Team Agrowon
हळद लागवडीच्या काळात वाढते तापमान, गतवर्षी झालेला कमी पाऊस, आणि यंदाचा सततचा पाऊस यामुळे देशातील हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यात या साऱ्याचा परिणाम हळद लागवडीवर झाला.
हळद लागवड लांबणीवर पडली. त्यातच हळद बियाण्यांची टंचाई आणि वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांनी लागवडीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे देशात ३५ हजार हेक्टरने हळदीच्या क्षेत्रात घट झाली असल्याची माहिती हळद संशोधन केंद्राने दिली आहे.
देशात गत वर्षी म्हणजे सन २०२३-२४ मध्ये ३ लाख ५ हजार १८२ हेक्टरवर हळदीची लागवड झाली होती. गेल्या दोन ते तीन वर्षांत हळदीला चांगले दर मिळत असल्याने शेतकरी हळद लागवडीसाठी पुढे येत आहेत.
गत वर्षी पाऊस कमी झाला. परिणामी पाण्याची टंचाई निर्माण भासू लागली. त्यामुळे उत्पादनही घटल्याने बियाण्यांचे उत्पादन कमी झाले.
मुळात गत वर्षी पाण्याची समस्या निर्माण झाल्याने हळद लागवड करायची की नाही, अशी द्विधा अवस्था शेतकऱ्यांनी निर्माण झाली होती. तसेच यंदाच्या हंगामातील लागवडीवर पाणीटंचाई आणि अतिउष्णतेचा परिमाण झाला.
मे महिन्यात होणारी हळद लागवड शेतकऱ्यांना पुढे ढकलावी लागली. पाणीटंचाईच्या काळात उपलब्ध पाण्यावर शेतकऱ्यांनी हळद लागवड केली. जून महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली.
सतत पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना हळद लागवड करण्यासाठी अडथळे निर्माण झाले. अशा परिस्थितीतही पावसाने उसंत घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी हळद लागवडीचे नियोजन करत लागवड पूर्ण केली.
बियाण्यांची कमतरता आणि त्यातच हळद उत्पादनाच्या वाढता खर्चामुळे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी हळद लागवडीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यंदा देशात २ लाख ७० हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ३५ हजार १८२ हेक्टर क्षेत्र घटले आहे.