
डॉ.वैभवकुमार शिंदे, डॉ.सुरेंद्र काळबांडे
Agriculture Technology: जैविक इंधनासाठी कच्चा माल म्हणून नेपिअर हे पीक फायदेशीर ठरू शकते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून बायोगॅस शुद्धीकरण करून इतर अनावश्यक वायू वेगळे करावे लागतात. बायोगॅसच्या शुद्धीकरणानंतर प्रमुख ज्वलनशील घटक असलेल्या मिथेन वायूचे प्रमाण ५५ टक्यांपासून ते ९७ टक्यांपर्यंत वाढविले जाते. बायो-सीएनजी वायू हा बायोगॅसच्या शुद्धीकरणानंतर प्राप्त होतो.
आरोग्यदायी पर्यावरणाच्यादृष्टीने स्वच्छ इंधन म्हणून बायोगॅसची निर्मिती आणि विकास झाला. बायोगॅस हे इंधन विविध कृषी घटकांपासून, सुक्या ओल्या कचऱ्यापासून तसेच जैविक घटकांपासून तसेच जनावरांच्या शेणापासून तयार होते. जैविक घटकांचे हवा विरहित विघटन करून बायोगॅस तयार होतो. यामध्ये मिथेन वायू हा प्रमुख घटक असतो. या मिथेन वायूला पुन्हा तांत्रिकदृष्ट्या स्वच्छ करून इंजिनामध्ये वापरण्यायोग्य बनविले जाते. नेपिअर गवतापासून तयार करण्यात येणाऱ्या बायोगॅसचे ‘बायो-सीएनजी’ मध्ये रूपांतर केल्यामुळे फायदा होऊ शकतो.
नेपिअर गवत १० ते १२ फूट उंच वाढते. प्रति एकरी प्रति वर्षी १०० ते १२० टन उत्पादन मिळते. सर्व प्रकारच्या जमिनीत लागवड करता येते. फळझाडांच्या मोकळ्या जागेतही या गवताची लागवड शक्य आहे. एका वर्षांमध्ये एकूण सहा वेळा गवताची कापणी शक्य आहे. साधारणपणे आठ वर्षांपर्यंत हे पीक शेतामध्ये राहते. म्हणून जैविक इंधनासाठी कच्चा माल म्हणून हे पीक फायदेशीर ठरून शकते. गवताचा उपयोग केवळ जैविक स्रोतांचा पुरवठा करण्यापुरता मर्यादित नसून जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी याची लागवड फायदेशीर ठरते.
बायोगॅस निर्मिती
वायू विरहित विघटन पद्धतीने जैविक घटकांचे विघटन करून त्यातून बायोगॅस निर्मिती केली जाते. या बायोगॅसमध्ये मिथेन वायू हा प्रमुख ज्वलनशील घटक असतो. मिथेन वायूचे प्रमाण बायोगॅसमध्ये जेवढे जास्त असेल तेवढी बायोगॅसची ज्वलन क्षमता अधिक असते. या गवताची मिथेन वायू निर्माण करण्याची क्षमता इतर काही जैविक घटकांपेक्षा जास्त आहे.
‘बायो-सीएनजी’ वायू निर्मिती
नेपिअरपासून बायोगॅस तयार करण्यासाठी ८ ते १६ दिवसांचा कालावधी लागू शकतो. एकूण सरासरीच्या विचार केल्यास नेपिअरपासून तयार करण्यात येणाऱ्या बायोगॅसमध्ये साधारणपणे ६२ टक्के या प्रमाणात मिथेन वायू आढळतो. मिथेन वायूचे हे प्रमाण बायोगॅससाठी उत्तम मानले जाते. म्हणून हा बायोगॅस ऊर्जा निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. बायो-सीएनजी वायू हा बायोगॅसच्या शुद्धीकरणानंतर प्राप्त होतो. त्याचा वापर करणे फायदेशीर आहे कारण प्रदूषणास आळा बसतो. हे इंधन अपारंपरिक ऊर्जा स्रोताच्या कक्षेत येते. बायो-सीएनजी वायू निर्मितीसाठी लागणारे तंत्रज्ञान हे इतर इंधन निर्मितीसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानापेक्षा स्वस्त आहे.
फायदे
नेपिअर गवत जलद गतीने वाढते. गवतामध्ये अधिक औष्णिक ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे. साधारणपणे १८.११ मेगाज्यूल एवढी ऊर्जा निर्माण होते.
गवताची मुळे मजबूत आणि अधिक खोलवर जाणारी असल्यामुळे माती वाहून जाण्यास प्रतिबंध होतो. जमिनीची गुणवत्ता सुधारते.
चारा लागवड केल्यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते.
‘बायो-सीएनजी’ निर्मिती करण्यासाठी प्रथम नेपिअर गवतापासून बायोगॅस तयार करतात. त्यानंतर बायोगॅसचे रूपांतर ‘बायो-सीएनजी’ मध्ये केले जाते. यासाठी अधिक ऊर्जा, अधिक खर्च आणि अधिक वेळेची आवश्यकता असते. सर्वसाधारपणे बायोगॅसमध्ये ५५ ते ६५ टक्यांपर्यंत मिथेन, ३५ ते ४० टक्के कार्बन डायऑक्साईड आणि ५ ते १० टक्के इतर वायूंमध्ये हायड्रोजन सल्फाइड, नायट्रस ऑक्साइडचा समावेश असतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बायोगॅस शुद्धीकरण करून इतर अनावश्यक वायू वेगळे करता येतात. त्यानंतरच शुद्ध बायोगॅस मिळू शकतो. बायोगॅसच्या शुद्धीकरणानंतर प्रमुख ज्वलनशील घटक असलेल्या मिथेन वायूचे प्रमाण ५५ टक्यांपासून ते ९७ टक्यांपर्यंत वाढविले जाते. शुद्ध बायोगॅस २० ते २५ मेगा पास्कल दाबाखाली ठेवला जातो. बायो-सीएनजीची औष्णिक क्षमता ५२,००० किलो ज्यूल प्रति किलो एवढी असते.
जैविक घटक मिथेन वायू निर्मिती क्षमता
नेपिअर ८४ टक्के
मुरघास ५२ टक्के
गाईचे शेण ६० टक्के
वाळलेली पाने ५८ टक्के
- डॉ.वैभवकुमार शिंदे, ९३०९८३७९३०
(कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय,अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.