सोयाबीन, तूर पिकासाठी सुधारित पेरणी पद्धती काय आहे?

सलग सोयाबीन किंवा सोयाबीन तूर आंतरपिकाच्या पेरणीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरचलित किंवा बैलजोडीचलित पेरणी यंत्राच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण सुधारित पेरणी पद्धतींचा अवलंब करता येतो. त्यामुळे सोयाबीन पिकातील समस्या कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होते.
Soybean
SoybeanAgrowon

सोयाबीन पिकाच्या उत्पादन खर्चामध्ये (Soybean Input Cost) मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बियाणे (Seed), रासायनिक खते (Chemical Fertilizer), कीडनाशके (Pesticide) यातील खर्चात बचत करण्यासोबतच पिकाचे उत्पादकता (Crop Yield) आणि प्रत, दर्जा यात वाढ करण्याची आवश्यकता वाढत आहे. त्या अनुषंगाने सोयाबीन पीक व्यवस्थापनामध्ये पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन तसेच कीड व रोगांचे व्यवस्थापन या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहे.

कोरडवाहू परिस्थितीत पावसात मोठा खंड पडल्यास किंवा अतितीव्र पाऊस होऊन जास्त कालावधीपर्यंत पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्यास सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होते. कमी पाऊसमानात पिकाची वाढ खुंटते. तर जास्त पाऊस झाल्यास पिकाची अतिरिक्त वाढ होऊन नुकसान होते. दाटलेल्या सोयाबीन पिकामध्ये किडी व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. नियंत्रणासाठी फवारणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करता येत नाही. सोयाबीन पिकातील समस्या कमी करून उत्पादन खर्चात बचत करण्याच्या अनुषंगाने नावीन्यपूर्ण सुधारित पेरणी पद्धतींचा अवलंब फायदेशीर ठरतो. ट्रॅक्टरचलित किंवा बैलजोडीचलित पेरणी यंत्राच्या माध्यमातून सहजपणे नावीन्यपूर्ण सुधारित पद्धतीने पेरणी करता येते.

सलग सोयाबीन किंवा सोयाबीन तूर आंतरपिकाच्या पेरणीसाठी सामान्यपणे ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राच्या मदतीने ७ दात्यांचा, ६ दात्यांचा किंवा ५ दात्यांचा (लहान ट्रॅक्टर) वापर करतात. तर बैलजोडीचलित पेरणीयंत्र वापरताना तिफण, चौफण, तिदाती अथवा चारदाती काकरी व सरत्याचा वापर शेतकऱ्यांकडून केला जातो. या उपलब्ध पेरणी यंत्राचा वापर करून सहजपणे नावीन्यपूर्ण सुधारित पेरणी पद्धतींचा अवलंब करता येतो.

अ) ट्रॅक्टरचलित सातदात्याचे पेरणी यंत्र ः

१) जोडओळ पद्धतीने पेरणी ः

मोठ्या ट्रॅक्टरच्या सातदाती पेरणीयंत्राद्वारे जोडओळ पद्धतीने पेरणी करताना पेरणी यंत्राच्या बियाणे व खताच्या कप्प्यातील पहिले, मधले (४ क्रमांकाचे) व शेवटच्या (७ क्रमांकाच्या) छिद्रामध्ये बोळा कोंबून किंवा टिकली लावून बंद करावे. प्रत्येक वेळी पलटून येताना व जाताना पेरणीयंत्राचे शेवटचे दाते, शेवटच्या खाली काकरात ठेवावे. म्हणजेच जोडओळीत पेरणी होईल व प्रत्येक तिसरी ओळ रिकामी राहील. या पद्धतीद्वारे पेरणी केल्यामुळे बियाणे व रासायनिक खतांमध्ये सुमारे ३३ टक्क्यांपर्यंत बचत शक्य होते.

२) जोडओळ पद्धतीत टोकण पद्धतीने पेरणी ः

मोठ्या ट्रॅक्टरच्या सातदाती पेरणी यंत्राद्वारे टोकन पद्धतीने पेरणी करताना पेरणी यंत्राचे बियाणे व खताच्या कप्प्यातील पहिल्या, मधल्या व शेवटचे छिद्र बंद करावे. तसेच जोडओळीतील बियाण्याचा कप्पा रिकामा ठेवावा. आणि खतांच्या कप्प्यात केवळ रासायनिक खते भरून खत पेरून घ्यावे. अशाप्रकारे शेतात हलक्या सऱ्या पाडल्या जाऊन सोबतच जोडओळीच्या सऱ्यांमध्ये खतमात्रा दिली जाईल. त्यानंतर खतांच्या मात्रा दिलेल्या सरीमध्ये (काकरामध्ये) मजुरांच्या साह्याने टोकण पद्धतीने बियाण्यांची पेरणी करावी. दोन झाडांतील अंतर ८ ते १० सेंमी राखून प्रत्येक ठिकाणी २ ते ३ बियाणे टोकण पद्धतीने लावावे. पेरणीसाठी मनुष्यचलित टोकणयंत्राचा देखील वापर करता येतो. अशाप्रकारे जोडओळीत पेरणी करताना प्रत्येक तिसरी ओळ रिकामी राहते. या पद्धतीने पेरणी केल्यामुळे बियाण्याची ४० टक्के, तर खतांची ३३ टक्क्यांपर्यंत बचत शक्य होते.

Soybean
खरिपात शेतकऱ्यांकडून तूर, उडीद लागवडीस पसंती

३) सलग सोयाबीनसाठी तीन ओळींची पट्टापेर पेरणी पद्धत ः

मोठ्या ट्रॅक्टरच्या सातदाती पेरणी यंत्राने पेरणी करताना यंत्राचे बियाण्याचे व खताच्या कप्प्यातील मधले (४ क्रमांकाचे) छिद्र टिकली लावून किंवा बोळा कोंबून बंद करावे. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी येताना आणि जाताना एक ओळ सुटेल एवढे अंतर मोकळे सोडावे. (पेरणीचे दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी असल्यास या ठिकाणी साधारणतः ९० सेंमी म्हणजे ३ फूट अंतर मोकळे राहील) म्हणजेच तीन-तीन ओळींच्या पट्ट्यामध्ये पेरणी होईल. या पेरणी पद्धतीत बियाणे व खतांची २५ टक्के बचत शक्य होते.

४) सलग सोयाबीनसाठी पाच ओळींची पट्टापेर पेरणी पद्धत ः

मोठ्या ट्रॅक्टरच्या सातदाती पेरणी यंत्राने पेरणी करताना पेरणी यंत्राचे बियाणे व खताच्या कप्प्यातील पहिले आणि शेवटचे छिद्र बोळा कोंबून किंवा टिकली लावून बंद करावे. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी येताना व जाताना पेरणी यंत्राचे शेवटचे दाते शेवटच्या मोकळ्या काकरात ठेवावे. म्हणजेच पाच-पाच ओळींच्या पट्ट्यात पेरणी होईल आणि प्रत्येक सहावी ओळ रिकामी राहील. या पेरणी पद्धतीत बियाणे व खतांची १७.५ टक्के बचत शक्य होते.

Soybean
कर्नाटकात सूर्यफूल, सोयाबीन लागवडीस प्राधान्य; तूर,उडदाचे क्षेत्रही वाढले

५) सलग सोयाबीनसाठी सहा ओळींची पट्टापेर पेरणी पद्धत ः

मोठ्या ट्रॅक्टरच्या सातदाती पेरणी यंत्राने पेरणी करताना पेरणी यंत्राचे बियाणे व खताच्या कप्प्यातील मधले म्हणजेच चार क्रमांकाचे छिद्र बंद करावे. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी येताना व जाताना प्रचलीत पद्धतीप्रमाणे पेरणी केल्यास सहा- सहा ओळींच्या पट्ट्यात पेरणी होईल. आणि प्रत्येक सातवी ओळ रिकामी राखली जाईल. या पद्धतीत बियाणे व खतांची १४.५ टक्के बचत शक्य होते.

६) सलग सोयाबीनसाठी सात ओळींची पट्टापेर पेरणी पद्धत ः

मोठ्या ट्रॅक्टरच्या सात दाती पेरणी यंत्राने पेरणी करताना ट्रॅक्टर प्रत्येक वेळी येताना व जाताना एक ओळ सुटेल एवढे अंतर सोडावे. (उदा. दोन ओळीतील अंतर ४५ सेंमी असल्यास, साधारणत: ९० सेंमी म्हणजे ३ फूट अंतर सुटेल) म्हणजेच शेतात सात-सात ओळींच्या पट्ट्यात पेरणी होईल आणि प्रत्येक आठवी ओळ रिकामी राहील. या पद्धतीत बियाणे व खताची १३.५ टक्क्यांपर्यंत बचत शक्य होते.

ब) ट्रॅक्टरचलित सात दात्यांचे पेरणीयंत्र

१) सोयाबीन : तूर आंतरपिकासाठी पट्टापेर पेरणी पद्धत ः

कोरडवाहू परिस्थितीत प्रामुख्याने सोयाबीन आणि तूर आंतरपीक पद्धतीत ६ ओळी सोयाबीन आणि १ ओळ तूर किंवा ५ ओळी सोयाबीन आणि २ ओळी तूर या प्रमाणे ट्रॅक्टरचलित सात दात्याच्या पेरणी यंत्राने पेरणी केली जाते. या आंतरपीक पद्धतीत तुरीचे पीक पूर्णपणे दुर्लक्षित राहते. सोयाबीन पिकाप्रमाणे तूर पिकाला मुख्य पिकाचा दर्जा मिळत नाही. त्यामुळे तुरीच्या झाडावरील खालच्या फांद्या पिवळ्या पडून वाळतात, सडतात आणि गळून पडतात. परिणामी, उत्पादनात मोठी घट येते. आंतरपीक पद्धतीत सोयाबीन आणि तूर पिकास समान दर्जा दिल्यास, तूर पिकापासून देखील शाश्‍वत उत्पादन मिळू शकते. याकरिता सोयाबीन : तूर आंतरपीक पद्धतीत ट्रॅक्टरचलित सात दाती पेरणी यंत्राने पट्टापेर पद्धतीचा करावा. या पद्धतीने पेरणी केल्यामुळे तूर पिकाच्या दोन्ही बाजूंस रिकामी ओळ राहून पिकास पुरेशी मोकळी जागा, हवा, मुबलक सूर्यप्रकाश मिळतो.

पेरणी पद्धत ः

ट्रॅक्टरचलित सात दात्याच्या पेरणी यंत्राच्या मधल्या (४ क्रमांकाच्या) कप्प्यात तूर बियाणे आणि खताच्या कप्प्यात खत भरावे. त्यानंतर तुरीच्या दोन्ही बाजूंचा प्रत्येकी एक कप्पा (बियाणे व खताचा) बंद करावा. उरलेल्या दोन्ही बाजूंच्या काठावरील प्रत्येकी एका कप्प्यांत सोयाबीन बियाणे आणि खत भरावे. अशाप्रकारे पेरणी नियोजन केल्यास ट्रॅक्टर प्रत्येक वेळी येताना व जाताना काठावरील सोयाबीनच्या दोन ओळींच्या बाजूला पुन्हा दोन ओळी सोयाबीनच्या येतील. म्हणजेच शेतात चार ओळी सोयाबीन- रिकामी ओळ- तुरीची एक ओळ- रिकामी ओळ- सोयाबीनच्या चार ओळी अशी पेरणी होईल.

क) टॅक्टरचलित सहा दात्यांचे पेरणी यंत्र ः

१) सलग सोयाबीनसाठी चार ओळींची पट्टापेर पेरणी पद्धत ः

मोठ्या ट्रॅक्टरच्या सहा दाती पेरणी यंत्राने पेरणी करताना यंत्राच्या बियाणे व खताच्या कप्प्यातील पहिले व शेवटचे छिद्र बोळा कोंबून अथवा टिकली लावून बंद करावे. ट्रॅक्टर प्रत्येक वेळी येताना व जाताना पेरणी यंत्राचे शेवटचे दाते खाली काकरात ठेवावे. म्हणजेच प्रत्येक पाचवी ओळ रिकामी राहील आणि शेतात ४-४ ओळींच्या पट्ट्यांमध्ये बीबीएफ यंत्राप्रमाणेच पेरणी होईल. या पद्धतीत बियाणे व खताची २० टक्क्यांपर्यंत बचत शक्य होते.

२) सलग सोयाबीनसाठी सहा ओळींची पट्टापेर पेरणी पद्धत ः

मोठ्या ट्रॅक्टरच्या सहा दाती पेरणी यंत्राने पेरणी करताना पेरणी यंत्र प्रत्येक वेळी येताना व जाताना एक ओळ सुटेल एवढे अंतर खाली ठेवावे. (उदा. दोन ओळींतील अंतर ४५ सेंमी असल्यास या ठिकाणी साधारणत: ९० सेंमी म्हणजेच ३ फुटांची जागा खाली राहते). म्हणजेच प्रत्येक सातवी ओळ रिकामी राहते आणि शेतात सहा-सहा ओळींच्या पट्ट्यांमध्ये पेरणी होईल. या पद्धतीत बियाणे व खताची १५ टक्क्यांपर्यंत बचत शक्य होते.

जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७

(सहयोगी प्राध्यापक, कृषिविद्या विभाग, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com