Monsoon Prediction : यंदाचा मॉन्सून खूप काही शिकवून गेला

Monsoon 2023 : यंदाच्या वर्षी मॉन्सूनचा पाऊस बेताचा राहील, पण देशपातळीवर दुष्काळाची संभावना नाही, हा एप्रिलमध्ये दिलेला अधिकृत अंदाज खरा ठरला आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon
Published on
Updated on

डॉ. रंजन केळकर

Monsoon Rain : यंदाच्या वर्षी मॉन्सूनचा पाऊस बेताचा राहील, पण देशपातळीवर दुष्काळाची संभावना नाही, हा एप्रिलमध्ये दिलेला अधिकृत अंदाज खरा ठरला आहे. परंतु महाराष्ट्रासह इतरही राज्यात कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांत मात्र आत्ताच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

नैर्ऋत्य मॉन्सून सबंध देशावर एकाच दिवशी अवतरत नाही किंवा तो एकाच दिवशी देशातून नाहीसाही होत नाही. मॉन्सूनचे येणे आणि त्याचे परतणे या दोन्हीही ३०-४० दिवस चालणाऱ्या प्रक्रिया आहेत. त्यांच्या तारखाही दरवर्षी मागेपुढे होत असतात. हे सर्व लक्षात घेऊन, हवामानशास्त्रज्ञांनी त्यांच्या सोयीसाठी १ जून ते ३० सप्टेंबर हा मॉन्सूनचा कालावधी म्हणून ठरवला आहे. ही प्रणाली जुनी आहे आणि परदेशातील शास्त्रज्ञसुद्धा या तारखा मानतात.

या कालावधीसाठी पावसाची सरासरी काढली जाते. तिच्या तुलनेत आगामी मॉन्सून कसा असेल याचे पूर्वानुमान एप्रिल-मेमध्ये दिले जाते आणि तो वास्तवात कसा राहिला, याचा आढावा सप्टेंबर संपल्यावर घेतला जातो. मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचा सर्व हिशेब आणि त्याचे सर्व विश्‍लेषण १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीसाठी केले जाते. याचा अर्थ असा लावला जाऊ नये, की मॉन्सून आता संपला आहे. देशात अनेक भागांवर तो अजून सक्रिय आहे आणि काही जागी भरपूर पाऊस पडत आहे.

यंदाच्या मॉन्सूनमध्ये देशभरचा एकूण पाऊस सरासरीपेक्षा केवळ ६ टक्के कमी भरला. देशातील ३६ हवामानशास्त्रीय उपविभागांपैकी २९ उपविभागांत सामान्य किंवा चांगला पाऊस झाला. महाराष्ट्र राज्यातील चारही उपविभागांत पाऊस सामान्य राहिला. (कोकण + (अधिक) ११ टक्के, मध्य महाराष्ट्र - उणे १२ टक्के, मराठवाडा - उणे ११ टक्के आणि विदर्भ - उणे २ टक्के) ही एक समाधानकारक परिस्थिती आहे.

महाराष्ट्र राज्यातील ३६ पैकी २७ जिल्ह्यांत मॉन्सूनचा एकूण पाऊस सामान्य किंवा सामान्याहून चांगला झाला. फक्त ९ जिल्ह्यांत तो सामान्याहून कमी राहिला. हे जिल्हे आहेत ः सांगली - उणे ४४ टक्के, सातारा - उणे ३७ टक्के, जालना - उणे ३३ टक्के, सोलापूर - उणे ३० टक्के, अमरावती - उणे २७ टक्के, धाराशिव - उणे २४ टक्के, बीड - उणे २३ टक्के, हिंगोली - उणे २३ टक्के, आणि अकोला - उणे २३ टक्के.

यंदाच्या वर्षी मॉन्सूनचा पाऊस बेताचा राहील, पण देशपातळीवर दुष्काळाची संभावना नाही, हा एप्रिलमध्ये दिलेला अधिकृत अंदाज खरा ठरला आहे. परंतु महाराष्ट्रासह इतरही राज्यांत कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यांत पाणीटंचाई आताच जाणवू लागली आहे. भविष्यात ही टंचाई अधिक जाणवेल. त्यामुळे दुष्काळाच्या अनुषंगाने त्यावर उपाययोजना करायला हव्यात. हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलेल्या दीर्घ अवधी अंदाजात दरवर्षी सुधारणा होत असून, ते विश्‍वसनीय बनले आहेत, हीसुद्धा एक समाधानकारक बाब आहे.

‘एल निनो’चा बागुलबुवा
हवामान बदल हा हल्लीच्या काळात एक अतिशय महत्त्वाचा विषय बनला आहे. हवामानात काहीही निराळे घडले की ती लगेच ब्रेकिंग न्यूज म्हणून झळकते. जगातील मोठे नेते जेव्हा भेटतात तेव्हा ते आधी हवामान बदलाविषयी चर्चा करतात. अगदी लहान मुलेदेखील हवामान बदलाविषयी पोस्टर बनवतात, चित्रे रेखाटतात, निबंध लिहितात.

अनेक क्षेत्रांतील शास्त्रज्ञ हवामान बदलाच्या परिणामांवर सतत संशोधन करत आहेत. या संदर्भात परदेशातील शास्त्रज्ञांसाठी भारतीय मॉन्सून हा एक कुतूहलाचा विषय झाला आहे. आपल्या मॉन्सूनला हवामान बदलामुळे काही धोका निर्माण झाला असल्यास त्याबद्दल आपल्याला सजग करायची जबाबदारी त्यांची.

Monsoon Update
Monsoon, Cyclone Update : बिपॉरजॉय, एल निनो आणि यंदाचा मॉन्सून

आहे असे त्यांना वाटते. या वर्षीच्या मार्च महिन्यात प्रशांत महासागरावर तापमान वाढ होत असल्याची चिन्हे प्रथम दिसू लागली होती. अशा प्रकारचे चढ उतार तेथे होत राहतात. त्यात काही नवीन नाही. जेव्हा प्रशांत महासागरावरचे तापमान खूप वाढते तेव्हा त्याला एल निनो म्हटले जाते. त्याचे भारतीय मॉन्सूनशी जुने सहसंबंध आहेत.

एल निनोच्या परिस्थितीत आपल्याकडे पाऊस कमी पडल्याची अनेक उदाहरणे आहेत. उलट एल निनोच्या वर्षी आपल्याकडे पाऊस चांगला झाल्याचीही उदाहरणे आहेत. तरीही यंदाच्या मार्च महिन्यात एल निनोची लक्षणे दिसताच भारतावर दुष्काळ पडेल अशी वक्तव्ये द्यायला लोकांनी सुरुवात केली.

अपूर्ण माहितीवर आधारित अशी विधाने शेतकरी बंधूंनी मनावर न घेणे बरे. काही नाटकांत एक बागुलबुवा असतो ज्याचे भीती निर्माण करण्यापलीकडे काही मोठे काम नसते. मॉन्सूनच्या नाटकातील एल निनो हा असाच एक बागुलबुवा समजावा.

प्रशांत महासागरावरील एल निनो मागे कित्येक वर्षी आपण झेलला आहे, तसाच या वर्षीही तो झेलण्यात आपण सक्षम ठरलो. येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, की एल निनो हा मॉन्सूनला ताब्यात ठेवणारा एकमेव नियंत्रक नाही. इतर काही घटकही आहेत जे एल निनोच्याविरुद्ध आणि मॉन्सूनच्या वतीने कार्य करत असतात.

Monsoon Update
Monsoon Rain : यंदाचा जुलै विक्रमी पावसाचा

पाऊस आणि उघडीप
पिकांच्या योग्य वाढीसाठी पाणी आणि सूर्यप्रकाश या दोन्हींची गरज असते. ती गरज भागावी म्हणून निसर्गाची जणू ही योजना आहे, की मॉन्सूनचा पाऊस सतत किंवा न थांबता असा कधीच पडत नाही. पावसाचे एक सत्र संपले, की काही दिवसांची उघडीप राहते.

जर पाऊस सतत पडत राहिला तर बियाणे, रोपे वाहून जातील. आकाश कायम ढगाळ राहिले, तर रोगांचा प्रादुर्भाव होईल. नुसतेच कडक ऊन राहिले तर पिके वाळून जातील. म्हणून पाऊस आणि उघडीप आलटून पालटून राहायची सोय निसर्गाने केलेली आहे.

हवामानाच्या परिभाषेत याला ‘मॉन्सून सक्रिय राहणे’ आणि ‘मॉन्सूनमध्ये खंड पडणे’ असे म्हणतात. मॉन्सूनमध्ये खंड पडायची अनेक कारणे असू शकतात. मात्र दहा-पंधरा दिवसांपेक्षा खंड लांबला तर तो पिकांसाठी अपायकारक ठरतो. यंदा जूनचे पहिले तीन आठवडे पावसाच्या प्रतीक्षेत गेले. त्यानंतर जुलैचे पाचही आठवडे पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडला.

पुन्हा ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा राहिला. त्यानंतर मात्र मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आणि सप्टेंबर महिन्यात पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून निघाली. अजूनसुद्धा देशात मॉन्सून अनेक भागांत पाऊस देत आहे.

शिकण्यासारखे बरेच काही
यंदाचा मॉन्सून आपल्याला खूप काही शिकवून गेला आहे. एक तर भारतीय हवामान विभागाने वेळोवेळी जाहीर केलेले मॉन्सूनच्या पर्जन्यमानाविषयीचे सर्व अंदाज बरोबर ठरले आहेत. हवामान विभाग जे सांगतो त्यावर शेतकरी बंधूंनी भरवसा ठेवणे त्यांच्या फायद्याचे ठरेल. दुसरे हे, की ‘बघा, एल निनो येत आहे, आता दुष्काळ पडणार!’ अशा प्रकारच्या भीतिदायक विधानांच्या किंवा मथळ्यांच्या आपण आहारी जाऊ नये आणि घाबरून जाऊ नये.

परंतु चांगल्या पाऊसमान काळातही काही भागांत कमी पाऊस होतो. तिथे पाणीटंचाई जाणवू नये म्हणून उपाययोजना केल्या पाहिजे. तिसरी गोष्ट ही, की काही ठिकाणी अतिवृष्टीच्या घटनाही होत असलेल्या आपण पाहत असलो, तरी भारतीय मॉन्सून एक वैश्‍विक स्तरावरील प्रक्रिया आहे. मॉन्सूनच्या अस्तित्वाला भविष्यकाळात काही धोका असल्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.

(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com