Monsoon, Cyclone Update : बिपॉरजॉय, एल निनो आणि यंदाचा मॉन्सून

El Nino Update : चक्रीवादळ आणि मॉन्सून यांचा छत्तीसचा आकडा असतो. यंदा ‘एल निनो’ तर सक्रिय आहेच, त्याशिवाय त्याला बिपॉरजॉय चक्रीवादळाची साथ मिळाल्याने, केरळमध्ये एक जूनला येणारा मॉन्सून आठ जूनला दाखल झाला आहे.
Monsoon
MonsoonAgrowon

Biporjoy Cyclone : बिपॉरजॉय, एल निनो आणि मॉन्सून हे तीन शब्द आजच्या दिवशी मराठी संभाषणात चर्चेचे प्रमुख विषय झाले आहेत. विशेष हे, की हे तिन्ही शब्द मराठी नाहीत. ‘बिपॉरजॉय’ हा बंगाली शब्द बांगलादेशात वापरला जातो.

‘एल निनो’ हा मूळचा स्पॅनिश शब्द दक्षिण अमेरिकेत प्रचलित आहे. तर ‘मॉन्सून’ हा इंग्रजी शब्द अरबी भाषेतून आला आहे. आज ज्या जगात आपण राहतो ते एक जोडलेले जग आहे.

इंटरनेट, मोबाइल आणि सोशल मीडियाद्वारे आपण परस्परांशी संवाद साधतो, दूरच्या देशांबरोबर माहितीची देवाणघेवाण करतो. म्हणून काही अनोळखी शब्द आपण समजून घेतले आणि मराठीत आत्मसात केले तर त्यात काही वावगे नाही.

बिपॉरजॉय

अरबी समुद्रावर नुकतेच म्हणजे ७ जून २०२३ रोजी जे चक्रीवादळ उद्‍भवले त्याला बिपॉरजॉय हे नाव दिले गेले. हा शब्द विपर्यय या मूळ संस्कृत शब्दाचे बंगाली रूपांतर असून, बांगलादेशात तो आपत्ती अशा अर्थाने वापरला जातो. चक्रीवादळांचे नामकरण करायची प्रथा आपल्यासाठी काहीशी नवीन आहे.

चक्रीवादळे फक्त भारतावर येतात असे नाही. ती अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर निर्माण होऊन आपला मार्ग आखतात आणि त्यांच्यातील काही वादळे बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, ओमान या आणि इतर शेजारी देशांकडेही जातात. उदाहरणार्थ, मे महिन्यात आलेले मोखा नावाचे वादळ म्यानमारला जाऊन धडकले होते.

म्हणून या सर्व देशांचे प्रतिनिधी एकत्र येऊन एकमताने विविध भाषांतील विविध नावांची एक यादी बनवतात आणि मग त्यातील क्रमानुसार नव्याने उद्‍भवलेल्या चक्रीवादळांचे नामकरण केले जाते.

Monsoon
Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळाची तिव्रता वाढत जाणार; माॅन्सूनवर काय परिणाम होणार?

एल निनो

‘एल निनो’ हा एक स्पॅनिश भाषेतील शब्द आहे ज्याचा अर्थ एक पवित्र बालक असा आहे. प्रत्यक्षात मात्र एल निनो प्रशांत महासागरावरील एक समुद्री व वातावरणीय प्रक्रिया आहे जी दर २-३ वर्षांत एकदा निर्माण होते आणि एक वर्षभर टिकून राहते. एल निनोच्या आगमनाची धोक्याची घंटा या वर्षी मार्च महिन्यातच वाजवली गेली होती.

एल निनो ही दीर्घ पल्ल्याची प्रक्रिया असते जिच्यात प्रशांत महासागराचे तापमान सरासरीपेक्षा बरेच वाढते. डिसेंबर महिन्यात तापमान सर्वाधिक असले, तरी मार्च महिन्यापासूनच एल निनोचे वेध लागायला सुरुवात होते.

प्रत्येक एल निनोमुळे भारतीय मॉन्सूनवर हमखास विपरीत प्रभाव पडतोच, असे मात्र नाही. तरी एल निनोचा भारतीय मॉन्सूनवर विपरीत प्रभाव पडायची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यावर नजर राखणे गरजेचे असते.

मॉन्सून

‘मॉन्सून’ हा इंग्रजी शब्द आहे, जो मूळ मौसिन या अरबी शब्दाचे रूपांतर आहे. मॉन्सून म्हणजे पावसाळा नाही. पावसाळा हा हिवाळा किंवा उन्हाळा यांसारखा एक ऋतू म्हणता येईल, तर मॉन्सून ही एक प्रक्रिया आहे. मॉन्सून म्हणजे वर्षात दोनदा दिशा बदलणारे वारे जे आपल्याकडे वर्षातील चार महिन्यांत पाऊस घेऊन येतात.

नैर्ऋत्य मॉन्सून जूनच्या सुरुवातीस दक्षिणेकडून म्हणजे केरळ राज्यामधून भारतात प्रवेश करतो. हळूहळू पुढे सरकून तो संपूर्ण देश व्यापतो आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीस पुन्हा माघार घेऊ लागतो. मग नैर्ऋत्य मॉन्सूनचे ईशान्य मॉन्सूनमध्ये रूपांतर होऊन डिसेंबरमध्ये त्याचे अस्तित्व संपते.

चक्रीवादळे आपत्तिजनक असली तरी वातावरणात ऊर्जेचे संतुलन राखायचे काम करतात. चक्रीवादळे तापलेल्या समुद्रावर निर्माण होतात आणि पृथ्वीच्या उष्ण कटिबंधात साचून राहिलेली सूर्याची उष्णता शीत कटिबंघात पसरवतात.

याउलट, मॉन्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत समुद्र थंडावलेला असतो आणि चक्रीवादळे बनू शकत नाहीत. परिणामी, बहुतेक चक्रीवादळे एप्रिल-मे आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या महिन्यांत येतात. मात्र क्वचित असे होते, की एखादे चक्रीवादळ जूनच्या सुरुवातीस उद्‍भवते, जसे या वर्षी झाले. बिपॉरजॉय एक अतितीव्र चक्रीवादळ असूनही ते भारताच्या पश्‍चिम किनारपट्टीपासून खूप दूर अंतरावर राहिल्यामुळे आपल्याला त्याचा उपद्रव झाला नाही.

चक्रीवादळ आणि मॉन्सून यांचा छत्तीसचा आकडा असतो, असे म्हणायला हरकत नाही. ते एकत्र नांदूच शकत नाहीत. बिपॉरजॉयमुळे मॉन्सूनच्या आगमनाला विलंब लागणे साहजिक होते.

ज्या वर्षी प्रशांत महासागरावर एल निनो उद्‍भवतो, त्या वर्षी नैर्ऋत्य मॉन्सूनचे केरळवरील आगमन थोडे उशिरा होते, असे मागील काही एल निनो वर्षांत दिसून आले आहे. यंदाच्या वर्षी एल निनो, तर सक्रिय आहेच आणि त्याशिवाय त्याला ऐन वेळी बिपॉरजॉयची साथ मिळाल्याने, मॉन्सूनचे केरळवरील आगमन लांबणीवर पडले.

मॉन्सूनचे भवितव्य

मॉन्सून केरळवर सामान्यपणे एक जूनला आपली हजेरी लावतो. त्यानंतर १०-१२ दिवसांनी तो महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो. अर्थात, मॉन्सून जर मुळात केरळवर उशिरा दाखल झाला तर त्याला महाराष्ट्रावर यायलाही उशीर होतो. पण त्या दरम्यान महाराष्ट्रावर, विशेषतः कोकणात, पूर्वमॉन्सून पावसाच्या सरी पडू शकतात.

यंदाही बिपॉरजॉयच्या प्रभावाखाली तसे होण्याची शक्यता आहे. नैर्ऋत्य मॉन्सूनला संपूर्ण देश व्यापायला बरेच दिवस लागतात. म्हणून जून महिन्यातील देशभराच्या पावसाची सरासरी जुलै-ऑगस्टच्या सरासरीहून खूप कमी भरते. तशातही यंदाच्या जून महिन्याचे पर्जन्यमान बेताचेच राहील, असा अधिकृत अंदाज आधीच वर्तवला गेलेला आहे.

या दृष्टीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सावधानता बाळगायची गरज आहे. कारण जून महिन्याचा पाऊस पेरणीच्या बाबतीत महत्त्वाचा असतो. कृषी-हवामानाचा अधिकृत अंदाज त्यांनी नियमितपणे ऐकावा, पाहावा आणि त्यातील सल्ला लक्षात घ्यावा.

Monsoon
Monsoon 2023 : माॅन्सूनची केरळ, तमिळनाडूपर्यंत मारील मजल; दोन दिवसांमध्ये कर्नाटकात पोचणार : हवामान विभाग

मॉन्सूनचा पाऊस एकंदर भारतावर कसा राहील, याचा अधिकृत अंदाज आधी एप्रिल महिन्यात आणि दुसऱ्यांदा मे महिन्यात जाहीर केला गेला आहे. या दोन्ही दीर्घ अवधी पूर्वानुमानात हे स्पष्ट केले गेले आहे, की देशभरावरील मॉन्सूनचा पाऊस सरासरीच्या ९६ टक्के राहण्याची शक्यता आहे.

त्यातही अधिक उणे ४ टक्के फरक पडू शकतो. तात्पर्य हे, की यंदाच्या मॉन्सूनचा पाऊस सामान्य किंवा बेताचा राहण्याची शक्यता आहे आणि मॉन्सूनकडून मोठ्या अपेक्षा नाहीत. शेतकरी बंधूंनी हे लक्षात घ्यावे आणि हवामानाचा अधिकृत अंदाज व कृषी सल्ला नियमितपणे ऐकून त्यानुसार आपली शेतीची कामे हाती घ्यावीत आणि आपल्या योजना आखाव्यात.

(लेखक ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com