शैलजा तिवले, गोपाल महाजन
Waste Management : मुंबईतील ‘आयआयटी’मध्ये दर दिवशी झाडांपासून निर्माण होणाऱ्या सुमारे दोन टन जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणे संस्थेसाठी आव्हानात्मक झाले होते. कचऱ्याच्या विघटनासाठी कंपोस्ट खत हा एक पर्याय असला तरी इतक्या मोठ्या प्रमाणातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो फारसा सोईचा नव्हता. याचे प्रमुख कारण म्हणजे कंपोस्ट खत करण्यासाठी लागणारी जागा, कालावधी आणि मनुष्यबळ.
यावर पर्याय म्हणून आयआयटीच्या रुटॅग विभागाने जैविक कचऱ्यापासून कांड्या बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. या कांड्याचा इंधन म्हणून वापर करण्यासाठी सुधारित गॅसिफायरची निर्मिती केली.
या कांड्याचा वापर वसतिगृहांमधील सामाईक स्वयंपाकगृहामध्ये अन्न शिजविण्यासाठी केला गेला. या उपक्रमामध्ये गॅसिफायर आणि जैविक कांड्यांची निर्मिती या दोन टप्प्यांवर महत्त्वाचे संशोधन करण्यात आले.
गॅसिफायर रचनेमध्ये बदल :
बाजारात उपलब्ध असणाऱ्या टेरी गॅसिफायरमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर केला जातो. लाकडाऐवजी जैविक कचऱ्याचा वापर करण्याचा प्रयोग आयआयटी मुंबईने केला. लाकडापासून सुमारे ३ टक्क्यांपेक्षा कमी राख निर्माण होते. ही गॅसिफायरमध्ये सहजपणे खाली फेकली जाते. परंतु जैविक कचऱ्यापासून राख निर्मिती मोठ्या प्रमाणात होते.
परिणामी, गॅसिफायरमध्ये राख जास्त तापमानावर जमा होत असून, त्यापासून राखेचे कडक गोळे तयार होत असल्यामुळे राख खाली फेकली जात नाही. हे गोळे अडकल्याने गॅसिफायरची कार्यक्षमता कमी होते किंवा बंद पडते. ही अडचण प्रामुख्याने निर्माण होत असल्याचे या आयआयटी मुंबईतील या प्रकल्प व्यवस्थापक प्रबोध गडकरी यांनी सांगितले.
या अडचणीवर मात करण्यासाठी ‘आयआयटी’मधील प्राध्यापक संजय महाजनी यांच्या मार्गदर्शनानुसार मूळ गॅसिफायरची संरचना बदलण्यात आली. राखेचे कडक गोळे निर्माण होऊ नये यासाठी गॅसिफायरमध्ये तापमान योग्य प्रमाणात राखले जाईल, हवेचे प्रमाण नियंत्रित आणि सर्वत्र सम प्रमाणात ठेवले जाईल अशी रचना केली. त्यामुळे जैविक कचऱ्याच्या राखेचे कडक गोळे तयार न होता ती सहजपणे खाली फेकली जाते. यामुळे या नव्या गॅसिफायरमध्ये जैविक कचऱ्याचा वापर करणे सोपे झाले आहे.
अगोदर हा गॅसिफायर पेटविण्यासाठी डिझेल, केरोसीनचा वापर करत मशाल पेटवावी लागत होती. मशाल योग्य रीतीने पेटवणे आणि ती गॅसिफायरमध्ये टाकणे किचकट असल्याने हा गॅसिफायर सुरू करणे अवघड होते. यामध्ये बदल करत विद्युत कॉइलचा वापर करून गॅसिफायर लगेचच पेटविण्याची सुविधा केली आहे.
लाकूड लगेचच पेट घेत नसल्याने लाकडावरील आधारित गॅसिफायरमध्ये हे शक्य नाही किंवा संशोधनाची गरज आहे. परंतु जैविक कचऱ्याच्या कांड्या हा तुलनेने लवकर पेट घेत असल्याने हा गॅसिफायर विद्युत पद्धतीने सुरू करणे सोपे होते.
जुन्या गॅसिफायरमधील बर्नर फारसे कार्यक्षम नव्हते. नव्या रचनेमध्ये बर्नरची रचना बदलून जास्तीत जास्त गॅस जाळला जाईल आणि धूररहित ज्वलन होण्याची काळजी घेतली आहे. त्यामुळे बर्नरची कार्यक्षमता वाढलेली आहे.
काडी कचऱ्यापासून कांड्या निर्मिती :
शेतातील काडी कचऱ्याचा गॅसिफायरमध्ये वापर करण्यासाठी आयआयटीच्या रुटॅग अंतर्गत प्रबोध गडकरी आणि त्यांच्या संशोधन गटाने कचऱ्यापासून दंडगोल आकाराच्या कांड्या तयार करण्याऱ्या यंत्राची निर्मिती केली.
यामध्ये कचरा मातीपासून वेगळा केला जातो. त्यानंतर त्याचा भुगा केला जातो. या भुग्यापासून यंत्रामध्ये कांड्या बनविल्या जातात. या कांड्या लाकडाच्या तुकड्यांप्रमाणे गॅसिफायरमध्ये सहजपणे टाकता येतात. वसतिगृह, आश्रमशाळा अशा ठिकाणी पाणी तापविण्यासाठी विद्युत ऊर्जा वापरण्याऐवजी या कांड्याचा वापर करून बॉयलर वापरणे शक्य आहे.
काडीकचरा उपलब्ध असल्यास यंत्रामध्ये कांड्या तयार करण्याचा खर्च हा सुमारे एका किलोमागे तीन ते चार रुपये असतो. आता जिथे काडीकचरा मोठ्या प्रमाणात नाही तिथे शेतातील काडीकचरा विकत घेऊनही कांड्या बनविणे शक्य आहे.
शेतीमधील वाया जाणारा काडीकचरा खरेदी करून कांड्या बनविण्यासाठी साधारण सहा ते सात रुपये प्रतिकिलो खर्च येतो. या कांड्यांची बाजारात मागणी असून, सुमारे १४ ते २० रुपये किलोने विक्री केली जाते. त्यामुळे कांड्या निर्मितीचा लघुउद्योगही फायदेशीर ठरतो. याचा विस्तार करण्याचे काम रुटॅगमार्फत केले जाते.
व्यावसायिक पद्धतीने गॅसिफायरचा वापर :
प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या हा उपक्रम आर्थिक आणि पर्यावरणदृष्टीने फायदेशीर असल्याची खात्री झाल्यानंतर याचा वापर व्यावसायिक पद्धतीने करण्याचा पुढचा टप्पा रुटॅगने गाठला आहे.
आश्रमशाळेमध्ये स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजीऐवजी जैविक कचऱ्याचा वापर करणारे गॅसिफायर बसविण्याचा प्रकल्प यवतमाळच्या उमरी गावातील गाडगे महाराज मिशन आश्रमशाळेत करण्यात येत आहे.
शेतातील कापूस काढल्यानंतर उरलेला काडी कचरा गोळा करून त्यापासून कांड्या बनविण्याचे काम गावातील महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे साह्यित स्वयंसाह्यता गटामार्फत सुरू करण्यात आले आहे. या कांड्यांच्या निर्मितीसाठी आश्रमशाळेच्या आवारातील जागा दिल्याने स्वयंसाह्यता गटांना काम करणे सोपे झाले आहे.
उत्पादित कांड्या आश्रमशाळेद्वारे वापरल्या जाणार आहेत. या उपक्रमामुळे बचत गटांना उद्योगाची संधी मिळणारच आहे, याशिवाय शेतामधील काडीकचऱ्याचा योग्य वापर होणार आहे. गॅसिफायरमुळे आश्रमशाळेचा एलपीजी गॅस वापराच्या खर्चात यामुळे बचत होईल, असे माजी मुख्याध्यापक भाऊराव राठोड सांगतात.
जैविक कचऱ्याचा इंधन म्हणून वापर केल्यामुळे इंधनासाठी लाकूडतोडीचे प्रमाणही कमी होण्यास निश्चितच मदत होईल. या प्रकल्पास कोल इंडिया लिमिटेडतर्फे सीएसआर निधी साह्य मिळाले आहे.
कांडी कोळशावर आधारित गॅसिफायरचे फायदे
लाकडाचा इंधन म्हणून वापर केलेला गॅसिफायर (१० किलो प्रति तास क्षमता) सुरू करण्यासाठी किमान २० ते ४० मिनिटांचा कालावधी लागतो. मोठ्या गॅसिफायरमध्ये हा कालावधी आणखी जास्त असतो. परंतु कांडी कोळशावर आधारित गॅसिफायर पाच मिनिटांमध्ये सुरू होतो.
आश्रमशाळेमध्ये दिवसाला २० किलो एलपीजी आवश्यक असून, त्याचा खर्च १४०० ते १८०० रुपये होतो. या ठिकाणी जैविक कांड्याचा वापर करण्यासाठी सुमारे ८०० ते १००० रुपये लागतात. जैविक कचऱ्याच्या वापरातून सुमारे ४०० ते ६०० रुपयांची बचत होते. अशारीतीने जैविक कचऱ्याचे गॅसिफायर व्यावसायिक ठिकाणी फायदेशीर ठरतो.
जैविक कचऱ्याचा इंधन म्हणून वापर करणे, इंधनासाठी वृक्षतोड कमी करणे, गाव पातळीवर रोजगार निर्मिती करणे आणि कचरा जाळण्यामुळे निर्माण होणारे प्रदूषण रोखणे अशा उद्देशातून निर्माण केलेल्या गॅसिफायरचा उपयोग आर्थिक, व्यावसायिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या निश्चितच फायदेशीर ठरत आहे.
प्रबोध गडकरी, ९९८७९९५५९९
(प्रकल्प व्यवस्थापक, आयआयटी, मुंबई)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.