Waste Water Treatment : सांडपाणी शुद्धीकरणात जलपर्णी ठरते मोलाची

Water Sewage Treatment : जलपर्णी सांडपाण्यातील प्रदूषके शोषून घेण्याचे कामही वेगाने करते. त्यामुळे तिचा योग्य प्रकारे वापर केला तर पाणी शुद्धीकरणामध्ये ती अत्यंत मोलाची ठरू शकते.
Water Hyacinth
Water HyacinthAgrowon

सतीश खाडे

जलपर्णी ही पाणी प्रदूषित असल्याचे निदर्शक किंवा पुरावा आहे. पाण्यामध्ये जलपर्णी वाढली तर तिला दोष देण्यापेक्षा पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी आपणच प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे समजले पाहिजे. उलट जलपर्णी ही काही प्रमाणात प्रदूषण नियंत्रकाचे काम करते.

त्या अर्थाने ती निसर्गाची मोठी देणगीच आहे. अलीकडे सांडपाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी जलपर्णीचा वापर मुद्दाम केला जाऊ लागला आहे. याचे आपल्या महाराष्ट्रातीलच सर्वांत चांगले उदाहरण म्हणजे पवई (मुंबई) प्रसिद्ध तलाव. या तलावाचे व्यवस्थापन बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अभियंते डॉ. प्रमोद साळसकर पाहतात. त्यांनी या तलावात जलपर्णीचा योग्य प्रमाणात वापर करून पाण्याचे प्रदूषण नियंत्रणात ठेवले आहे.

तलावातील या जलपर्णी वाढीचे व त्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेचा अभ्यास करून निरीक्षणे नोंदवलेली आहेत. त्यावर आधारित एका शोधनिबंधामध्ये सांडपाणी शुद्धीकरणातील जलपर्णीची उपयुक्तता ते भरपूर आकडेवारीसह सिद्ध करतात.

याचे दुसरे उदाहरण म्हणजे सांगली नगरपालिकेने ४५ वर्षांपूर्वी केलेला जलपर्णीच्या माध्यमातून सांडपाणी प्रदूषणमुक्त करण्याचा उपक्रम. ते तर तेवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी सांगलीच्याच सेवासदन सोसायटीचे तांत्रिक सहकार्य घेत त्या जलपर्णीच्या बायोमासपासून दरदिवशी अकरा हजार घन फूट बायोगॅसही मिळवला आहे. या बायोगॅसच्या विक्रीतूनही चांगला फायदा मिळवला आहे. म्हणजेच ‘आम के आम, गुठलीओंके दाम’.

जिथे जिथे पाण्यात सेंद्रिय घटक जमा होतात, तिथे जलपर्णी अवतीर्ण होते. आपले सांडपाणी मुख्यतः तयार होते मानवी मलमूत्रामुळे. त्यात मिसळले जातात साबण, डिटर्जंट. या सर्वांमुळे पाण्यातील नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशिअम यांचे प्रमाण वाढते. अशा सेंद्रिय घटकांवर तर जलपर्णी पोसली जाते.

जलपर्णी सांडपाणी प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका कशी बजावते हे सांगणारे शेकड्याने शोधनिबंध आहेत. एका शोधनिबंधाची सुरुवातच मुळी ‘खरंतर जलपर्णी जलसाठ्यासाठी किडनीचे काम करतात’ अशा वाक्याने होते. जलपर्णी पाण्याचा पाच ते सात सामू (पी.एच.) सोसू शकते.

Water Hyacinth
Waste Water Management : सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना पर्याय काय?

जलपर्णी ही सांडपाणी व दूषित पाण्यातील सेंद्रिय व असेंद्रिय घटकांसोबत सर्व प्रकारचे धातूही शोषते. जलपर्णीमुळे सांडपाण्याचा बीओडी ९७ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. डेअरीच्या सांडपाण्यात ७२ टक्के नायट्रोजन आणि ६३ टक्के फॉस्फरस असतो. तोही जलपर्णी पाण्यातून पूर्णपणे शोषून घेऊ शकतात. अनेक प्रकारच्या औद्योगिक सांडपाण्याचा ‘सीओडी’ ६७ टक्क्यांनी, तर बीओडी ७२ टक्क्यांनी कमी होऊ शकतो.

कापड गिरण्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचा सीओडी ९७ टक्‍क्‍यांपर्यंत कमी होत असल्याचे निष्कर्षही या शोधनिबंधामध्ये मांडलेले आहेत. इलेक्ट्रोप्लेटिंग कारखान्याचे सांडपाणी असो, की कागदाचा लगदा वा कागद कारखान्याचे सांडपाणी असो, की ॲल्युमिनिअम इंडस्ट्रीतील भरपूर दूषित सांडपाणी जलपर्णीने आपले किडनीचे कर्तव्य चोख बजावले आहे.

फिनाॅल, पारा, आर्सेनिक अशी अतिघातक रसायनेही जलपर्णी सहज शोषून घेते. जलपर्णीच्या मुळांवर असलेल्या वाढणारे जिवाणू सेंद्रिय व असेंद्रिय ही घटकांचे विघटन वेगाने करतात. मुळांवरील या जिवाणू समूहामुळे (Micro flora) जलपर्णीची उपयुक्तता कितीतरी अधिक पटीने वाढते. सांडपाणी चक्क ९८ टक्क्यांपर्यंत शुद्ध होऊ शकते.

जलपर्णीचे व्यावसायिक उपयोग :

नद्या, तलावातून जलपर्णी काढण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र या काढलेल्या जलपर्णीची विल्हेवाट कशी लावायची, याचे काहीच नियोजन नसल्याने काठावर ती तशीच पडून राहते व सुकते. म्हणजेच त्यातून प्रदूषक घटक काठावर तसेच राहतात. पुढील पावसाळ्यात किंवा पुरामध्ये ते पाण्यात येतात.

त्यामुळे जलपर्णी काढून तिच्या बायोमासपासून काही व्यावसायिक उपयोग करून घेतला पाहिजे. एखाद्या व्यावसायिकाला सांडपाण्यातून जलपर्णी काही प्रमाणात काढण्याचे व त्यापासून उत्पादने बनविण्याचे काम सोपवले पाहिजे. म्हणजेच सांडपाणी शुद्धीकरण मोफत होऊन अनेकांना रोजगार मिळेल.

ज्यात कोणत्याही कारखान्यांचे अतिप्रदूषित सांडपाणी मिसळलेले नाही, अशा फक्त मैलापाण्यावर वाढलेल्या जलपर्णीचे पुढील प्रमाणे व्यावसायिक उपयोग होऊ शकतात.

जलपर्णीच्या बायोमासपासून बायोगॅस बनवता येतो. लेखाच्या सुरुवातीलाच सांगली नगरपालिकेचे उदाहरण दिले आहे.

बांगलादेशात दलदलीच्या भागात जलपर्णी काढून बांबू किंवा लाकडांच्या तराफ्यावर तिचे थर रचले जातात. हे बेड पाण्यात किंवा पाण्याकाठी ठेवून त्यात भाजीपाला, फळे यांची झुडपे किंवा वेली लावून उत्पादन घेतले जाते.

Water Hyacinth
Waste Water Management : सांडपाणी प्रक्रिया केंद्रे का अपयशी ठरतात?

ही जलपर्णी गुरे चवीने खातात. त्यामुळे जलपर्णी वाळवून केलेली त्याची भुकटी अन्य पोषक खाद्य घटकांसोबत उत्तम दर्जाचे पशुखाद्यही बनवले जाते. जलपर्णीमध्ये प्रोटीन व कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असल्याने त्याचे पोषणमूल्य उत्तम ठरते. पोल्ट्री फीड म्हणूनही त्याचा वापर करता येतो.

कंपोस्ट खत तयार करता येते.

जलपर्णीच्या बेडवर रोपवाटिका तयार करता येतात.

काही देशात जलपर्णीच्या बायोमासपासून इथेनॉल निर्मिती होते.

राजुरा (जि. चंद्रपूर) येथील अजय बहुउद्देशीय संस्थेने महिला बचत गटाच्या मदतीने जलपर्णीपासून विविध वस्तू तयार केल्या आहेत.

परदेशात जलपर्णीच्या खोडांपासून वळून फर्निचरही बनवले जाते.

जैविक खतात वापरल्या जाणाऱ्या रायझोबिअम जिवाणूंच्या पैदाशीसाठी जलपर्णीचा रस सर्वोत्तम माध्यम आहे.

जलपर्णीपासून बायोचार (activated carban) बनवला जातो. तो उत्तम जैवशोषक (बायोॲडसाॅर्बंट) आहे.

पश्चिम बंगालमध्ये जलपर्णीपासून निघणाऱ्या धाग्यांपासून वस्त्रे बनवली जातात.

जलपर्णीपासून ग्रीसप्रूफ पेपरही बनवला जातो.

जलपर्णीची विल्हेवाट लावण्याची पर्यावरणपूरक पद्धत

औद्योगिक शहरांच्या परिसरातील सांडपाणी एकत्र येत असलेल्या जलस्रोतामध्ये सेंद्रिय प्रदूषकाप्रमाणेच हेवी मेटल्स, विषारी प्रदूषकेही असू शकतात. अशा पाण्यात वाढलेली जलपर्णी पशुखाद्य व खत म्हणून वापरणे धोकादायक ठरू शकते. उलट ही प्रदूषके अन्नसाखळीमध्ये शिरण्याचा धोका असतो.

यावर उपाय म्हणून विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथील एका संस्थेने इमारतीचा राडारोडा टाकलेले ढीग आणि नापिक जमिनीवर जलपर्णी टाकून त्यावर जंगली झाडे लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यात बांबू, साग व तत्सम जंगली झाडे लावली आहेत.

ही झाडे शक्यतो कुणी प्राणी, पक्षी किंवा माणूस खात नाहीत. त्यामुळे जैवसाखळीमध्ये त्यांचा समावेश होऊन त्यांचे संवर्धन किंवा वाढ (बायोॲक्युमलेशन) होऊ शकणार नाही. ही झाडे वातावरणातील कार्बन व प्रदूषणही कमी करण्यात मोलाची भूमिका निभाऊ शकतील, असा त्यांचा दावा आहे.

सतीश खाडे, ९८२३०३०२१८

(लेखक पाणी अभ्यासक असून, पाणी तंत्रज्ञावर लिहिलेल्या ‘अभिनव जलनायक’ पुस्तकाचे लेखक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com