AgriBid Tracker: पारदर्शक, ऑनलाइन शेतीमाल लिलावासाठी ‘ॲग्रीबिड ट्रॅकर’ प्रणाली

Agriculture Technology: ‘ॲग्रीबिड ट्रॅकर’ प्रणाली शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालासाठी पारदर्शक आणि योग्य बाजारभाव प्राप्त करण्यासाठी एक नवीन आणि सुलभ ऑनलाइन लिलाव व्यासपीठ प्रदान करते. यामुळे शेतकऱ्यांचे बाजारपेठेतील अनुभव सुधारतील आणि फसवणुकीची शक्यता कमी होईल.
AgriBid Tracker
AgriBid TrackerAgrowon
Published on
Updated on

Agriculture Online Auction System: पिकाचे उत्पादन हाती आल्यानंतर शेतकऱ्यांचे डोळे लागतात, ते बाजारपेठेकडे. बाजारपेठेमध्ये मालाची विक्री होऊन चांगला दर हाती यावा, ही अपेक्षा असते. सोबतच बाजारपेठेचा अनुभव विशेषतः पारदर्शक कामकाज व गुणवत्तेनुसार रास्त दर मिळण्याची अपेक्षा असते. मात्र सारी गडबड, गोंधळ याच ठिकाणी होते. उत्पादित शेतीमालाचा खुल्या पद्धतीने लिलाव, पारदर्शक कारभार,

मालाच्या दर्जानुसार योग्य बाजारभाव देऊन शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासोबतच विक्री व्यवस्थेचा चांगला अनुभव देण्याच्या उद्देशाने मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निक मधील पदविकेच्या तृतीय वर्षाच्या रिया भामरे, सिद्धी बागूल, सिद्धी चोथे व अनुश्री जाधव या विद्यार्थिनींनी ‘ॲग्रीबिड ट्रॅकर ऑनलाइन प्रणाली’ विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांनाही घरबसल्या लिलावामध्ये सहभागी होता येते. सर्व काही पारदर्शक असलेली ही प्रणाली शेतकरी आणि व्यापाऱ्यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

AgriBid Tracker
Agriculture Technology: बियाणे संरक्षणासाठी इलेक्ट्रोस्पिनिंग, नॅनो तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालासाठी फारच कमी बाजारपेठा उपलब्ध असतात. त्यातही पारदर्शकतेच्या अभावामुळे फसवणुकीच्या शक्यता वाढतात. प्रतवारीनुसार योग्य दर मिळेलच, याची खात्री नसते. तीच बाब खरेदीदारांसाठीही तितकीच खरी आहे. कारण त्यांच्या डोळ्यासमोर माल येत नाही, तोपर्यंत मालाच्या गुणवत्तेची कोणतीही खात्री नसते. या दोन्ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने ‘ॲग्रीबिड ट्रॅकर’ ही ऑनलाइन प्रणाली तयार करण्यात आली.

या नवकल्पनात्मक प्रकल्पाबद्दल ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्‍वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी यांसह संचालक, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

AgriBid Tracker
Agriculture Technology: प्रतवारी यंत्राचे विविध प्रकार

स्वतंत्रपणे बोली लावणे शक्य

शेतकरी, व्यापारी आणि प्रशासकांच्या भूमिका स्पष्ट करून त्यांच्या व्यवस्थापनाचे कामही यात होणार आहे. `ऑनलाइन बोली’ हे या प्रणालीचे वैशिष्ट्य़ आहे. त्यामुळे गुणवत्तेनुसार शेतमाल विक्रीत स्पर्धा होण्यास मदत होईल. या प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमालाची नोंद ऑनलाइन करावी लागेल. त्यासाठी त्यांचा सातबारा उतारा, शेतीचे जीपीएस लोकेशन यांची खात्री केल्यानंतरच पुढील व्यवहार होतील.

व्यापारासाठीचा परवाना देतानाही व्यापाऱ्याचे सर्व बँकिंग तपशील आधी तपासले जातील. ही सर्व माहिती वैध असल्याचे सिद्ध झाल्यानंतरच त्याला पुढील कामकाजामध्ये भाग घेता येईल.

शेतकरी, खरेदीदार, मध्यस्थी व सॉफ्टवेअर संबंधित काम करणारी व्यक्ती यांना प्रत्येकांना विशिष्ट लॉगइन आयडी दिलेला असेल. त्यांना त्यांच्या डॅशबोर्डवर शेतीमालाशी संबंधित माहिती पाहता येईल. सध्या या प्रणालीच्या विस्तृत पातळीवर चाचण्या घेतल्या जात आहेत.

‘युरेका आयडिया पिचिंग’ स्पर्धेत प्रथम क्रमांक

पीव्हीजी कॉलेजमध्ये आयोजित ‘युरेका आयडिया पिचिंग’ स्पर्धेमध्ये या ॲग्रीबिड ट्रॅकरला प्रथम क्रमांक मिळाला आहे. या प्रकल्पासाठी तृतीय वर्षाच्या रिया भामरे, सिद्धी बागूल, सिद्धी चोथे व अनुश्री जाधव या विद्यार्थिनींना प्राचार्य प्रशांत पाटील, प्रकल्प समन्वयक रचना पाटील, विभागप्रमुख प्रसाद बोरस्ते यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील टप्प्यामध्ये या विद्यार्थिनींना ‘आयआयटी, मुंबई’ येथे प्रकल्प सादर करण्याची संधी मिळाली आहे.

प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये

इंटरनेट, तंत्रज्ञान आणि माहिती विश्लेषणाचा वापर करून नावीन्यपूर्ण शेतमाल बोलीसाठी खास व्यासपीठ.

प्रवेश व्यवस्थापन आणि शेतीमाल पडताळणी यासारख्या सुरक्षा घटकांचा अंतर्भाव.

कृषी उत्पादन विपणन साखळीत स्पर्धात्मक वातावरणास प्रोत्साहन देण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक दर मिळण्यास मदत होईल.

माहितीसाठ्याच्या (डेटा) सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारांचे संरक्षण शक्य.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com