Solid Waste Management : लोकसहभागातून घनकचऱ्यावर करूयात मात

Waste Management : घनकचरा व्यवस्थापन गांभीर्याने घेण्याची गरज अनेक अंगांनी फायदेशीर आहे. राज्य आणि जिल्ह्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, पंचायत राज विभाग आणि ग्रामीण विकास मंत्रालय या विभागाच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध योजना आणि निधीची तरतूद केलेली आहे.
Waste Management
Waste ManagementAgrowon

सतीश खाडे

Analysis of Solid Waste Management : घनकचरा व्यवस्थापन गांभीर्याने घेण्याची गरज अनेक अंगांनी फायदेशीर आहे. राज्य आणि जिल्ह्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, पंचायत राज विभाग आणि ग्रामीण विकास मंत्रालय या विभागाच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध योजना आणि निधीची तरतूद केलेली आहे.

घनकचरा समस्येवर वैयक्तीक,घरगुती आणि सामुदायिक पातळीवर काम करणे आवश्यक आहे. आजच्या लेखात सामुदायिक पातळीवरच्या उपाययोजनेविषयी चर्चा केली आहे. घनकचरा व्यवस्थापन गांभीर्याने घेण्याची गरज अनेक अंगांनी फायदेशीर आहे. पाणी, हवा, मातीमधील प्रदूषणावर नियंत्रण होते.

महत्त्वाचे म्हणजे छोटे, मोठे आजार आणि आबालवृद्धांचे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या आजारांवर खर्च होणारा पैसा वाचतो तसेच आजारामुळे रोजगार बुडणे टाळता येते. त्याहीपेक्षा मोठी आर्थिक गणिते या कचरा व्यवस्थापनात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या आहेत. इंदूर आणि सुरत शहरांना गेली अनेक वर्ष सलग स्वच्छतेबाबत देशात प्रथम क्रमांक मिळतो, हे आपल्याला माहिती आहेच.

पण त्यांच्याबरोबरच साडेतीन लाख लोकसंख्येच्या गटात महाराष्ट्रातील लातूर नगरपालिकेलाही सलग तीन वेळा देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे. यात मुख्य योगदान आहे नगरपालिकेच्यावतीने सर्व कचरा वेचून त्याची विल्हेवाट लावणारी लातूर शहरातील जनआधार संस्था.

या संस्थेची कचऱ्याच्या व्यापाराची उलाढाल तीन वर्षांपूर्वी ३२ कोटी रुपयांची होती. त्याचबरोबर या कामात शहरात रोजगार निर्मिती होऊन प्रत्यक्ष ८०० पेक्षा अधिक आणि अप्रत्यक्ष अडीचशेपेक्षा अधिक रोजगार निर्मिती झाली आहे. या सर्वांना नियमित रोजगार असून त्यामध्ये कचरा वेचक, मुकादम, टेम्पो ड्रायव्हर, ट्रॅक्टर ड्रायव्हर असे लोक आहेत.

इतकेच नाही तर त्यांच्यामधूनच १५ लोकांनी कचरा वाहतुकीसाठी स्वतःचे ट्रॅक्टर आणि पस्तीस जणांनी छोटे टेम्पो विकत घेऊन व्यावसायिक झाले आहेत. इंदूर प्रमाणेच लातूर शहरातील कचरा व्यवस्थापन व त्यांची उत्तम विल्हेवाट हे खूप प्रभावी काम आहे.

Waste Management
Water Management : सुपीक जमीन, जलसाठे शाश्‍वत करूयात

कचरा विलगीकरण यंत्रणा ः
१) कचरा विलगीकरण करणारी यंत्रणा, कामगारांचे प्रशिक्षण,कचऱ्याची विक्री आणि इतर प्रकारे होणारी विल्हेवाट यांचा मोठा वाटा आहे.

२) यंत्रणेमध्ये कचरा विभागणीच्या विविध चाळण्या असतात. ३५ मि.मी.च्या छिद्रांच्या चाळणीतून विटा ,चपला, साड्या, रेक्झिनचे तुकडे बाजूला होतात. दुसऱ्या १६ मि.मी.च्या चाळणीतून खडी व अनेक उत्पादनांचे सॅचेट्स बाजूला होतात (उदाहरणार्थ शाम्पू, गुटखा इ.) तिसऱ्या ८ मि.मी. च्या चाळणीतून वाळू ,काचेचे तुकडे ,कच खडी बाजूला होते. चौथ्या चाळणीच्या आरपार जाणारे घटक असतात. हे माती वजा खतच असते.हे झाले विलगीकरण. हे विलगीकरण प्रक्रिया करणाऱ्या तीन यंत्रणा काम करतात.

Waste Management
Waste Water Management : घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे अवसरी खर्दमध्ये भूमिपूजन

३) रोजच्या घराघरांतून वेचलेल्या कचऱ्याचे २९ प्रकारात विलगीकरण केले जाते. यामध्ये प्लॅस्टिकचे पंधरा-सोळा प्रकार आहेत. कॅरी बॅग, दुधाची पिशवी, तेलाची पिशवी, काळ्या पिशव्या, पांढऱ्या तसेच पारदर्शक पिशव्या. या पुढील प्रकार म्हणजे पाण्याची बाटली,पीव्हीसी मटेरिअल,प्लास्टिक कंटेनर, धान्य व सिमेंटच्या बॅग्ज, इतर प्लास्टिक इ.

४) कागद कचऱ्याच्या विलिगीकरणामध्ये खाकी कागद, वर्तमानपत्र, वही पुस्तक, बॉक्स,जाड कागदाच्या वस्तू असे प्रकार असतात.

५) कागदाच्या विलगीकरणानंतर चपला, त्यातही प्रकार रबरी, प्लास्टिक, लेदर आणि त्यानंतर कापडाचे प्रकार चिंधी, नायलॉन,टेरिकॉट,सुती,जीन्स इ. असे प्रकार वेगळे केले जातात.

६) काचेची बाटली वेगळी, फुटलेली बाटली वेगळी,
थर्मोकोल,तसेच विविध प्रकारच्या बॅग्ज, प्लास्टिक,रबर पॉलिमर,कापडी,लेदर इ. असे सर्व प्रकार वेगळे केले जातात.

प्रदूषणाची पातळी झाली कमी ः
विविध यंत्रणांच्या माध्यमातून २९ प्रकार वेगळे करून लगेच तिथेच ढीग आणि गठ्ठे तयार करून जागेवरच ८० टक्के घटकांची विक्री केली जाते. काही घटकांची दररोज तर काही घटकांची दर आठवड्याला विक्री होऊन ते रिसायकलिंगसाठी पाठविले जातात.

त्याचे सगळे पैसे कचरा वेचकांना मिळतात. विकल्या न जाऊ शकणाऱ्या ओल्या कचऱ्याचे खत केले जाते. शहाळे, नारळाचे कवचाचे तुकडे हे रोज पाच टन गोळा होते. त्यापासून कोको पीट आणि क्वायर निर्मिती केली जाते.

क्वायर बनवण्यासाठी यंत्रणा आणून कारखाना सुरू झाला आहे. कोकोपीट पुढे रोपवाटिकांना दिले जाते. या रोपवाटिकांच्या माध्यमातून हजारो रोपांची निर्मिती सुरू आहे. रोजच्या रोज कचऱ्याची विल्हेवाट लागत असल्याने लातूर शहरामधील हवा, जमीन आणि पाणी यांची प्रदूषण पातळी खूपच खाली आली आहे. अनारोग्य, दुर्गंधी याचाही त्रास शहरवासीयांना आता खूप कमी झाला आहे.

संजय कांबळे हे जन आधार संस्थेचे संस्थापक आणि मुख्य आधारस्तंभ आहेत. हॉटेलमधील उरलेल्या अन्नावर वराह पालन करून त्यातून श्रमजीवी तरुणांसाठी त्यांनी रोजगार सुरू करून दिला आहे.

त्यातूनही स्वच्छतेचा प्रश्न आणि गरजू बेरोजगार लोकांना रोजगार असा दुहेरी फायदा त्यांनी मिळवून दिला आहे. अशा दोन्ही, तिन्ही मार्गाने जवळजवळ हजार लोकांना प्रत्यक्ष आणि शंभर-दीडशे लोकांना अप्रत्यक्ष रोजगार, पैसा, उन्नत जीवन व आत्मविश्वास, आत्मसन्मान मिळवून दिला आहे.

कचऱ्याची दुर्गंधी घालवण्यासाठी...
ग्रामपंचायत असो की महानगरपालिका या सर्व संस्थांमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या सर्वात जास्त असते. सुमारे ४०ते ७० टक्के कर्मचारी हे स्वच्छता सेवक असतात. तरीही अपवाद वगळता सर्व गाव व शहरात कचरा समस्या खूप व्यापक आहे.

याचे कारण म्हणजे सर्वांची अनास्था. याचे कारण म्हणजे कचऱ्याची दुर्गंधी. यासाठी विविध पातळीवर विविध प्रकारे काम करणे आवश्यक आहे.यातून घनकचरा व्यवस्थापन उत्कृष्टपणे करता येणे शक्य आहे.

१) कचऱ्याची दुर्गंधी घालवणे.
२) नागरिकांची मानसिकता बदलणे.
३) कचरा वेचकांच्या कामाला प्रतिष्ठा मिळणे.
४) त्यांच्या विविध क्षमता विकसित करणे.
५) कचऱ्यापासून नियमित उत्पन्न मिळवणे.
६) तंत्रज्ञानाचा वापर वाढणे.
७) सरकारी योजनांचा योग्य समन्वय करणे.

कचऱ्याची दुर्गंधी ही समस्या सोडविण्यामधील सर्वात मोठी अडचण आहे. कचऱ्याचे विघटन होताना ते ॲनरोबिक जिवाणूंमुळे होत असेल तर त्याची दुर्गंधी मोठ्या प्रमाणात येते. ही दुर्गंधी घालवणे सहज शक्य आहे. त्यासाठी बाजारात एरोबिक जिवाणू असलेले द्रावण मिळते.

ते पाण्यात मिसळून कचऱ्यावर फवारले की कचऱ्याचे विघटन सुरु राहते. त्यामुळे कचऱ्याला दुर्गंधी येत नाही. अशा प्रकारचे द्रावण पुणे आणि अनेक शहरात कचरा वाहणाऱ्या गाड्या, कचरा हाताळणाऱ्या जागा तसेच कचरा डेपोवर फवारले जाते.

त्यामुळे रस्त्यावर जाताना कचरा गाडीची (Kachra Gadi) दुर्गंधी येत नाही. तसेच कचरा डेपोमधून दूरवर पसरणारी दुर्गंधी खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. यात काम करणाऱ्या श्रमिकांचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. याचा वापर सर्व गाव, शहरामध्ये करायला हवा.

काही महत्त्वाचे उपाय ः
घरातही कचऱ्याची दुर्गंधी आपल्याला थांबविणे शक्य आहे. त्यामुळे घर, गच्चीवर तसेच बागेत कचऱ्याचे कंपोस्ट (Compost) केल्याने दुर्गंधी नाहिशी होईल. त्याचबरोबर सोसायटी, टाऊनशिप यांना कचरा हाताळणे आणि कुजविणे त्यांच्या आवारात शक्य होते. त्यातूनच खत म्हणून काही प्रमाणात उत्पन्नही मिळेल.

गावागावात माशा व डासांचा उपद्रव वाढू नये यासाठी काही प्रकारची पावडर कचराकुंडी, उकिरडे, गटारी भोवती फवारली जाते. पण हे पूर्ण निरुपयोगी ठरते. त्यातील विषारी रसायने पाणी, जमिनीत मिसळतात. त्याऐवजी ॲरोबिक जिवाणू द्रावण बहुपयोगी ठरते.

शेतीमालाच्या कचऱ्यापासून द्रवरूप खते ः
आठवडे बाजार, शेतमालाचे लिलाव व खरेदी विक्री होणाऱ्या ठिकाणी, नियमित बाजार भरणाऱ्या ठिकाणी होणाऱ्या कचऱ्यापासून द्रवरूप जैविक खते बनवता येतात. यासाठी तुलनेने स्वस्त यंत्रणा उपलब्ध असून देशपातळीवर त्याला गौरविले गेले आहे. बाजार भावाअभावी रस्ता तसेच मोकळ्या जागी टाकल्या जाणाऱ्या शेतीमालापासून ही खते बनवता येतील.

स्वच्छ भारत अभियान ः २ ः
या अभियानांतर्गत कचरा मुक्त गाव, शहर तसेच सांडपाणी प्रक्रिया आणि त्याचे व्यवस्थापन या बाबींवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने भर दिला आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारने ग्रामपंचायत आणि पालिकांना राखीव निधी दिला आहे.

राज्य आणि जिल्ह्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, पंचायत राज विभाग आणि ग्रामीण विकास मंत्रालय (Ministry of Rural Development) या विभागाच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध योजना आणि निधीची तरतूद केलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com