Bee Attack Prevention : निसर्गाच्यासोबत जपूयात आग्या मधमाश्‍या

Forest Tourism Tips : या ऋतूत खाद्याची विपुल उपलब्धता असल्याने झाडे, डोंगरातील गुहा, कडेकपारी, पुरातन गड-किल्ले, लेणी आणि मनुष्याचा वावर कमी असलेल्या ठिकाणी आग्या मधमाश्‍या प्रचंड प्रमाणात नवीन पोळी तयार करतात.
Honey Bee Attack
Honey Bee AttackAgrowon
Published on
Updated on

दिग्विजय पाटील

निसर्ग साखळीतील मधमाश्‍या हा अत्यंत महत्त्वाचा कीटक आहे. मधमाश्‍या परागीकरणाद्वारे पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यास मदत करतात. सध्या सर्वत्र बहुतांश जंगली वनस्पती फुललेल्या अवस्थेत दिसून येतात.

या ऋतूत खाद्याची विपुल उपलब्धता असल्याने झाडे, डोंगरातील गुहा, कडेकपारी, पुरातन गड-किल्ले, लेणी आणि मनुष्याचा वावर कमी असलेल्या ठिकाणी आग्या मधमाश्‍या प्रचंड प्रमाणात नवीन पोळी तयार करतात.

या ठिकाणी ट्रेकिंग किंवा हौशी पर्यटनासाठी जाताना विशेष काळजी घ्यावी. प्रशिक्षित तज्ञ मधपाळाच्या मदतीने अशी पोळी पर्यावरणपूरक पद्धतीने मधमाशांचा कोणताही नाश न होता, त्यांना इजा न होता संरक्षक ड्रेस घालून निसर्गात इतरत्र हालविता येतात. जेणेकरून भविष्यात घडणाऱ्या दुर्घटना टाळता येतात.

कामकरी मधमाश्‍या खाद्याच्या शोधार्थ पोळ्याच्या भागात फिरत असतात, तर काही कामकरी मधमाश्‍या पोळ्याच्या भोवती संरक्षणार्थ फिरत असतात. ठरावीक भागात कार्यरत असणाऱ्या या मधमाश्यांना मानवी हस्तक्षेप अजिबात आवडत नाही. माणूस मधमाश्यांच्या क्षेत्रात गेला, की त्यांना पोळ्यातील राणी माशी आणि इतर माश्यांच्या जीवास त्याचा धोका वाटतो. त्यामुळे केवळ पोळ्याचे रक्षण करण्यासाठी या कामकरी माश्‍या त्या माणसावर हल्ला चढवतात.

Honey Bee Attack
Beekeeping Business: मधमाशीपालनात राखले १४ वर्षांपासून सातत्य

बरेचदा गड चढताना किंवा रॅपलिंग करत असताना पायाने माती किंवा दगड चुकून त्या वाटेकडेच्या कड्यावरील पोळ्यावर पडतो. त्यामुळे माश्‍या चिडून वसाहतीमधील राणी आणि पिल्लांचे रक्षण करण्यासाठी ट्रेकरवर हल्ला चढवतात.

अनियंत्रित तापमान वाढीमुळे उन्हाळ्यात मधमाश्यांना उष्मा सहन होत नाही.त्यामुळे अशा तापलेल्या वातावरणात मधमाश्या त्रस्त होऊन पोळ्या जवळ आलेल्या पर्यटकांवर हल्ला करू शकतात. मधमाशी हा संवेदनशील कीटक आहे. पर्यटकांनी तीव्र वासाचे अत्तर, परफ्युम वापरलेले असल्यास मधमाश्यांना तो वास अजिबात सहन होत नाही. त्यामुळे मधमाश्या हल्ला चढवू शकतात.

मधमाश्यांनी हल्ला करू नये म्हणून घ्यावयाची काळजी

लेणी, किल्ले, गडावर फिरताना पर्यटकांनी पूर्ण शरीर झाकले जाईल असे निसर्गाशी मिळतीजुळती रंगसंगती असलेले कपडे, विंडचीटर जॅकेट, कोट परिधान करावेत. डोक्यावर टोपी, स्कार्फ, रुमाल किंवा कानटोपी घातलेली असावी. शक्यतो डोळ्यांवर गॉगल असावा.

पर्यटकांनी तीव्र वासाची अत्तरे, परफ्यूम, स्प्रे, डिओड्रंट यांचा वापर टाळावा.

पर्यटकांनी गडावर मधमाश्यांचे पोळे असलेल्या ठिकाणी आग पेटवून जाळ करू नये. सिगारेट ओढू नये. फटाके फोडू नयेत. त्या धुराने पोळ्यातील मधमाश्या कासावीस होतात. चेकाळून तेथील पर्यटकांवर हल्ला करतात.

पोळे असलेल्या क्षेत्राच्या फार जवळून जाऊ नये. गोंगाट करत, गाणी म्हणत किंवा रेकॉर्डवर मोठ्याने गाणी लावून तर अजिबात जाऊ नये.

पर्यटकाने प्रथमोपचार पेटी जवळ ठेवावी.

अवघड चढण असलेल्या गड-किल्ल्यावर एकट्याने जाऊ नये. बरोबर कोणीतरी जाणकार व्यक्ती असू द्यावी.

ज्या लेणी, किल्ला, गडावर जायचे आहे त्या स्थानाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील एखादी व्यक्ती, दुकान, हॉटेल, पोलीस चौकी, हॉस्पिटल यांचे मोबाइल नंबर जवळ नोंद करून ठेवावेत. मदतीची आवश्यकता वाटल्यास असे नोंद केलेले क्रमांक उपयोगी ठरतात.

Honey Bee Attack
Beekeeping: अल्पभूधारकाने मधमाशीपालनात मिळवली ओळख

मधमाश्यांनी हल्ला चढवल्यास तातडीच्या उपाययोजना

मधमाश्यांचे मोहोळ उठल्यास पर्यटकांनी आरडाओरडा न करता, हात किंवा काठीने माशा न मारता तत्काळ शाल, चादर किंवा ओढणी असल्यास ती अंगावर लपेटून पोटावर निपचित पडावे.

एखाद दुसरी मधमाशी चावली तरी घाबरून जाऊ नये. कारण मधमाशीचा दंश हा औषधी असल्याने एखादी मधमाशी चावल्यास त्या दंशामुळे संधिवात, पक्षाघात असे आजार होत नाहीत.

मधमाश्या अंगावर जिथे चावल्या असतील त्या जागी शरीरावर असलेली मधमाशीची नांगी चिमटीच्या बोटाने नखाने काढून घ्यावी, मात्र हे करत असताना विषाची पिशवी न दाबता नखाने नांगी अलगद काढून घ्यावी. त्वरित भोवताली असलेल्या रानतुळस, भांबुर्डी, दगडी पाला किंवा इतर औषधी वनस्पतींचा पाला त्या जागी चोळावा. मात्र उपद्रवी ठरणाऱ्या विषारी वनस्पतींचा पाला चोळू नये. पाला चोळल्यामुळे अंगाच्या त्या जागेवरील विषाचा गंध नष्ट होऊन इतर मधमाश्या त्या पर्यटकावर हल्ला करणार नाहीत. कारण मधमाश्या स्वतःच्या पोळ्यातील माशांचा फेरोमोनचा गंध ओळखत असतात.

प्रथमोपचार पेटीमध्ये Avil २५ मिलीग्रॅम या गोळ्या ठेवाव्यात. समजा खूप मधमाश्यांनी एकाच वेळी हल्ला चढवल्यास ही गोळी सेवन करावी. Apis Mellifica या होमिओपॅथीक गोळ्या घ्याव्यात. त्याच नावाचे क्रीम शरीरावर डंख मारलेल्या जागी लावावे. ही औषधे, क्रीम पर्यटकाने प्रथमोपचार पेटीमध्ये ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

मधमाशी चावल्यास तिचा शरीरात अडकलेला काटा हाताने चोळू नये. चोळत बसल्याने काटा आणखी खोलवर जाऊन रुतून बसतो. काटा काडीने , दोन्ही बोटांच्या नखाच्या चिमटीने वरच्यावर काढून बाहेर टाकावा. मग त्यावर औषधी क्रीम, औषधी पाल्याचा रस यांपैकी जे त्वरित उपलब्ध असेल ते चोळावे.मात्र टोकाला अडकलेली विषाची पिशवी न दाबता अलगद काटा काढावा.

- दिग्विजय पाटील,९४२३८६२९१९

( सेवानिवृत्त संचालक, मध संचालनालय, महाबळेश्वर,जि.सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com