Agriculture Technology : मजूरसमस्येवर उपाय सांगणारी कृषी विद्यापीठाकडील यंत्रे

Agriculture Implements : अकोला येथील डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या कृषी शक्ती व यंत्र- अवजारे विभागाने सर्वसामान्य शेतकरी व त्यांच्या सध्याच्या समस्या केंद्रस्थानी ठेवून विविध यंत्रे- अवजारे विकसित केली आहेत.
Agriculture Implements
Agriculture ImplementsAgrowon

Development of Agricultural Machinery and Implements : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी शक्ती व यंत्र- अवजारे विभाग कार्यरत आहे. येथे आजवर ५० हून अधिक यंत्रे विकसित करण्यात आली आहेत. यातील बहुतांश यंत्रे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली असून, सर्वसामान्य शेतकरी केंद्रस्थानी ठेवून त्याला आर्थिकदृष्ट्या परवडतील असाही यंत्रनिर्मितींमागे विचार करण्यात आला आहे. यातील काही निवडक यंत्रांचा घेतलेला मागोवा.

रुंद वरंबा, सरी टोकण व आंतरमशागत यंत्र (बीबीएफ)

मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी, मका, भुईमूग, करडई, हरभरा, कपाशी आदी पिकांमध्ये पेरणी, मशागत, आंतरमशागत आणि जलसंधारणाच्या हेतूने बीबीएफ यंत्र बहुउपयोगी आहे.त्याच्या वापरामुळे बियाण्यांत २० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते. कमी पावसाच्या काळात वेळ, मजुरीत बचत करून उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते.

या यंत्राचा वापर सातत्याने वाढत असल्याने त्यात सातत्याने सुधारणा होत आहेत. कृषी विद्यापीठातील ‘एमएसस्सी’चे विद्यार्थी यावर अभ्यास करीत आहेत. यंत्रात बियाणे, खते ठेवण्यासाठी जो ‘ड्रम’ बसवलेला असतो त्या ठिकाणापासून नळीद्वारे बियाणे, खत खाली येते. अनेकदा ट्रॅक्टरच्या कंपनांमुळे बियाणे आजूबाजूला पडते. बियाण्याच्या ओळींत एकसमानता येत नाही. त्यामुळे दोन ओळींतील झाडांचे अंतर कमी-अधिक राहते. त्यामुळे बियाणे ठेवण्यासाठीचा ड्रम खालच्या भागात आणून हे अंतर कमी केले, तर बियाणे व्यवस्थित व आवश्‍यक तेथेच पडावे यासाठी अभ्यास केला जात आहे.

Agriculture Implements
Agriculture Technology : बहुउपयोगी पॉवर वीडर...

छोट्या ट्रॅक्टर आधारे अवशेष गोळा करणारे यंत्र

पीक काढणीनंतर त्याचे अवशेष गोळा करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. याचे कारण म्हणजे मजूरटंचाई व त्यांचे वाढलेले दर. ही समस्या दूर करण्याच्या दृष्टीने छोटा ट्रॅक्टरचलित पीक अवशेष गोळा करण्याचे यंत्र तयार केले आहे. त्याची कार्यक्षमता ०.३० हेक्टर प्रति तास आहे. सरासरी पीक अवशेष जमा करण्याची टक्केवारी ज्वारी पिकात ८१.४७, मोहरी ८२.१२ आणि तूर पिकात ८३.७३ टक्के आढळली आहे. या यंत्राद्वारे पीक अवशेष गोळा करण्यासाठी हेक्टरी ८५६ रुपयांपर्यंत खर्च लागतो.

सायकल हातकोळपे

कमी क्षेत्रावरील पिकांमध्ये दोन ओळींतील तण काढण्यासाठी विद्यापीठाने संशोधित केलेले सायकल हातकोळपे उपयोगी पडते. हलक्या लोखंडी पाइपपासून ते बनवले असून त्यास सहा, नऊ व १२ इंच रुंदीची छोटी पास लावण्यात येते. या कोळप्यामुळे माणसाला उभे राहून दिवसाला ० .१२ ते ०.१५ हेक्टर क्षेत्रावर काम करता येते. ते वजनाला हलके असून चालवण्यास सोपे आहे.

नवी अवजारे

नुकतीच डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यातील चारही कृषी विद्यापीठांची ‘जॉइंट ॲग्रेस्को’ बैठक झाली. यात या विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेली तीन महत्त्वाची यंत्रे प्रसारित झाली. ती पुढीलप्रमाणे.

ट्रॅक्टरचलित इंधन कांड्या निर्मिती

या यंत्राचे महत्त्वाचे गुणधर्म म्हणजे सोयाबीनचे काड व पऱ्हाटी यांच्यापासून १५ मिमी आकारात इंधन कांड्या तयार करता येतात. यंत्राची क्षमता प्रति तास ५० किलो आहे. सोयाबीन, कपाशी उत्पादकसाठी हे यंत्र फायदेशीर आहे. अवशेष भरणे, त्याचे मिश्रण आणि कांड्या निर्मिती यंत्रणा चालवण्यासाठी १८ ते २८ अश्‍वशक्ती क्षमतेचा छोटे ट्रॅक्टर पुरेसे ठरतो. या कांड्याचा उपयोग सुधारित शेगड्यांमध्ये करता येतो.

Agriculture Implements
Agriculture Technology : जिवाणू संवर्धक वापरण्याच्या पद्धती

रोटाव्हेटर संलग्नक पटाशी नांगर

आज शेतीकामांसाठी रोटाव्हेटरचा सर्रास वापर होतो. रोटाव्हेटरच्या अधिक वापरामुळे तयार झालेला जमिनीखालील कडक थर फोडण्यासाठी हे नवे यंत्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. या पटाशी नांगराची खोली २३ ते ४५ सेंमीपर्यंत ठेवता येते. कार्याच्या खर्चात ५८ टक्क्यांपर्यंत, तर वेळेत ४६ टक्क्यापर्यंत बचत होते. कोणत्याही रोटाव्हेटरच्या समोरील बाजूस हे यंत्र लावता येते.

हळद काढणी यंत्र

विदर्भासह राज्यातील शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे ओढा वाढत आहे. लागवड ते काढणीपर्यंत हळद उत्पादकांचा कल यंत्रांकडे आहे. त्यादृष्टीने छोट्या ट्रॅक्टरचलित हळद काढणी यंत्र बनवले आहे. त्याची काढणी कार्यक्षमता ९८.८७ टक्के तर यंत्राद्वारे हळद काढताना कंदाला होणाऱ्या नुकसानीचे प्रमाण अवघे १.३२ टक्का आढळले आहे. ०.१३ हेक्टर प्रति तास अशी यंत्राची कार्यक्षमता आहे. या यंत्राद्वारे हळद काढणीचा हेक्टरी खर्च १९१४ रुपये असून, या काढणी खर्चात ३३.२८ टक्क्यांपर्यंत बचत होते.

अन्य यंत्रांमध्ये तण नियंत्रणाच्या दृष्टीने बॅटरी इलेक्ट्रीक डवरणी, कोळपणी यंत्र तयार केले आहे. या यंत्राच्या वापराने बैलचलित डवरणी यंत्राच्या तुलनेत २७ टक्के, तर मनुष्यचलित डवरणी यंत्राच्या तुलनेत सुमारे ७३ टक्के बचत होते.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली विविध यंत्रे मी वापरत आहे. यात पेरणीचे, गादीवाफे तयार करण्याचे, सरी पाडण्याचे आदी विविध यंत्रांचा समावेश आहे. उदाहरण सांगायचे तर तूर लागवडीसाठी चार महिला मजूर लागतात. त्यांची मजुरी प्रत्येकी २५० रुपयांनुसार हजार रुपये होते. हेच काम मानवचलित पेरणी यंत्राद्वारे केल्यास एक मजूर दिवसभरात चार एकरांची पेरणी करून देतो. असाच फायदा अन्य यंत्रांनी देखील करून दिला आहे.

श्रीकृष्ण ठोंबरे, कान्हेरी सरप, जि. अकोला, ९९२१६८४०९२

डॉ. एस. एच. ठाकरे, ९७६३७०५१००, विभागप्रमुख, कृषी शक्ती व अवजारे विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com