Carrot Grass
Carrot Grass Agrowon

Weed Control : गाजर गवत तण नियंत्रणासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक...

Parthenium Weed Control : कोणत्याही पडीक जमिनीकडे नजर वळवल्यास त्यावर गाजर गवताची वाढ झाल्याचे दिसून येते. या गवताची वाढ आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर होत असून, त्याच्या निर्मूलनासाठी गाव पातळीवर सामूहिकरीत्या प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
Published on

Weed Management : गाजर गवत हे पांढरी फुली, चटकचांदणी आणि काँग्रेस गवत अशा विविध नावांनी ओळखले जाते. शास्त्रीय भाषेत ‘पार्थेनिअम हिस्टेरोफोरस’ असे नाव असलेल्या या गवताचा प्रसार अमेरिकेतील मेक्सिको येथून जगभरात झाला. हे बारमाही तण असून अतिशय वेगाने वाढते. या झाडाला पांढऱ्या रंगाची असंख्य फुले येऊन, त्यापासून बी निर्मिती होते. या बिया रंगाला काळसर, लंब वर्तुळाकार, लहान आणि वजनाने हलक्या असतात.

या हलक्या बियांचा प्रसार वाऱ्यामार्फत दूरवर होतो. त्यामुळे या गवताने देशभरातील लाखो हेक्टर क्षेत्र व्यापलेले दिसते. शेतातील मुख्य पिकासोबत वाढल्यास अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा झाल्याने पीक उत्पादनात मोठी घट येते. या गवतामुळे वेगवेगळ्या ॲलर्जी उद्‍भवत असल्यामुळे सजीवांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. या गवताच्या समूळ निर्मूलनासाठी दरवर्षी १६ ते २२ ऑगस्ट या सप्ताहात ‘गाजर गवत जागरूकता सप्ताह’ आयोजित केला जातो.

आढळ

शेतीतील बांध, पडीक जमीन, चराऊ कुरणे, औद्योगिक वसाहती, रस्ते, रेल्वेमार्गाच्या बाजूने याशिवाय पाण्याच्या ठिकाणी या तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तूर, कापूस, ज्वारी, भुईमूग, ऊस, भाजीपाला व फळ पिके इ. सर्व पिकांमध्ये गवताचा प्रादुर्भाव आढळून येतो

आरोग्यावर होणारे दुष्परिणाम दुष्परिणाम

गाजर गवत खाण्यात आल्यामुळे मानवी आणि जनावरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम आढळून आले आहेत.

शेतातील गाजर गवत उपटून टाकताना त्याचे परागकण श्‍वसनावाटे शरीरात जाऊन खोकला, शिंका, दमा इ. श्‍वसनविकार होतात. अंगाला खाज व अन्य त्वचा विकार उद्‍भवतात.

या वनस्पतीला कडवट चव आणि विशिष्ट असा उग्र वास येतो. त्यामुळे जनावरे हे गवत सहसा खात नाहीत. जनावरांनी खाण्यात आल्यास त्यातील विषारी घटक दुधात उतरून दूध कडवट लागते.

Carrot Grass
Indian Agriculture : देशसेवेसह जोपासले शेती-मातीच्या सेवेचे व्रत

एकात्मिक नियंत्रण

गाजर गवताचे निर्मूलन फुलावर येण्यापूर्वी सामूहिकरीत्या करण्याची आवश्यकता असते. गावपातळीवर मोहीम राबवून गाव परिसरातील सर्व गाजर गवत नष्ट करावे. त्यातून प्रभावी नियंत्रण मिळण्यास मदत होते.

प्रतिबंधात्मक उपाय

शेतातील गाजर गवत फुलावर येण्यापूर्वी मुळासकट उपटून नष्ट करावे.

कंपोस्ट खड्डे, ओलिताचे दांड, शेतातील बांध, शेताच्या कडेचे बांध, रेल्वेमार्ग, रस्ते, पडीक जमिनी इ. ठिकाणी उगवलेले गाजर गवत मुळासकट उपटून टाकावे. त्यानंतर त्याचा ढीग करून वाळल्यानंतर जाळावे. त्यामुळे पहिल्या पावसात उगवून आलेल्या गाजर गवताचे उच्चाटन होईल.

पावसाळा संपल्यावर वाळलेले गाजर गवत दक्षता घेऊन जाळून टाकावे.

Carrot Grass
Carrot Grass : स्थलांतर करायला लावणारे गाजर गवत

रासायनिक नियंत्रण

उभ्या पिकांतील गाजर गवत निंदणी, खुरपणी, कोळपणीद्वारे मुळासकट काढून टाकावे.

पडीक जमिनीत म्हणजेच कोणतीही पिके किंवा फळझाडे नसलेल्या ठिकाणी ग्लायफोसेट (४१ टक्के एस. एल.) ८ ते १० मिलि किंवा २,४-डी (५८ टक्के) २ ते ३ मिलि प्रति लिटर यानुसार तणनाशक फवारण्याची शिफारस आहे. मात्र २,४-डी चा वापर करताना परिसरात द्विदल पीक असलेल्या शेतात फवारणी जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

उभ्या पिकात तणनाशकाचा वापर करू नये.

नैसर्गिक व्यवस्थापन

शेतामध्ये लागवडी पद्धतीत सातत्याने विविध पिकांची फेरबदल केल्यास गाजरगवताची समस्या कमी करणे शक्य होते. उदा. ज्वारी, झेंडू, धैंचा, बरसीम इ. मुळे गाजर गवताचा प्रसार कमी होतो. तसेच वाढ खुंटते.

यांत्रिक पद्धत

यंत्राच्या साह्याने किंवा उपटून गाजर गवत मुळासकट काढून विल्हेवाट लावावी. यासाठी पावसाळा हा उत्तम काळ आहे. योग्यप्रकारे नष्ट न केल्यास ते पुन्हा उगवण्याची शक्यता असते. गाजर गवत उपटताना हातामध्ये हातमोजे घालावेत. चेहऱ्यावर रुमाल किंवा कापड बांधून, डोळ्यावर चष्मा असावा. म्हणजे विविध ॲलर्जीपासून बचाव होईल.

जैविक नियंत्रण

गाजरगवताच्या जैविक नियंत्रणासाठी मेक्सिकन भुंग्यांचा (शा. नाव ः झायगोग्रामा बायकोलोरॅटा) यांचा वापर प्रभावी ठरतो. हे भुंगे गाजरगवत खाऊन उपजीविका करतो. ही अत्यंत कमी खर्चिक आणि पर्यावरणपूरक नियंत्रण पद्धती आहे. हे भुंगे पाऊस पडल्यानंतर प्रति हेक्टरी ५०० प्रमाणे सोडावेत.

संजय बाबासाहेब बडे, ७८८८२९७८५९, सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग,

दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com