर काटेकोरपणे होईल याबाबत ते दक्ष असतात. पूर्वी पाट पाणी, ठिबक सिंचनाचा वापर ते करायचे. मागील तीन वर्षांपासून त्यांनी रेन पाइप प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर करून सिंचन व्यवस्थापन सुरू केले आहे.
...असे आहे रेन पाइपचे तंत्रज्ञान
रोहिदास १३० फूट लांबी व सहा फूट रुंदी या पद्धतीने प्लॉट तयार करून कांदा लागवड करतात. प्रत्येक सहा फुटांवर रेन पाइप असतो. या संचात मेन लाइनसाठी पाइप, कनेक्टर व एण्ड लाइन प्लग (होज पाइपमध्ये दाब तयार करण्यासाठी व थांबविण्यासाठी) तसेच फिल्टरची जोडणी असते. २० मिमी. जाडीच्या लवचिक ‘मटेरियल’चा वापर करता येतो. मुख्य लाइनपासून १०० ते १२० फुटांपर्यंत नळी अंथरून वापर केला जातो. पाइपपासून ६ ते ७ फूट अंतर क्षेत्रात पाण्याचे ‘कव्हरेज’ मिळते.
ही सूक्ष्म तुषार सिंचन प्रणाली असून, जोडणी व देखरेख सोपी आहे. त्यातून पाण्याचा सतत प्रवाह राखण्यासाठी तसेच नळीवर नॅनो-पंचिंग तंत्रज्ञानावर आधारित लहान छिद्र आहे. त्याचा वापर कांदा, भाजीपाला, भुईमूग आदी लागवड अंतर कमी असलेल्या पिकांसाठी करता येतो. पावसाळा सोडून अन्य हंगामात प्रति आठ दिवसांनी एक ते दोन तास पाणी देता येते. लागवडीपूर्वी जमीन भुसभुशीत करून घ्यावी लागते. गरजेनुसार सरी तयार करून टाकून त्यावर रेन पाइप अंथरण्यासाठी ‘ले आउट’ तयार केला जातो. त्यामुळे एकसमान पाणी वितरण होते. पाण्याचा दाब एकसारखा ठेवल्याने सूक्ष्म तुषार एकसारखे ओढून कमी वेळात शेत भिजवता येते.
...असे मिळवले रेन पाइप तंत्राचे फायदे
-पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन ५० टक्के अपव्यय टळला आहे. प्रत्येक थेंब प्रभावीपणे लागवड क्षेत्रात पडतो.
-दुष्काळ असलेल्या वर्षीही कमी पाण्यात उत्पादन घेणे शक्य.
-स्वतंत्र मनुष्यबळाची गरज नाही.
-एकसारख्या पद्धतीने सिंचन वितरण होत असल्याने मातीची धूप होत नाही.
-प्रणालीचा वापर क्षेत्राच्या आकारानुसार करणे शक्य. क्षेत्राची आखणी करून जोडणी करता येते.
एकदा वापर झाल्यानंतर या नळ्या गुंडाळून पुन्हा वर्षीही वापरता येणे शक्य असते.
-अवघ्या दोन ते तीन तासांत एक एकरभर सिंचन करता येते. पूर्वी लागवड करण्यापूर्वी शेत बांधणीसाठी एकरी ३ ते ४ हजार रुपये होणारा खर्च वाचला आहे.
-रेन पाइप खरेदी व जोडणीसाठी एकरी ८ ते ९ हजार रुपये खर्च आहे. एकवेळ खरेदी केलेले साहित्य चांगले टिकविल्यास दोन ते तीन वर्षे सहज वापरता येते. अवघ्या १० हजार रुपयांच्या आत एक एकर क्षेत्रावर जोडणी करता येते.
-पूर्वी प्रवाही पद्धतीत विजेचा वापर अधिक होऊन वीजबिल वाढायचे. आता हा खर्च कमी झाला आहे. उपलब्ध पाण्याचा ३० टक्के वापर होत आहे. एकूणच पाणी, वीज, मजुरी व श्रम या सर्व घटकांत बचत झाली आहे. सुरवातीला रेन पाइपचा वापर तीन एकरांत होता. आता ५० एकर क्षेत्र या तंत्राखाली आहे.
रात्रीच्या समस्येवर मात
रोहिदास व अन्य कांदा उत्पादकांच्या अनुभवानुसार उन्हाळी कांदा लागवडीसाठी अनेकदा पाण्याची टंचाई जाणवते. लागवडीनंतर पाणी कमी पडल्यास लागवडी सोडून देण्याची वेळ येते. ग्रामीण भागात भारनियमन ही समस्या सर्वांत मोठी असते. रात्रीच्या वेळी पंप चालू करताना विजेचा धक्का, तसेच
साप, विंचू, बिबट्या आदींचा धोका असतो. मात्र पर्याय नसल्याने रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून मनुष्यबळामार्फत प्रवाही पद्धतीने पाणी द्यावे लागते. मजुरांमार्फत ही कामे करण्यासाठी एकरी ६ ते ७ हजार रुपये खर्च आहे. रेन पाइप सिंचन पद्धतीच्या वापरातून रोहिदास यांनी या समस्येवर मात केली आहे. आता जीव धोक्यात घालून रात्री सिंचन करण्याची वेळ येत नाही
उत्पादनात झाली वाढ
वाढीच्या अवस्थेत वाफसा तपासून टप्प्याटप्प्याने व काटेकोर सिंचन होत असल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे. कंद मजबूत होऊन आकार व रंगही चांगला येतो. पूर्वी एकरी १५ ते २० टन उत्पादन मिळायचे. आता ते २५ ते ३० क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. लागवड ९० दिवसांची झाल्यानंतर पाणी तोडले जाते. त्यामुळे दर्जेदार प्रतवारीचे उत्पादन मिळते आहे. मागील तीन वर्षांपासून
प्रति किलो २५ ते ३० रुपये दर मिळत आहे. गुजरात, मध्य प्रदेश व स्थानिक बाजार समित्यांमध्ये
कांद्याची विक्री होते. दहा हजार क्विंटल क्षमतेची कांदा चाळही तयार केली आहे.
याशिवाय कांदा बीजोत्पादनही दरवर्षी मोठ्या प्रमाणात असते.
वाढीच्या अवस्थेत वाफसा तपासून टप्प्याटप्प्याने व काटेकोर सिंचन होत असल्याने उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे. कंद मजबूत होऊन आकार व रंगही चांगला येतो. पूर्वी एकरी १५ ते २० टन उत्पादन मिळायचे. आता ते २५ ते ३० क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. लागवड ९० दिवसांची झाल्यानंतर पाणी तोडले जाते. त्यामुळे दर्जेदार प्रतवारीचे उत्पादन मिळते आहे. मागील तीन वर्षांपासून
प्रति किलो २५ ते ३० रुपये दर मिळत आहे. गुजरात, मध्य प्रदेश व स्थानिक बाजार समित्यांमध्ये
कांद्याची विक्री होते. दहा हजार क्विंटल क्षमतेची कांदा चाळही तयार केली आहे.
याशिवाय कांदा बीजोत्पादनही दरवर्षी मोठ्या प्रमाणात असते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.