
Indian Agriculture Technology: मशागत होऊन पिकांच्या पेरणी किंवा लागवडीचा हंगाम सुरू होत आहे. पेरणीसाठी हवामानाचा अंदाज, पाण्याची सोय आणि जमिनीच्या मगदूर या प्रमाणे निवडलेल्या पिकाचा विचार केला जातो. पिकांची लागवड ही सामान्यतः बियाणे पेरणे, रोपांची लागवड करणे किंवा कंद (बटाटा) लावणे, टिपरी (ऊस) लावणे अशा पद्धतीने केली जाते. पद्धत कोणतीही असली तरी दोन ओळी किंवा दोन रोपांमधील अंतर ही अत्यंत महत्त्वाची बाब असून, त्यावरच प्रति हेक्टरी रोपांची संख्या निर्धारित केली जाते.
रोपांची संख्या योग्य असल्यास प्रत्येक रोपाला अपेक्षित सूर्यप्रकाश, हवा, पाणी आणि मूलद्रव्ये उपलब्ध होण्यास मदत होते. आंतरमशागतीची कामे यंत्राने व सोईस्कर करता येतात. व यंत्र त्याचा फायदा उत्पादनातून दिसतो. पिकांच्या वाढीसाठी आवश्यक मूलद्रव्ये खतांच्या रूपाने बियांखाली पेरली जाणे गरजेचे असते.
पारंपरिक पद्धतीने टोकण करताना मजूर स्वतःच्या हातानेच बिया टोकत जाते. दोन रोपांतील अंतर योग्य ठेवण्यासाठी माप म्हणून एखाद्या काठीचा, खुरप्याचा वापर करत. त्याच वापर करून छोट्या खळगा किंवा खड्डा करून प्रत्येक ठिकाणी एक बी टोकली जाई. मात्र हे बसून करावयाचे, अधिक कष्टदायक आणि वेळखाऊ काम असे. पुढे पेरणी करण्यासाठी बैलचलित चाड्याची पाभर वापरली जाऊ लागली. यामुळे शेतकरी कमी वेळात बियांची पेरणी करू शकतो. मात्र बिया सोडण्यातील कौशल्य महत्त्वाचे असून, त्या अभावी दोन बियांमधील अंतर कमी-जास्त होई. पुढे बियांसोबत खत पेरणीसाठी दुसरे चाडे वापरले जाऊ लागले.
पाभरीमध्ये सुधारणा करून टोकण यंत्राचा विकास झाला. या यंत्रणेमुळे बियाणे कार्यक्षमतेने योग्य अंतरावर पेरले जाते. स्वयंचलित पद्धतीने एक-एक बी उचलून नळ्यामध्ये सोडली जाते. यंत्राच्या फणाच्या साह्याने ते योग्य खोलीवर पेरले जाते. ही सर्व कामे योग्य प्रकारे पूर्ण केल्यास योग्य पेरणी आणि परिणामी सर्वोत्तम उत्पादन मिळण्याची शाश्वती असते. आता टोकण यंत्राच्या सर्व कामांवर लक्ष ठेवणे संवेदकांच्या (सेन्सर्स) वापरामुळे शक्य होऊ लागले आहे.
लागवड यंत्रे अचूकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध सेन्सर्सचा वापर करतात. हे सेन्सर्स मातीची स्थिती, लागवडीची खोली आणि बियांच्या आणि यंत्राच्या स्थानाचे निरीक्षण करतात. त्यामुळे वेगवेगळ्या पिके, मातीचे प्रकार यामध्येही पेरणी अनुकूल करण्यासाठी समायोजन शक्य होते. मुख्य सेन्सर्समध्ये मातीची आर्द्रता, तापमान, पीएच आणि पोषकद्रव्ये सेन्सर्स, बियाणे मोजणी, लागवडीची खोली मोजणारे सेन्सर्स समाविष्ट आहेत.
१) मातीचे सेन्सर्स :
अ) मातीतील ओलावा
मोजणारे सेन्सर्स :
पेरणीवेळी बियांच्या उगवणीसाठी वाफसा स्थिती अत्यंत महत्त्वाची असते. त्यासाठी ओलाव्याचे प्रमाण मोजणारे सेन्सर्स पेरणीयंत्रासोबत दिले जाऊ लागले आहेत. वाफसा स्थितीमध्ये पेरणीयंत्र शेतामध्ये कमी ताकदीमध्ये वेगाने जाऊ शकते. पूर्वी वाफसा तपासण्यासाठी शेतकरी माती मुठीत घेऊन तिचा मुटका बनत. तो जमिनीवर सहज सोडला जाई. मुटका व्यवस्थित बनल्यास आणि जमिनीवर पडताच सहजपणे फुटल्यास माती वाफशावर आल्याचे समजत. यात अनुभव आणि कुशलता गरजेची असे. आता ओलावा संवेदक आपल्याला जमिनीतील पाण्याची टक्केवारी दाखवतो. वेगवेगळ्या मातीसाठी वाफसा ओलावा वेगवेगळा असतो. उदा. जाडी-भरडी माती – १३ ते १५ %, पोयटा माती- २५ ते ३५% आणि चिकण माती – ४० ते ५० टक्के. या अचूक माहितीच्या आधारे शेतकरी निर्णय घेऊ शकतात.
ब) मातीचे तापमान मोजणारे सेन्सर्स :
मातीचे तापमान बियांची उगवण आणि पिकांच्या वाढीवर परिणाम करते. आपल्याकडे मातीचे तापमान १५ ते ३५ सेल्सिअस उत्तम मानले जाते. त्यावर लक्ष ठेवण्याचे काम पेरणी यंत्रातील मातीचे तापमान मोजणारे सेन्सर्स करतात.
क) मातीचा सामू (पीएच) सेन्सर्स :
मातीची आम्लता किंवा क्षारता ही पोषक तत्त्वांच्या उपलब्धतेवर परिणाम करत असते. मातीचा सामू हा ६.० ते ७.० च्या दरम्यान असल्यास जमीन सुपीक मानली जाते. जर मातीचा सामू जास्त आम्लयुक्त असल्यास (५.५ पेक्षा कमी), तर काही पोषक तत्त्वे पिकांना कमी उपलब्ध होतात. त्यात अॅल्युमिनिअमसारखी काही विषारी तत्त्वे विरघळून रोपांना हानी पोहोचवू शकतात. सामू खूप अल्कधर्मी असेल (७.५ पेक्षा जास्त), तर इतर पोषक तत्त्वे कमी उपलब्ध होऊ शकतात आणि काही वनस्पतींना वाढण्यास संघर्ष करावा लागू शकतो.
२) पोषक घटकांचे संवेदक:
हे सेन्सर्स मातीतील नत्र, स्फुरद आणि पालाश सारख्या आवश्यक पोषक तत्त्वांचे प्रमाण शोधतात. सध्या बाजारात उपलब्ध संवेदक तितके भरवशाचे नाहीत. अशा अचूक माहिती देणाऱ्या संवेदकांच्या निर्मितीवर आजही संशोधन केले जात आहे. त्यामुळे प्रयोगशाळेतील माती परीक्षण शेतकऱ्यांनी गरजेचेच समजावे. ते टाळून चालणार नाही.
३) लागवड यंत्रावरचे संवेदक :
अ) बियाणे मोजणारे संवेदक :
पेरणी यंत्रातून सोडल्या जाणाऱ्या बियाण्यांच्या प्रवाहाचे निरीक्षण करण्यासाठी सेन्सर्स वापरले जाऊ लागले आहेत. हे सेन्सर्स एक एक करून पडत असलेल्या बियांच्या प्रवाहावर लक्ष ठेवत, त्यांची मोजणी करतात. यामुळे योग्य लागवड दर सुनिश्चित होतो. कमी किंवा
दुहेरी बिया पडणे टाळता येतो. ही संवेदके नळे भरलेले किंवा चोकअप नाही ना, याबाबतचा संदेश चालकाला त्वरित पोहोचवतो. संदेश मिळताच त्यावर कार्यवाही करता येते.
ब) लागवड खोली संवेदक :
मातीमध्ये बियाणे किती खोलीवर पेरले जाते, यावरही त्याची उगवण अवलंबून असते. पिकाच्या जातीनुसार किंवा बियाण्यांच्या आकाराप्रमाणे मातीचा प्रकार, ओलावा यावर ही खोली अवलंबून असते. सामान्यतः पेरणीच्या खोलीचे समायोजन ट्रॅक्टरमधील हायड्रॉलिक यंत्रणेद्वारे केले जाई. मात्र त्याला आता खोलीविषयी सूचित करणाऱ्या संवेदकाची जोड दिली जात आहे. परिणामी सर्व बियाणे योग्य खोलीवरच पडत असल्याची खात्री करता येते.
४) जीपीएस- स्थान
निश्चिती संवेदक
अचूक पेरणीसाठी आणि एकूण किती क्षेत्रावर लागवड झाली आहे आणि किती क्षेत्र बाकी आहे हे चालकाला समजण्यासाठी उपयुक्त असे संवेदक आधुनिक पेरणी यंत्रावर जोडले जातात. या स्थान निश्चितीला अन्य अन्नद्रव्य विषयक संवेदकांच्या माहितीची जोड दिल्यास काटेकोर पद्धतीने अन्नद्रव्य नियोजनही करता येते. कमतरता असलेल्या ठिकाणी त्या त्या खताची पेरणी करता येते. उदा. शेताच्या काही भागात नत्राचे प्रमाण कमी आणि स्फुरद व पालाश जास्त आहे, अशा ठिकाणी केवळ नत्राची मात्रा दिली जाईल. यावर नियंत्रण करण्यासाठी शेताचे अचूक स्थान नकाशे तयार केले जातात. ते नियंत्रण यंत्रणेला पुरवले जातात. म्हणजे पेरणी यंत्र त्या त्या ठिकाणी पोहोचताच खतांची पेरणी करणाऱ्या संवेदके कार्यान्वित होऊन केवळ त्या आणि तितक्याच प्रमाणात खतांचे वितरण करू शकतात.
अचूक पेरणीसाठी सुयोग्य यंत्रणा
बियाणे योग्य अंतरावर पेरले जावे आणि एक एक करून बिया मातीत टाकल्या जाव्यात यासाठी टोकण यंत्रातील बिया विलगीकरण आणि मोजणी यंत्रणेला फार महत्व असते. बाजारात तिरकस तबकड्या, आडव्या तबकड्या, पट्टा आणि वायुविजन यंत्रणा असणारी पेरणी यंत्रे उपलब्ध आहेत. यापैकी तिरकस तबकड्या असणारी यंत्रे सर्वांत स्वस्त आणि कमी किचकट आहेत. या यंत्रणेमुळे बियाणे कार्यक्षमतेने वेगवेगळे करण्यासाठी खाचा असणाऱ्या तबकड्या वापरल्या जातात.
टपोरे बियाणे असणाऱ्या पिकांसाठी त्या उपयुक्त ठरतात. प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या तबकड्या वापरल्या जातात. या यंत्रणेत बिया खाचेत अडकून तिरक्या पृष्ठभागावर वर उचलून नळ्यामध्ये सोडल्या जातात. परंतु हे करत असताना अनेक वेळा कंपनांमुळे बियाणे खाचेतून निसटून बाहेर पडतात. दोन रोपांतील अंतर वाढते. कधी कधी एका खाचेत दोन बिया अडकतात आणि एकत्र पडतात. म्हणूनच योग्य खाचा असणाऱ्या तबकड्या निवडणे आवश्यक असते.
परदेशात प्रामुख्याने आडव्या व गोल आकाराच्या तबकड्या असलेल्या पेरणी यंत्राचा वापर केला जातो. या आडव्या गोल तबकड्याच्या एका बाजूने बिया हॉपरमधून घेतल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला एक एक करत नळ्यामध्ये सोडल्या जातात. जादा झालेले बिया काढून टाकण्यासाठी इजेक्टरचा वापर केला जातो. त्यामुळे या यंत्रणेमध्ये दोन बिया पडत नाहीत. या यंत्रणांचा कार्यक्षम वापर करण्यासाठी जमिनीच्या जवळ ही नियंत्रण यंत्रणा बसवली जाते. या प्रकारच्या यंत्रणेचे डिझाइन हे थोडेसे किचकट असल्यामुळे भारतामध्ये अशा प्रकारची यंत्रे फारशी प्रचलित झालेली नाहीत.
बेल्ट आधारित पेरणी यंत्रणा ही लहान आकाराच्या (भाजीपाल्याच्या) बिया किंवा मोठ्या आकाराच्या बिया पेरताना त्यात अचूक अंतर ठेवण्यासाठी वापरली जाते. यात वापरलेल्या फिरत्या पट्ट्यावर बियाच्या आकाराची छिद्रे केलेली असतात. ही यंत्रणा जमिनीच्या लगत काम करते. त्यामुळे यंत्रणेमधून बी सोडल्यानंतर लगेचच मातीमध्ये अचूक अंतरावर सोडले जाते. या यंत्रणेमध्ये अनेक छोटे-छोटे भाग असतात. त्याच्या किचकट रचनेमुळे या यंत्राच्या निर्मितीमध्ये भारतीय यंत्र निर्माते फारसे उतरलेले नाहीत. कमी उत्पादनामुळेच यांच्या किमतीही अधिक आहेत.
मात्र ही यंत्रे लहान आकाराच्या व महाग बियाण्यांच्या (उदा. भाजीपाला) पेरणीसाठी उत्तम ठरू शकतात. वायुविजन प्रणालीवर काम करणारी पेरणी यंत्रे ही सर्वात वेगवान (ताशी ५-६ किमी) आणि अचूक पद्धतीने पेरणी करू शकतात. या यंत्रणेमध्ये ट्रॅक्टरच्या पीटीओवर चालणारे पंखे हवा शोषून घेतात. त्यामुळे तयार झालेल्या निर्वात पोकळीमुळे बिया तबकडीवर धरून ठेवल्या जातात. जमिनीच्या जवळ बी पोहोचल्यानंतर ते मातीमध्ये सोडले जाते. ही संपूर्ण यंत्रणा निर्वात पोकळीच्या तत्त्वावर काम करते. यासाठी मोठ्या क्षमतेचे ट्रॅक्टर आवश्यक ठरतात. तसेच ही यंत्रे थोडीशी महाग आहेत.
डॉ. सचिन नलावडे ९४२२३८२०४९, (प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.