Bee Nutrition Innovation: मधमाश्यांच्या पोषणासाठी नवीन अन्न स्रोताची निर्मिती

Artificial Bee Feed: मधमाश्यांच्या घटत्या वसाहतीमुळे कृषी उत्पादन धोक्यात आले असताना, आता शास्त्रज्ञांनी नवीन अन्न स्रोत विकसित केला आहे. परागकणांच्या अभावातही वसाहती टिकून राहाव्यात यासाठी करण्यात आलेल्या या संशोधनाचे परिणाम आशादायक ठरत आहेत.
Bee Conservation
Bee ConservationAgrowon
Published on
Updated on

Honey Bee Research: निरोगी मधमाश्या परागीकरण कार्यक्षमता सुधारून पिकांचे उत्पादन वाढविण्यास मदत करू शकतात. मात्र गेल्या काही दशकांमध्ये मधमाश्यांच्या वसाहती सातत्याने घटत आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रातील उत्पादकता धोक्यात येत आहे. त्यामुळे मधमाश्यांच्या वसाहती नष्ट होण्यामागील कारणांचा एका बाजूला शोध घेतला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला मधमाश्यांसाठी अन्नाची उपलब्धता कशा प्रकारे करता येईल, यावर संशोधन केले जात आहे. या प्रक्रियेमध्ये शास्त्रज्ञांनी एक नवीन अन्न स्रोत विकसित केला आहे. त्यामुळे नैसर्गिक परागकणांची उपलब्धता कमी असल्याच्या स्थितीतही मधमाश्यांच्या वसाहती टिकून राहण्यास मदत होणार आहे. हे संशोधन ‘प्रोसिडिंग्स ऑफ दी रॉयल सोसायटी बी ः बायोलॉजिकल सायन्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

अन्य पाळीव पशू, पक्ष्यांसाठी ज्या प्रमाणे सूत्रबद्ध आहाराची निर्मिती करण्यामध्ये शास्त्रज्ञांना यश आले आहे, त्या प्रमाणेच मधमाश्यांच्या वसाहतीच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले सर्व आवश्यक पोषक घटक नवीन आहारामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. हा आहार देणेही अत्यंत सोपे बनविण्यात आले आहे. कारण हे मानवी पॉवर बार सारखे दिसणारे खाद्य थेट पोळ्यांमध्ये ठेवले जाते. त्यावर तरुण मधमाश्या संपूर्ण वसाहतीत पोषक तत्त्वांवर प्रक्रिया करून अळ्या आणि प्रौढांपर्यंत वितरणाचे काम करतात. अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्य विद्यापीठ आणि बेल्जियममधील ‘एपीआयएक्स बायोसायन्सेस एनव्ही’ यांच्या जर्नलमध्ये प्रकाशित या अभ्यासात वॉशिंग्टन राज्यातील व्यावसायिक पीक परागीकरणात वापरल्या जाणाऱ्या पोषणाच्या ताणाखाली असलेल्या मधमाश्यांच्या वसाहती नवीन आहार दिल्यावर भरभराटीला आल्याचे दिसून आले.

Bee Conservation
Bee Attack Prevention : निसर्गाच्यासोबत जपूयात आग्या मधमाश्‍या

वातावरणात परागकणांची पुरेशी संख्या नसणे, हीच मधमाशी वसाहतीच्या तग न धरण्यामागील मुख्य समस्या आहे. त्याविषयी माहिती देताना वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील परागकण पर्यावरणशास्त्राचे पी.एफ. थर्बर एन्डोव्ड म्हणाले, की जमिनीच्या वापरातील बदल, शहरी विस्तार आणि तीव्र हवामान यामुळे मधमाश्या आणि इतर परागकणांच्या पोषणावर नकारात्मक परिणाम होतो. संशोधनाचे सहलेखक ब्रँडन हॉपकिन्स म्हणाले, की मधमाश्यांना सर्व पोषण एकाच स्रोतातून मिळत नाही. जगण्यासाठी त्यांच्या आहारात विविधतेची आवश्यकता असते. परंतु वसाहत टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या परागकणांचा शोध घेत राहणे व तो मिळवून तो वसाहतीला पुरवत राहणे, हे कठीण होत चालले आहे.

‘एपिक्स बायोसायन्सेस यूएस’चे कार्यकारी अधिकारी डॉ. पॅट्रिक पिल्किंग्टन यांनी सांगितले, की मधमाशीपालन मोठ्या प्रमाणात केले जात असले तरी त्यासाठी मानवनिर्मित आहार आपण उपलब्ध करू शकलो नव्हतो. व्यावसायिक मधमाशीपालन करताना काही क्षेत्रामध्ये पौष्टिक घटकांची कमतरता भासल्याने वसाहतींवर मोठा ताण येतो. तो कमी करण्यासाठी परागकण बदलणाऱ्या खाद्याचा वापर करणे शक्य आहे. त्यामुळे वसाहतींचे आरोग्य सुधारते. या उत्पादनामध्ये मधमाश्यांच्या व्यवस्थापनाची पद्धत बदलण्याची क्षमता आहे.

Bee Conservation
Honey bee Species : पाळता येणाऱ्या मधमाशांच्या पाच प्रजाती

जागतिक सहकार्यातून संशोधन शक्य

जागतिक पातळीवर संशोधन सहकार्यातून हे संशोधन पूर्णत्वास गेल्याची माहिती बेल्जियम येथील एपिक्स बायोसायन्सेसचे अध्यक्ष थियरी बोगार्ट यांनी दिली. ते म्हणाले, की या संशोधनामध्ये एपिक्स बायोसायन्सेसचे शास्त्रज्ञ गेल्या दहा वर्षांपेक्षाही अधिक काळापासून विविध घटकांच्या आहारातील वापरासंदर्भात चाचण्या घेत आहे. दुसरा संशोधन संघ वॉशिंग्टन राज्य विद्यापीठातील मधमाशीविषयक तज्ज्ञांचा असून, कॅलिफोर्नियातील मधमाशी पालकांची संघटना यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर वैज्ञानिक चाचण्या घेण्यामध्ये मोलाची भूमिका निभावली आहे.

या संशोधनामध्ये अँ मेरी फौवेल यांचेही योगदान महत्त्वाचे आहे. कारण त्यांनी परागकणांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा व मधमाश्यांच्या पोषणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारा आयसोफुकोस्टेरॉल रेणू ओळखला. हा घटक इतका महत्त्वाचा आहे, की वसाहतीमध्ये परागकणांचा प्रवेशही न होता केवळ आयसोफुकोस्टेरॉलने समृद्ध अशा अन्नावर वसाहती संपूर्ण हंगामात टिकून राहिल्या. ज्या वसाहतीमध्ये या अन्नाचा समावेश केलेला नव्हता, त्यांच्यामध्ये परागकणाअभावी गंभीर स्थिती निर्माण झाली. त्यात अळ्यांचे उत्पादन कमी होणे, प्रौढांमध्ये पक्षाघात होणे आणि एकूणच वसाहत कोसळून पडणे अशा बाबींचा समावेश होता. नवीन खाद्यामध्ये मधमाश्यांना आवश्यक असलेल्या इतर पोषक तत्त्वांचे व्यापक मिश्रण करण्यात आलेले आहे.

पौष्टिकतेच्या ताणस्थितीमध्येही वसाहतींची भरभराट

सामान्य शेतातील स्थितीमध्ये नवीन अन्न स्रोताचे मूल्य जाणून घेण्यासाठी वॉशिंग्टनमधील शास्त्रज्ञांनी ब्लूबेरी आणि सूर्यफूल शेतामधील पौष्टिकतेचा ताण असलेल्या वसाहतींसह प्रक्षेत्र चाचण्या केल्या. मानक व्यावसायिक खाद्य प्राप्त करणाऱ्या किंवा पूरक आहार न मिळालेल्या वसाहतींच्या तुलनेत नवीन अन्न स्रोत दिलेल्या वसाहतींची चांगली भरभराट झाली. या वसाहती केवळ टिकूनच राहिल्या असे नाही, तर त्यांच्या संख्येतही वाढ झाली.

सध्या ब्लूबेरीच्या शेतामध्ये वसाहती नेण्यास मधमाशीपालक फारसे उत्साही नसतात. कारण ब्लूबेरी परागकण मधमाश्यांसाठी फारसे पौष्टिक नसतात. त्यातून मधमाश्यांचे पोषण चांगल्या प्रकारे होत नाही. परिणामी, वसाहतीतील मधमाश्यांची संख्या कमी होते किंवा संपूर्ण वसाहतच धोक्यात येण्याची शक्यता असते. केवळ आर्थिक भरपाईतून हे नुकसान भरून येत नाही. त्यामुळे ब्लूबेरीच्या शेते परागीभवनाविनाच राहून त्याचे उत्पादन घटत आहे. मात्र आता या नव्या खाद्यामुळे वसाहतीच्या पोषणाची तजवीज होऊ शकणार असेल, मधमाशीपालक वसाहती परागीभवनासाठी नेण्यास टाळाटाळ करणार नाहीत, अशी माहिती हॉपकिन्स यांनी दिली.

हे मधमाश्यांसाठीचे नवीन पौष्टिक अन्न उत्पादन २०२६ च्या मध्यावधीपर्यंत अमेरिकेमध्ये व्यावसायिक स्वरूपात बाजारात येईल. त्यामुळे मधमाशीपालकाच्या व्यवसायावर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल, यात शंका नाही. दरम्यान, कृषी क्षेत्रामध्ये या नवीन साधनाचा वापरासंदर्भात सर्वोत्तम मार्ग विकसित करण्यासाठी वॉशिंग्टन आणि अमेरिकेतील मधमाशीपालकांच्या समुदायासोबत काम करत असल्याचे पिल्किंग्टन यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com