
चंद्रकांत जाधव
Farming Technology: मजुरांची टंचाई लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्यातील पिचर्डे येथील शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाचे पाऊल उचलले. त्यांनी गिरणाई शेतकरी गटाची स्थापना केली. त्या अंतर्गत अवजारे बॅंक स्थापन केली. त्यात पेरणीपासून ते मळणीपर्यंतची विविध यंत्रे उपलब्ध केली. आज १२० एकर क्षेत्र व दोनशे शेतकऱ्यांना यंत्रांची सेवा मिळून वेळ, मजुरी व श्रम यात बचत करण्यासह एकरी उत्पादनवाढ करणेही शक्य झाले आहे.
पिचर्डे (ता. भडगाव, जि. जळगाव) हे गिरणा नदीकाठी वसलेले गाव आहे. या भागात काळी कसदार, मध्यम प्रकारची जमीन आहे. केळी, मका, कापूस, ज्वारी, हरभरा आदी पिके या भागात होतात. नदीकाठचा भाग असल्याने जलसाठे मुबलक आहेत. येथील शेतकऱ्यांना सर्वांत मोठी समस्या जाणवायची ती म्हणजे मजूर समस्येची. त्यामुळे यांत्रिकीकरणावर भर देण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. मात्र पेरणी ते मळणीपर्यंतची यंत्रे महाग असल्याने सर्वच शेतकऱ्यांना ती खरेदी करणे शक्य नव्हते.
त्यांना ती अन्य गावांमधून आणावी लागायची. यात वेळ, पैसा अधिक खर्च व्हायचा. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी गावातील शेतकरी एकत्र आले. त्यांनी २०२० मध्ये गिरणाई शेतकरी गट स्थापन केला. गटाच्या माध्यमातून विविध यंत्रांची उपलब्धता करण्यावर एकमत झाले. राजेंद्र पाटील यांनी अध्यक्षपद, राजेंद्र एकनाथ येवले उपाध्यक्षपद तर सचिव म्हणून दीपक धर्मराज महाजन यांनी जबाबदारी स्वीकारली. गटाचे सुमारे पंधरा सदस्य आहेत.
यंत्रांमुळे कामे झाली सुकर
शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेत पिचर्डे गावाचा समावेश झाला. त्याअंतर्गत कृषी विभागाच्या मदतीने यंत्रे- अवजारांची बॅक स्थापन करण्यासाठी अनुदान मिळवण्याचा गटाचा प्रयत्न सुरू झाला. यंत्रांची निश्चिती झाली. प्रस्ताव दाखल झाला. सुरवातीला शंभर टक्के आर्थिक गुंतवणूक गटाने केली. योजनेतून पुढे ६० टक्के अनुदान मिळाले. आज ५० एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, ट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी (बीबीएफ) यंत्र, टिलर, ट्रॅक्टरचलित मोठे मळणी यंत्र, कडबा कुट्टी यंत्र, हायड्रॉलिक नांगर आणि यंत्रे- अवजारांसाठी शेड अशी सुविधा गटाने विकसित केली आहे.
गाव परिसरातील सुमारे १२० शेतकरी व दोनशे एकरांसाठी खरिपात मका, तूर, उडीद, सोयाबीन, रब्बीमध्ये हरभरा, गहू मका, ज्वारी तर उन्हाळी हंगामात बाजरी आदी पिकांसाठी यांत्रिक सेवा देणे शक्य झाले आहे. गटाला कृषी विभागाचे मार्गदर्शनही मिळाले आहे. यंत्रामध्ये गरजेनुसार काही सुधारणाही केल्या आहेत. बीबीएफद्वारे पेरणीसाठी शेतकऱ्यांकडून एकरी एक हजार रुपये शुल्क घेण्यात येते. भडगाव तालुक्यात कृषी विभागाच्या मालकीचे ७० एकर क्षेत्र आहे. तेथे शेतकऱ्यांसाठी पीक प्रात्यक्षिक प्लॉट तयार केले जातात. या क्षेत्रात गिरणाई गट कृषी विभागाला बीबीएफ पद्धतीने पेरणी करून देण्याची सेवा करीत आहे. त्याचा कृषी विभागाकडून मोबदला मिळतो.
वेळ, श्रमात बचत, उत्पादनवाढ
गटाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणतात, की बीबीएफ यंत्राच्या वापराचे अनेक फायदे शेतकऱ्यांना होत आहेत. उदाहरण द्यायचे तर हरभरा पेरणीसाठी पूर्वी एकरी २८ क्विंटल बियाणे लागायचे. बीबीएफ यंत्राच्या वापराने आता १८ ते २० क्विंटल एवढेच बियाणे लागते. म्हणजे एकरी ८ ते १० क्विंटल बियाणे बचत झाली आहे.
सर्व पिकांसाठी गादीवाफा (बेड) पद्धत असल्याने मूलस्थानी जलसंवर्धन आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊ लागला. एकूण व्यवस्थापनातून एकरी उत्पादनवाढ शेतकऱ्यांना मिळत आहे. पूर्वी सोयाबीनचे एकरी पाच- सहा क्विंटल उत्पादन मिळायचे. आता त्यात चार-पाच क्विंटलची वाढ झाली आहे. पाटील सांगतात, की पेरणीपासून ते मळणीपर्यंतच्या सर्व यांत्रिक सेवा गटाच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना मिळत असल्याने अन्य भाडेतत्त्वावरील सेवांच्या तुलनेत त्यांना एकरी शुल्कात देखील सवलत मिळते.
केळीतील मुगाने वाचविला खर्च
गिरणाई गटाचे सदस्य निर्यातक्षम केळी उत्पादन घेण्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यांना ममुराबाद (ता. जळगाव) येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ किरण जाधव यांचे मार्गदर्शन लाभते. गटाचे अध्यक्ष पाटील यांची पाच एकर केळीबाग आहे. दोन वर्षांपासून केळीत मुगाचे आंतरपीक ते घेऊ लागले आहेत. यात जूनमध्ये मूग तर ऑगस्टमध्ये केळी लागवड होते. सुमारे ७० ते ८० दिवसांनी मूग काढणीस येतो. द्विदल पीक असल्याने त्याचा पाला केळीबागेत खत म्हणून उपयोगी होतो.
त्यातून जमीन सुपीक होण्यास मदत होते. मुगाचे एकरी दोन क्विंटल तर केळीचे २५ चे ३० टन उत्पादन मिळते. पाटील सांगतात की केवळ मूग घ्यायचा झाला तर सरी पाडणे व पेरणी असा एकरी खर्च २५०० रुपये येतो. तर केळीत मूग घेण्याच्या पद्धतीत खर्चात मोठी बचत होते. आठ फुटी सरी पद्धतीत तुरीत सोयाबीनचा प्रयोगही खर्चात बचत करणारा ठरत असल्याचे ते सांगतात. मागील वर्षी पाटील यांना केळी महासंघातर्फे एका कार्यक्रमात केळीरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
मळणीचे काम झाले जलद
पेरणीबरोबरच मळणीसाठीही मजूर व यंत्रे वेळेवर मिळत नाहीत. परंतु गटाने मका, गहू, हरभरा, ज्वारी, तूर आदींसाठी ट्रॅक्टरचलित मळणी यंत्राची सेवा देण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी छोट्या यंत्रांद्वारे दिवसाला जिथे ५०- ६० क्विंटल धान्यांपर्यंत मळणी व्हायची तेथे आता या यंत्राद्वारे १५० ते २०० क्विंटलपर्यंत मळणी होऊ लागली आहे. ज्वारी मळणीसाठी प्रति क्विंटल १२० रुपये, मका, ७० रुपये, तूर ५०० रुपये, हरभरा २५०, बाजरी १००, सोयाबीन ३०० रुपये शुल्क आकारले जाते. गटाची कृषी अवजार बँकेच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे पाच लाख रुपयांपर्यंत उलाढाल होते. गटाला विविध संस्थांकडून पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
कुट्टी यंत्राची सेवा
पिचर्डे परिसर दुग्धोत्पादनात अग्रेसर आहे. या भागात पशुधनासाठी चाऱ्याची मोठी मागणी असते. खरीप व रब्बी हंगामानंतर शेतकरी कोरडा चारा पशुधनासाठी साठवितात. त्यासाठी आवश्यक कडब्याची कुट्टी करण्यासाठीही गटातर्फे यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. दररोज १० ते २० एकर क्षेत्रातील मका, दादर ज्वारी, बाजरी आदींच्या कडब्याची कुट्टी यंत्राच्या साह्याने केली जाते.
राजेंद्र पाटील ९३७०८४६५२० (अध्यक्ष, गिरणाई गट)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.