
Buldana News : हळद हे पीक फायदेशीर आहे. हे एक पीक शेतकऱ्यांना पुढे नेऊ शकते. वन्यप्राण्यांचा त्रास नाही. फळबागेतही आंतरपीक म्हणून घेता येते. अशा प्रकारच्या हळदीच्या पिकात बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, सुपारी व मसाला पिके संचालनालय (कालिकत) पुरस्कृत राष्ट्रीय फलोत्पादन योजना व जानेफळ येथील विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्युसर कंपनीतर्फे शनिवारी (ता. १४) येथे हळद प्रशिक्षण व परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. गडाख बोलत होते.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती विभागीय कृषी सहसंचालक प्रमोद लहाळे, बुलडाणा जिल्हा आत्मा प्रकल्प संचालक पुरुषोत्तम उन्हाळे, उपविभागीय कृषी अधिकारी विजय सरोदे, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, हरिदास पाटील वेताळ (श्रीरामपूर), भाजीपाला शास्त्र विभाग प्रमुख डॉ. अरविंद सोनकांबळे,
प्रकल्प संयोजक डॉ. विजय काळे, गजानन कृपाळ, समाधान सुपेकर, नियंत्रक प्रमोद पाटील, डॉ. नितीन कोष्टी, गजानन वडनकर, शेतकरी कंपनीचे अध्यक्ष संतोष साखरे, उपाध्यक्ष मोहन प्र. धोटे, सचिव अमोल माडोकर, मोहन जि. धोटे, गजानन काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. गडाख यांनी पंदेकृविच्या उपलब्धींचा सविस्तर आढावा घेतला. शिवाय हळदीच्या पिकात केलेल्या संशोधनाची सविस्तर माहिती दिली. पीडीकेव्ही वायगाव हा हळदीचा अत्यंत चांगला वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे.
उत्पादन घेतानाच शेतकऱ्यांनी एकत्र येत कंपन्यांची स्थापना करावी. शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचा ब्रँड तयार करावा. यातून दुप्पन्न उत्पन्नाची शाश्वती तयार होईल. विद्यापीठाने या पिकाचे लागवड तंत्रज्ञान विकसित केले. शिवाय काढणी व वाळवणीसाठीही यंत्रे बनवल्याचे त्यांनी सांगितले.
विभागीय कृषी सहसंचालक श्री. लहाळे यांनी अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी प्रयोगशिल असल्याचे सांगितले. हळद पिकामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल, असे सांगत कृषी विभाग शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य करण्यासाठी तत्पर असल्याचे प्रतिपादन केले.
प्रकल्प संयोजक डॉ. विजय काळे यांनी पीडीकेव्ही वायगाव या हळद वाणाची वैशिष्टये सांगतानाच लागवड कालावधी, बेणे निवड, जमीन, शेणखताचा वापर, सेंद्रिय-रासायनिक व्यवस्थापन पद्धती, कीड-रोगांचे व्यवस्थापन, हळदीची काढणी, साठवणूक अशा विविध टप्प्यांवर करावयाच्या कामांची माहिती दिली. डॉ. सोनकांबळे यांनी प्रास्ताविक केले. या भागातील प्रयोगशिल शेतकऱ्यांचा सन्मान या वेळी करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.