Maize Weed Management: मक्यातील वाढत्या तणाचा करा सोप्या पद्धतीने बंदोबस्त!

Weed Control: सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना मजूर मिळणे अवघड होते. सोबत प्रत्येक शेतकऱ्यासाठी यंत्राची सोय करणे सोपे नसते त्यामुळे रासायनिक पद्धतीने तण नियंत्रणावर शेतकऱ्यांचा भर असतो.
Maize Weed Control
Maize Weed ControlAgrowon
Published on
Updated on

थोडक्यात माहिती:

१. राज्यातील पावसाची उघडपी झाल्यामुळे शेतकरी आंतरमशागतीची कामे करत आहेत; मात्र मजुरांची टंचाई आहे.

२. यामुळे मका पिकात तण नियंत्रणासाठी रासायनिक पद्धती अधिक वापरली जात आहे.

३. मका पिकात तण नियंत्रणासाठी अॅट्राझीन, २,४-डी, टेम्बोट्रिऑन, टोपरामेझॉन यांसारखी तणनाशके वापरली जातात.

४.फवारणी करताना मातीतील ओलावा, योग्य नोझल, शांत हवा आणि सुरक्षितता यांचे पालन करणे आवश्यक आहे.

५.तणनाशकाचे अवशेष कमी करण्यासाठी सेंद्रिय खते देणे फायदेशीर ठरते.

Maize Farming Management: राज्यातील बहुमतांशी भागात पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी आता आंतरमशागतीची कामे उरकत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना मजूर टंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे तण काढणीची कामे खोळंबत आहेत. राज्यात यंदा मक्याची लागवड वाढली आहे. मका पिकातील तण नियंत्रणासाठी दोन पध्दतींचा अवलंब शेतकरी करू शकतात. यात यांत्रिक आणि रासायनिक पध्दतींचा समावेश आहे.

मका पिकातील तणाच्या व्यवस्थापनामध्ये यांत्रिक तसेच रासायनिक पद्धतीचा वापर केला जातो. यांत्रिक पद्धतीसाठी विविध यंत्रे आणि मनुष्यबळाची गरज असते. सध्याच्या घडीला शेतकऱ्यांना मजूर मिळणे अवघड होते. सोबत प्रत्येक शेतकऱ्यासाठी यंत्राची सोय करणे सोपे नसते त्यामुळे रासायनिक पद्धतीने तण नियंत्रणावर शेतकऱ्यांचा भर असतो.

Maize Weed Control
Maize Cultivation: जळगाव जिल्ह्यात मका पीक एक लाख ८८ हजार हेक्टरवर

रासायनिक पद्धत-

मक्यामध्ये रासायनिक तणनाशकांचा वापर करुन तण नियंत्रण करणे ही पद्धत सर्रास वापरली जाते. त्यामुळे मका पिकातील तणासाठी कोणते तणनाशक वापरावे याची माहिती घेऊया..

१. अॅट्रॅझीन (५०% डब्ल्यू पी)

४०० ते ६०० ग्रॅम अॅट्रॅझीन पिकाच्या उगवणीपूर्वी हेक्टरी ५०० ते ६०० लिटर पाण्यातून फवारावे. हे तणनाशक रुंद पानांच्या आणि गवतवर्गीय तणांसाठी उपयुक्त आहे. पेरणीनंतर २४ ते ४८ तासांत जमिनीत ओलावा असताना द्यावे. हे तणनाशक फवारल्यानंतर १० ते १२ दिवस पिकाला पाणी देऊ नये.

२. २,४-डी अमाईन सॉल्ट (५८ टक्के एस. एल.)

हे तणनाशक पेरणीनंतर ३० ते ४० दिवसांनी शेतात फवारावे. त्यासाठी ३५० मि. ली. प्रति एकर प्रति ४०० लिट या प्रमाणाने त्याची फवारणी करावी. हे तणनाशक रुंद पानांच्या तणांसाठी जसे माठ, काटे, गोखरु, पुनर्नवा, दुधी, लव्हाळा, घोळ अशा तणांसाठी उपयोगी आहे.

३. टेम्बोट्रीऑन (३४.४ टक्के एस. सी.)

पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी हे तणनाशक फवारावे. फवारणीमध्ये एका एकरासाठी ११५ मिली तणनाशक पाण्यात मिसळावे. सावा, शिंपी, श्वेत पुनर्नवा या तणांसाठी या तणनाशकाचा वापर होतो.

४. टोपरामेझॉन(३३.६ टक्के एस. सी.)

पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी एक एकरसाठी ३० मिली टोपरामेझॉन १००-१२० लिटर पाण्यात मिसळून शेतात फवारावे. रुंद पानांच्या गाजर गवत, कुंजर, माठ, फुगा, रेशीमकाटा, बथुवा, कोंबडा (करडू), रान नाचणी, वाघनखी, सावा, गोंदवेल इत्यादी तणांच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे.

५. हॅलोसल्फ्युरॉन मिथाइल (७५ टक्के डब्ल्यू. जी)

पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी लव्हाळा तणाच्या व्यवस्थापनासाठी हॅलोसल्फ्युरॉन मिथाइलचा वापर करावा. ३६ ग्रॅम प्रति एकर या प्रमाणाने या तणनाशकाची पाण्यात मिसळून फवारणी करावी.

६.मेसोट्रिऑन (२.२७ टक्के) अधिक अॅट्रॅझीन (२२.७ टक्के एससी)

हे संयुक्त तणनाशक पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी फवारावे. हे संयुक्त तणनाशक १४०० मिली प्रति एकरसाठी पाण्यात मिसळून फवारावे. रुंद पानांच्या श्वेत पुनर्नवा, लव्हाळा, सावा, वाघनखी, इत्यादी तणांच्या व्यवस्थापनासाठी त्याचा वापर करावा.

७. ट्रॉप्रामेझोन (१० टक्के) अधिक अॅट्रॅझीन् (३० टक्के एससी)

हे संयुक्त तणनाशक एक एकरसाठी १००० मिली या प्रमाणाने पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांत फवारावे. रुंद पानांच्या गाजर गवत, माठ, कोंबडा, रान मेथी, रेशीमकाटा आणि वाघनखी या मक्यातील प्रमुख तणांवर त्याची फवारणी करावी.

Maize Weed Control
Maize Production: मका : समतोल धोरण हवे

तणनाशके फवारतांना घ्यावयाची काळजी

१. तणनाशक फवारणीपूर्वी त्यावरील माहिती व्यवस्थितपणे वाचून घ्यावी.

२. जमीनीवर तणनाशकाची फवारणी करण्यापूर्वी मातीमध्ये ओलावा असल्याची खात्री करावी.

३. तणनाशकाची फवारणी वारा शांत असताना करावी. वाऱ्याच्या उलट दिशेने फवारणी करु नये.

४. फवारणी पंपासाठी शिफारशीनुसारच नोझलचा वापर करावा.

५. तणनाशके पाण्यात मिसळताना लाकडी काठीचा वापर करावा. शिवाय फवारणी करताना तणनाशक तळाशी बसू नये म्हणून ढवळून घ्यावे किंवा पंप हलवून घेणे.

६. फवारणी करताना काही खाऊ नये, धूम्रपान करणे, डोळे चोळणे टाळावे.

७. तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा, गढून पाणी वापरु नये.

८. तणनाशक फवारणीसाठी साधारणत: स्वतंत्रपंप असावा.

९. तणनाशक खरेदी करण्यापूर्वी ज्या पिकासाठी ते वापरणार आहात त्या पिकाचा लेबल क्लेम आहे याची खात्री करावी.

१०. तणनाशकाची हाताळणी काळजीपूर्वक करावी. हातमोजे, मास्क, गॉगल, गम बुट घालून फवारणीला सुरुवात करावी.

११. तणनाशकाला खाद्यपदार्थ आणि लहान मुलांपासून दूर ठेवावे.

शेतामध्ये तणनाशकाचे विघटन चांगल्या आणि जलद पद्धतीने होण्यासाठी पिकाला सेंद्रीय खते द्यावी. सेंद्रीय खते मातीतील तणनाशकांचे अंश धरुन ठेवतात, सोबत सूक्ष्मजीवांचे प्रमाणही वाढते जे तणनाशकाच्या विघटनाला उपयुक्त ठरते.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

१. मका पिकात सर्वात उपयुक्त तणनाशक कोणते आहे?
अॅट्रॅझीन, २,४-डी अमाईल सॉल्ट, टेम्बोट्रीऑन, टोपरामेझॉन, मेसोट्रिऑन हे मका पिकात सामान्यतः सर्वाधिक वापरले जाणारे तणनाशक आहे.

२. पेरणीनंतर किती दिवसांनी तणनाशक फवारावे?
अॅट्रॅझीन तणनाशक पेरणीनंतर २४ ते ४८ तासांत फवारावे, तर इतर तणनाशके पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी फवारावे.

३. रासायनिक तणनाशके फवारताना कोणती काळजी घ्यावी?
मास्क, गॉगल, हातमोजे वापरून सुरक्षित पद्धतीने फवारणी करावी.

४. तणनाशकाचा पिकावर विपरित परिणाम होतो का?
योग्य प्रमाणात व योग्य वेळी वापरल्यास तणनाशकाचा पिकावर विपरित परिणाम होत नाही.

५. तणनाशकाचे विघटन जलद होण्यासाठी काय करावे
तणनाशकाचे विघटन जलद करण्यासाठी शेतात सेंद्रिय खतांचा वापर करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com