
डाॅ. कैलास कांबळे, डाॅ. विलास साळवे
Sustainable Drying Technology : शेतीमाल वाळविण्यासाठी उपलब्ध साधन संपत्तीचा पुरेपूर वापर करू शकतात. स्वतःच्या जागेमध्ये कमीत कमी खर्चामध्ये शेतीमाल किंवा पदार्थांचे वाळवण करणे शक्य आहे. त्यासोबतच बाजारात उपलब्ध विविध यंत्रे आणि उपकरणांचाही वापर करता येतो. निर्जलीकरणाची सेवा परिसरातील शेतकरी किंवा उद्योगांना देण्याचा सेवा उद्योगही यातून उभा राहू शकतो. त्यातून ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याचे दिसून येते.
सौरऊर्जेवर चालणारी वाळवणी यंत्रे
सपाट काचेचे सौर वाळवणी यंत्र
वरील बाजूने सपाट किंवा १५ ते ४५ अंश कोनात काच बसवून एक चौकोनी बाॅक्स तयार केला जातो. त्याला एका बाजूने उघडझाप करण्यासाठी दार तयार केलेले असते. काचेवर पडलेले सूर्यकिरण बाॅक्समध्ये जातात, त्याची संपूर्ण ऊर्जा वाळवणीसाठी शोषली जाते. आत ठेवलेल्या पदार्थावर पडलेले सूर्यकिरण व आतमधील बंदिस्त गरम हवा यामुळे वाळवणीचे काम वेगाने होते.
यंत्र वापरण्याचे फायदे
सूर्यप्रकाश आणि सौर ऊर्जेवर चालत असल्याने अतिरिक्त ऊर्जेची आवश्यकता नसते.
बंदिस्त असल्यामुळे किडे, मुंग्या व वाऱ्याने कचरा जात नाही. मांजर, कुत्र्यासारखे प्राणी तोंड लावू शकत नाहीत.
घरातील जास्तीच्या भाज्या व फळे सुकविण्यासाठी उपयुक्त.
भात व डाळसुद्धा शिजते. बटाटे उकडले जाऊ शकतात.
पापड, शेवया वाळवण्यासोबतच शेंगदाणे भाजण्यापर्यंतची कामे करता येतात
इमारतीच्या छतावर किंवा अंगणात उभारणी शक्य. आकार आपल्या गरजेनुसार कमी अधिक करता येतो.
अडचणी
वाळवणीची क्षमता कमी असते.
पदार्थ सुकविण्यास ठेवणे आणि सुकलेले पदार्थ काढणे यात अधिक वेळ लागतो, परिणामी कार्यक्षमता कमी होते.
मोठे यंत्र उभारणीस अधिक खर्च येतो.
हे तयार करण्यासाठी कुशल कारागीर लागतो. तो ग्रामीण भागात शक्यतो नसतो.
काचेचा वापर केला जात असल्याने लहान मुले, गुरे किंवा अन्य घडामोडीत त्या फुटण्याचा धोका असतो. माकडांचा उपद्रव असलेल्या भागामध्ये छतावर ठेवणे धोक्याचे ठरते.
कॅबिनेट सौर वाळवणी यंत्र
सपाट काचेच्या सौर वाळवणी यंत्राला उत्तर दिशेला एक चौकोणी उभट आणि उंच कॅबिनेट जोडले जाते. त्यामध्ये पदार्थ किंवा वस्तू ठेवण्यासाठी एक किंवा अनेक रॅक केलेले असतात. त्यात दक्षिणेकडून खालच्या बाजूने बाहेरची हवा येण्यासाठी छिद्र किंवा फट ठेवून त्यावर बारीक जाळी लावली जाते. बॉक्सला काळा रंग लावलेला असून, त्यावर पडलेली सूर्यकिरणांची सर्व उष्णता शोषली जाते. परिणामी या कॅबिनेटमध्ये आलेली बाहेरची हवा गरम होते. गरम आणि हलकी झालेली हवा थोड्यावर उंचावर केलेल्या बॉक्समध्ये रॅकवर ठेवलेल्या धान्य किंवा शेतीमालामधून जाते. जाताना त्यातील आर्द्रता वाफेच्या रूपामध्ये घेऊन जाते. परिणामी, त्यातील पदार्थ वाळतात. यामध्ये प्रत्यक्ष सूर्यकिरणे पालेभाज्यांवर किंवा पदार्थावर पडत नाहीत. परिणामी पालेभाज्यांचे रंग टिकून राहतात.
फायदे
हिरव्या पालेभाज्या आणि रंगीत फळे यांचा काही अंशी रंग टिकवून वाळवण करता येते.
पदार्थ सुकविण्यास ठेवणे आणि काढून घेणे सोपे जाते.
सौर ऊर्जेवर वाळवण होत असल्यामुळे इतर कोणतीही ऊर्जा लागत नाही.
वेगळ्या कॅबिनेटमध्ये पदार्थ सुकविले जात असल्यामुळे ते अधिक सुरक्षित राहू शकतात.
अडचणी
निर्मितीसाठी अधिक खर्च लागतो.
वाळवण उष्ण हवेद्वारे होत असल्यामुळे वाळविण्याची गती थोडी कमी असते.
सौर ऊर्जा दगडांच्या थरात साठवून वाळवण करणारे यंत्र
वाळवणी यंत्रामध्येच थोडासा बदल करून हे यंत्र बनविले जाते. यामध्ये वाळविण्यासाठी ठेवलेल्या पदार्थांच्या खाली जाळीच्या उंचीपर्यंत स्वच्छ व काळ्या रंगाने रंगविलेले लहान - लहान दगडांचे थर रचले जातात. त्यावर पडलेली सौर ऊर्जा शोषली जाते. त्यातून आत येणारी हवा गरम होते. तीच गरम हवा पुढे ट्रेमध्ये ठेवलेल्या पदार्थांवरून फिरवली जाते. सूर्य मावळल्यावरही पुढे काही वेळ (साधारण दीड ते दोन तास) ही साठवलेली ऊर्जा उपयोगी पडत राहते.
सौर पाॅलीटनेल वाळवणी यंत्र
बहुतांश सौर वाळवण यंत्राच्या मोठ्या आकारामध्ये निर्मिती करताना खर्चात वाढ होते. त्याऐवजी उभारणीला सोपे व कमी खर्चाचे वाळवण यंत्र म्हणून आपण चिमणी लावलेले पाॅलीटनेल वापरू शकतो. यामध्ये आतल्या बाजूला रॅक किंवा जमिनीवर पदार्थ पसरवून वाळायला ठेवता येतात. भारतात जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर सोडल्यास जवळपास आठ महिने भरपूर सूर्यप्रकाश असतो. त्याचा उपयोग करून घेणे शक्य आहे. शेतकऱ्यांचे धान्य व अन्य शेतीमाल मोठ्या प्रमाणात वाळविण्यासाठी सौर पॉलिटनेल उपयुक्त ठरतात. निर्जलीकरणानंतर पदार्थांची साठवणक्षमता वाढते. बाजारामध्ये शेतीमाल तातडीने विकण्याचा शेतकऱ्यावरील दबाब कमी होते. परिणामी उत्तम दर मिळाल्यानंतर त्याची विक्री करून अपेक्षित फायदा मिळवू शकतो.
पारंपरिक वाळवण पद्धतीत सुधारणा
पारंपरिक पद्धतीने उन्हात धान्य वाळवणीसाठी सतरंज्या, ताडपत्री, पोते, प्लॅस्टिक कागद, शेणाने सारवलेली जागा, छत, पत्रे, सिमेंटचा कोबा केलेली जागा वापरतात. सध्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल केल्यास अनेक अडचणी दूर होऊ शकतात.
उघड्यावरचे धान्य किंवा पदार्थ वाळविण्यामध्ये हवेसोबत येणारी धूळ, कचरा येणे टाळण्यासाठी त्यावर पारदर्शक प्लॅस्टिक कागद वापरावा. फक्त दर थोड्या अंतरावर त्याला लहान छिद्रे पाडावीत. त्यातून बाष्पीभवनातून निघालेली आर्द्रता बाहेर पडू शकते. त्यामुळे कागद पारदर्शक असल्यामुळे सूर्यकिरणे सरळ धान्यावर पडतील.
तयार झालेली उष्णता आत टिकून राहील. वाहत्या वाऱ्यामुळे आतील तापमान कमी होणार नाही. थोडासा पाऊस आला तरी तो सरळ धान्यावर पडणार नाही. रात्रीच्या दव पडून पुन्हा ओलावा वाढण्याची समस्या होत नाही.
सारवण केलेल्या जागेवर, सिमेंटचा कोबा असलेल्या जागेवर किंवा घराचे छत किंवा पत्रे यावर वाळवण करता येते. त्यावर प्लॅस्टिक कागद बांधण्यासाठी भोवतीच्या भिंतीच्या कठड्यावर लोखंडी कड्या किंवा खिळे ठोकून घ्यावेत. त्याला दोऱ्यांनी चांगल्या प्रकारे बांधून घेता येईल.
डाॅ. कैलास कांबळे, ९४०४७८५८८४, (सहयोगी प्राध्यापक, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.