
Effective Turmeric Farming : हळदीचा हंगाम सुरू होण्यास अजून थोडा वेळ आहे. पश्चिम महाराष्ट्र सांगली पट्ट्यातील हळद मराठवाडा, विदर्भाच्या तुलनेत थोडी लवकर बाजारात येते. मराठवाडा, विदर्भातून हळद बाजारात येण्यास अजून दीड-दोन महिने तरी लागतील. त्यामुळे हिंगोली बाजारात सध्या हळदीची आवक थोडी कमी असल्याने दर (बंडा) प्रतिक्विंटल १२ हजार रुपयांवर, तर हळद कांडीचे दर १३ ते १५ हजार रुपयांवर आहेत.
हळदीची आवक सुरू होतानाचे हे दर आहेत. प्रत्येक वर्षी हळदीची आवक सुरू होताना दर वधारलेले असतात. हे दर प्रतिक्विंटल १५ ते २० हजार रुपयांवर जातात. परंतु राज्यात हळदीचा मुख्य हंगाम (मार्च ते मे) सुरू होऊन आवक वाढायला लागते, त्या वेळी दर जेमतेम चार ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलवर येतात.
याच काळात तेलंगणा राज्याच्या आपल्या शेजारील जिल्ह्यांतून हळदीची आवक सुरू होते. त्याचाही प्रतिकूल परिणाम दरावर होतो. राज्यात या वर्षी हळदीवर कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे हळद उत्पादनात २० ते २५ टक्के घट होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी प्रक्रिया उद्योगांकडून हळदीची मागणी वाढत असल्याने दर काही प्रमाणात टिकून राहतील, असाही अंदाज वर्तविला जात आहे.
देशाचा विचार करता या वर्षी हळद लागवड क्षेत्र ३५ हजार हेक्टरने घटले आहे. हळद लागवडीच्या काळात वाढते तापमान, २०२३ च्या मॉन्सूनमधील कमी पाऊसमान, त्यानंतरच्या उन्हाळ्यातील भीषण पाणीटंचाई, मागील दोन-तीन वर्षांपासून वाढलेला मॉन्सूनोत्तर पाऊस, दर्जेदार हळदीच्या बेण्याची टंचाई आणि दरात होत असलेला मोठा चढ-उतार हे क्षेत्र घटीची काही कारणे आहेत.
भारतीय हळद ही मध्ययुगीन काळापासून जगाचे आकर्षण राहिली आहे. जगातील एकूण हळद उत्पादनात तब्बल ८० टक्के, तर निर्यातीत ३५ टक्के वाटा भारताचा आहे. आयुर्वेदाचा इतिहास पाहिला तर हळदीचं महत्त्व आपल्याला पानोपानी दिसते. भारतीयांच्या रोजच्या स्वयंपाकात हळद हा जणू अत्यावश्यक घटक असतो. परंतु हळदीचे औषधी गुणधर्म हीच या पिकाची मोठी ताकद आहे. हळदीचा मुख्य वापर असलेली अँटिसेप्टिक क्रीमसारखी उत्पादने लोकप्रिय आहेत. खास करून त्वचेवरच्या आजारासाठी हळदीचा उपयोग होत असल्याने वेगवेगळ्या औषधी उत्पादनांसाठी हळदीची मागणी सातत्याने वाढत आहे.
नैसर्गिक आपत्तींमध्ये इतर हंगामी पिकांच्या तुलनेत कमी नुकसान, कीड-रोगांचा प्रादुर्भावही कमी, लागवड आणि काढणीसाठी मिळणारा पुरेसा वेळ, जंगली प्राण्यांचा त्रास नाही, बऱ्यापैकी उत्पादन यामुळे हळद हे पीक देशातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. आपल्या राज्यातही सांगली, सातारा विभागांतील हे पीक मराठवाडा, विदर्भातही पोहोचले आहे. लागवड, प्रक्रिया, उपयोग अशा अनेक अंगांनी उपयुक्त हळदीच्या क्षेत्रात होणाऱ्या घटीचे समर्थन होऊ शकत नाही.
देशात ५३ हून अधिक हळदीच्या जातींची लागवड होत असली, तरी कमी कालावधी, कीड-रोग प्रतिकारक, अधिक उत्पादनक्षम, कुरकुमीनचे जास्त प्रमाण आणि प्रक्रियेस सुलभ अशा जाती देशातील शेतकऱ्यांना मिळायला हव्यात. अशा जातींचे दर्जेदार बेणे, रोपे शेतकऱ्यांना मागणीनुसार पुरवावे लागतील. हळद लागवड ते काढणी आणि प्रक्रिया हे कष्टाचे आणि खर्चीक काम असून, या कामांत यांत्रिकीकरणाचा वापर वाढला पाहिजेत.
काही प्रगत देशांत कच्च्या हळदीवरच प्रक्रिया केली जाते. अशा जाती तसेच प्रक्रिया तंत्र देशातील शेतकऱ्यांना मिळायला हवे. आपला बहुतांश व्यापार हा कच्च्या हळकुंडाचा आहे. हळदीचे मूल्यवर्धन करून उत्पादनांची निर्यात करणे ही आपली पुढची दिशा असायला हवी. असे झाले तर देशात हळदीचे उत्पादन वाढेल, दरातील चढ-उतार कमी होईल, उत्पादित हळदीची निर्यात वाढेल, जागतिक बाजारात आपला दबदबा टिकून राहील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.