साध्या माणसांच्या, साध्या पद्धतीनं सांगितलेल्या साध्या गोष्टी मनाला अनुपम आनंद देतात. त्यामध्ये नात्यांचा सुगंध असतो. छोटे-मोठे झगडे असतात. रुसवे-फुगवे असतात. थोडासा दुरावा आणि दीर्घकाळचा स्निग्ध सहवास, हवाहवासा... प्रेमरज्जू अधिक मजबूत करणारा. आठवून पाहा हृषीकेश मुखर्जींचे चित्रपट - गोलमाल, चुपके चुपके, आनंद, गुड्डी किंवा राजश्री प्रॉडक्शनचे आधीचे चित्रपट - दोस्ती, सौदागर, गीत गाता चल, चितचोर, दुल्हन वहीं जो पिया मन भाये, सावन को आने दो. आपलं भावविश्व समृद्ध करणारी त्यातली सुरेल गाणीही जरा आठवा. साध्या माणसांच्या अशा गोष्टी आपल्याला भावतात, कारण त्यात आपलंच प्रतिबिंब असतं.
अशी ही साधी माणसं फार मोठी स्वप्नं पाहत नाहीत. छोटे छोटे आनंद त्यांना जगण्याची अक्षय ऊर्जा पुरवत राहतात. त्यासाठी त्यांनी खूप श्रीमंतच असायला हवं, अशी काही पूर्वअट नसते. संसारातले आर्थिक काच, त्यातून आलेलं मागासलेपण यामुळं ती काही काळ हतबलही होतात, पण कायमची निराश होत नाहीत. गरिबीच्या फाटक्या गोधडीला टाके घालण्यात ती माहीर असतात. कितीही अडचणींतून गेल्यानंतर पुन्हा एकदा उमेद बांधून ती जगाला हसत हसत सामोरी जातात.
‘मालगुडी डेज’ किंवा प्राइम व्हिडिओवर असलेली ‘पंचायत’ ही मालिका त्याचाच तर प्रत्यय देते. पु. ल. देशपांडे यांचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ असो किंवा व्यंकटेश माडगूळकरांची ‘माणदेशी माणसं’; नितळपणानं जगणारी माणसं आपल्या स्मृतिमंजूषेत कायमची ठाण मांडून बसलेली असतात. एकूणात काय तर साध्या माणसांवरचे चित्रपट, कथा-कादंबऱ्या आपल्याला आवडतात. दीर्घकाळ त्या आपल्या मनात रुंजी घालत राहतात. एकांतात असताना त्यातले प्रसंग आठवले, की ओठांवर खुदकन हसू येतं. जगणं समृद्ध करणारा असा निर्भेळ आनंद हल्ली दुर्मीळ होत चाललाय ना!
या लेखाचा विषय आहे अमेरिकेच्याच नव्हे, तर जागतिक अभिजात वाङ्मयात मोलाचं स्थान मिळवलेली ‘लिटल विमेन’ ही कादंबरी. तशी ही लुईसा मे अल्कॉट या लेखिकेच्या आयुष्याचीच कथा. म्हणून तर ती आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणून ओळखली जाते. त्यांनी स्वतःच्याच कुटुंबाची, आपल्या आर्थिक ओढगस्तीची गोष्ट इथं सांगितली आहे. तर ही कहाणी चौघींची, म्हणजे चौघा बहिणींची. तीही अमेरिकेतील आणि एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील.
वर्ष असेल १८६० च्या पुढंमागं. मॅसेच्युटेस प्रांतातील कॉन्कार्डजवळील एका खेड्यात ती घडते. आता कॉन्कार्ड म्हटलं की आपल्याला तिथल्या ‘वॉल्डन’ तळ्याकाठी राहणारा निसर्गवेत्ता हेन्री डेव्हिड थोरा आठवतो. त्याचा काळ ही गोष्ट घडण्याच्या थोडा आधीचा. अमेरिकेतील यादवी युद्ध बहरात आलेलं. या मुलींचे वडील युद्धात लढायला गेलेले. घरी दारिद्र्य, पण आई खंबीर. मुलींचं बालपण कोमेजून जाऊ नये म्हणून धडपडणारी.
मायेबरोबरच त्यांच्यावर संस्कारांची पखरण करणारी. जगताना पदोपदी येणाऱ्या आव्हानांची या चिमुरड्यांना जाणीव करून देणारी, पण त्याचबरोबर आपण त्यांच्या स्वातंत्र्यातील अडसर बनणार नाही याचीही काळजी घेणारी.
साऱ्या मुली तशा गोड आणि देखण्या. प्रत्येकीचे स्वभाव मात्र वेगवेगळे. त्यांच्यात भांडणं होतात, हेवेदावे असतात. पण त्यांना सतत एकमेकींशी जोडून ठेवतं ते निर्व्याज प्रेम. वडील दूर असल्याने त्या अधिकच हळव्या झालेल्या. अधेमधे त्यांचा आठव या कोवळ्या जिवांना भावविभोर करीत राहतो. थोरल्या १६ वर्षांच्या मेगचा स्वभाव आईसारखाच आक्रमक. दुसरी ज्यो, १५ वर्षांची. तिला मुलांसारखं राहायला आवडायचं. लेखिका म्हणूनही ती आपलं कलम आजमावत असते.
लुईसा मे अल्कॉट यांनी स्वतःवरच बेतलेलं हे पात्र. तिच्या पाठीवरची बेथ दुबळी, अशक्त सतत आजारी असणारी. वय वर्ष १३. थोडी देवभोळी. या घराण्यातलं शेंडेफळ म्हणजे ॲमी, १२ वर्षांची. या मार्च कुटुंबातील आईचं नाव आहे मार्मी. मेग आणि ज्यो कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करीत असतात. मेग मुलांना शिकवत असते, तर ज्यो मार्च आन्ट या श्रीमंत वृद्धेची मदतनीस म्हणून काम करीत असते.
या मुलींच्या लहानपणापासून ते मोठेपणी संसार थाटेपर्यंतचा प्रवास या दीर्घ कादंबरीत येतो आणि तो मनोहारी आहे. तत्कालिन समाजरचना, निसर्ग सारं काही आपल्याला भावेल असंच. कितीही कठीण काळ आला तर न डगमगता, तत्त्वांशी, प्रामाणिकपणाशी तडजोड न करता जगण्यासाठी धडपडणाऱ्या या भगिनींचा प्रवास आजच्या युवा पिढीसाठीही मार्गदर्शक ठरावा. त्यांची स्वप्नं, समाजाप्रतीची कृतज्ञता या पिढीनं समजावून घेणं गरजेच आहे.मार्च भगिनींच्या स्वभावाविषयीचा हा परिच्छेद या पुस्तकात अशी किती सौंदर्यस्थळं असतील याची प्रचिती आणून देतो...
वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर दिवस मोठे झाले आणि मग दुपारचा लांब कंटाळवाणा वेळ घालविण्यासाठी निरनिराळे उद्योग आणि करमणुकीचे वेगवेगळे प्रकार शोधून काढण्याची आवश्यकता भासू लागली. या ऋतूत मोठे काम म्हणजे बागेची मशागत करणे. मार्च कुटुंबाच्या घरासमोर मोठी बाग होती; आणि तिचा एकेक तुकडा एकेका बहिणीला वाटून देण्यात आला होता. तेथे प्रत्येक जण आपापल्या आवडीची फुलझाडे लावीत असे. त्या चौघी बहिणींचे स्वभाव जितके भिन्न होते तितक्याच त्यांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या होत्या.
त्या आवडीचे प्रतिबिंब प्रत्येकीच्या फुलझाडांच्या निवडीत अचूक पडलेले दिसे. मेगच्या बागेत गुलाब, मर्टल, हेलिऑट्रॉप अशी जुनी पारंपरिक पद्धतीची फुलझाडे लावलेली असत. ज्योची बाग प्रत्येक वर्षी नवे रूप धारण करी. कारण ती तेथे सतत काही ना काही प्रयोग करीत असे. या वर्षी तिने नुसती सूर्यफुलेच बागेत लावली होती. कारण कोंबड्यांना त्यांचे बी फार आवडते असे तिला कोणीतरी सांगितले होते. बेथला मंद रंगाच्या सुवासिक फुलांची विशेष आवड होती. त्याचप्रमाणे पाखरांना आवडणारा चिमणचाराही तिने तेथे आवर्जून लावला होता.
ॲमीची बाग सर्वांत सुंदर दिसे. तिने तेथे एक सुरेख मांडव केला होता आणि फुलांनी बहरलेल्या वेली त्यावर चढवल्या होत्या. तिला भडक झळझळीत रंगांची फुले फार आवडत, म्हणून ती तिने मोठ्या आवडीने लावली होती. शिवाय उंच शुभ्र तुरेदार गुलछडी, नाजूक फर्न आणि इतरही अनेक सुंदर झाडे तिच्या बागेत होती. त्या बहिणींचा दुपारचा बराच वेळ बागेत जाई. त्याशिवाय भोवतालच्या माळावरून हिंडणे, फुले गोळा करणे, नदीवरून, होडीतून फेरफटका मारणे हेही उद्योग चालू होतेच. पुढे पावसाळा सुरू झाला तेव्हा त्यांचे बाहेरचे भटकणे बंद पडले आणि मग घरात किंवा निवाऱ्याच्या जागी खेळता येतील असे खेळ सुरू झाले.
मार्च भगिनींच्या आयुष्यात अनेक चढउतार येतात. तरीही त्या दारिद्र्यावर मात करून स्वाभिमानानं आपला जीवनमार्ग आणि जीवनसाथी शोधून काढतात. अर्थात ते करत असतानाही पैसा त्यांच्या लेखी दुय्यमच असतो. जगण्याचा आनंद, दुसऱ्याचं दुःख हलकं करण्याचं कार्य त्यांच्या दृष्टीनं मोलाचं. लिखाणाची आवड असलेली ज्यो आपल्या जर्मन गुरुच्या प्रेमात पडते. त्याचं लेखिकेनं सुरेख वर्णन केलं आहे. त्यातूनही या भगिनींची जीवनदृष्टी समजून यावी...
या वेळी आणखीही एक वेगळी घटना ज्योच्या जीवनात घडत होती. एकीकडे आपल्या कल्पनाविश्वातल्या नायकनायिकांचे स्वभावचित्रण करीत असताना दुसरीकडे ज्यो स्वत: वास्तव विश्वातल्या एका व्यक्तिरेखेकडे आकृष्ट होऊ लागली होती. प्रोफेसर भाअरनी एकदा तिच्याशी चर्चा करता करता तिला म्हटले होते, “साध्या पण सत्यनिष्ठ, सुंदर आणि समर्थ अशा व्यक्तिरेखांचा तुम्ही अभ्यास करायला हवा.
” ज्योने त्यांचा हा उपदेश ध्यानात ठेवला आणि त्याप्रमाणे खुद्द प्रोफेसर भाअर यांच्याच व्यक्तित्वाचा ती अभ्यास करू लागली. हा अभ्यास तिला जितका रंजक तितकाच उद्बोधक वाटू लागला. प्रोफेसर भाअर साऱ्यांना इतके का आवडतात, हे प्रारंभी ज्योला एक मोठे कोडे होते. कारण त्यांच्याजवळ पैसा नव्हता. प्रतिष्ठा नव्हती. आकर्षक व्यक्तिमत्त्वही नव्हते आणि तरीही त्यांच्यामध्ये असे काहीतरी होते, की ज्यामुळे माणसे आपोआप त्यांच्याकडे ओढली जात.
हिवाळ्याच्या दिवसांत उबदार शेकोटीचे वाटावे, तसे लोकांना त्यांचे आकर्षण वाटे. पैशाने गरीब असूनही नेहमी ते कोणाला ना कोणाला, काही ना काही मदत करीत असत. ते परदेशातले होते आणि तरीही साऱ्यांना ते आपले वाटत. प्रौढ वय झाले असूनही त्यांचे मन लहान मुलाप्रमाणे ताजे, टवटवीत होते. रूपाचा देखणेपणा त्यांच्यापाशी नव्हता.
तरीही त्यांच्या व्यक्तित्वाचा गोडवा प्रत्येकाला जाणवत असे आणि त्यांचा स्वभाव इतका सरळ व प्रेमळ होता, की त्यामुळे त्यांच्या विक्षिप्तपणासाठी लोक त्यांना आनंदाने क्षमा करीत. प्रोफेसर भाअरच्या लोकप्रियतेचे रहस्य काय आहे, याचा ज्योने स्वत:शी असा बराच विचार केला आणि सरतेशेवटी तिने असा निष्कर्ष काढला, की त्यांचे अत्यंत निष्कपट, उदार, स्नेहशील व्यक्तिमत्त्व हेच त्यांचे प्रमुख आकर्षण होते.
त्यांना त्यांची वैयक्तिक दु:खे नव्हती असे नाही. पण ती दुःखे ते नेहमी स्वत:जवळ ठेवीत आणि आपल्या स्वभावाची प्रसन्न बाजूच ते जगाला दाखवीत. एकूण काय, की भोवतालच्या माणसांविषयीचा प्रांजल बंधुभाव आणि मनाचा उदारपणा हेच प्रोफेसर भाअर यांच्या व्यक्तित्वातील गोडव्याचे रहस्य होते. त्यामुळे एका सामान्य, दरिद्री आणि प्रौढवयस्क जर्मन शिक्षकालाही असामान्य लोकप्रियता लाभू शकली होती!
‘लिटल विमेन’च्या निर्मितीची कहाणीही रंजक आहे. लुईसा मे अल्कॉट यांचं कथा लेखनाला अधिक प्राधान्य होतं. पण त्यांचा प्रकाशक थॉमस नाईल्स यांनी मात्र अल्कॉट भगिनींवर कादंबरी लिहावी असं सूचवलं आणि तसा आग्रह धरला. लुईसा यांनी पैशांची गरज असल्यानं नाईलाजानं या लिखाणाला सुरवात केली. त्यांनी पहिली १२ प्रकरणं लिहून प्रकाशकांकडं पाठवली. ती फारशी समाधानकारक नसल्याची प्रकाशकांची पहिली प्रतिक्रिया तिला धक्का देणारी ठरली.
नाईल्स यांनी आपल्या छोट्या पुतणीला ही प्रकरणं वाचायला दिली. तिला ती प्रचंड आवडली. नंतर लिहून पूर्ण झालेली ही कादंबरी अनेक किशोरवयीन मुलींना वाचण्यासाठी दिली गेली. साऱ्या मुलींनी हे पुस्तक सुरेख असल्याची ग्वाही दिली. त्यांच्या शिफारशींच्या बळावर १८६८ मध्ये कादंबरी प्रसिद्ध करण्यात आली. अल्पावधीतच ती लोकप्रिय ठरली. पहिली आवृत्ती हातोहात खपली. या भगिनींच्या पुढच्या जीवनाविषयी लिहावं असा आग्रह वाचकांकडून सुरू झाला.
त्यामुळं लुईसा यांनी या कादंबरीचा दुसरा भाग लगोलग लिहून पूर्ण केला, तो ‘गुड वाइव्हज’ या नावानं प्रसिद्ध झाला. पुढं हे दोन्ही भाग एकत्रितरीत्या ‘लिटल विमेन’ या नावानंच प्रसिध्द केले गेले. अमेरिकन वाचकांनी हे पुस्तक अक्षरशः डोक्यावर घेतलं. समीक्षकांनीही त्याचं कौतुक केलं. किशोरवयीन मुलींविषयीच्या लिखाणाचा नवाच प्रकार लुईसा यांनी रुढ केल्याचे त्यांनी नमूद केलं. अमेरिकेबाहेरही या पुस्तकाला अमाप प्रसिद्धी मिळाली. अनेक भाषांमध्ये ते भाषांतरीत झालं. या पुस्तकानं लुईसा यांना गरीबीतून बाहेरच काढलं नाही तर श्रीमंतीच्या वाटेवर नेलं.
आपलं भाग्य असं की सिध्दहस्त लेखिका, कवयित्री शांता शेळके यांनी तब्बल पावणेसहाशे पानांची ही कादंबरी ताकदीनं मराठीत भाषांतरीत केली आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसनं ती प्रकाशित केली आहे. तिचं सतरावं पुनर्मुद्रण सध्या बाजारात उपलब्ध आहे. यावरुन मराठी वाचकांच्या प्रतिसादाची कल्पना यावी. मराठीतील पहिल्या १० अस्सल अनुवादांत या पुस्तकाचा समावेश करावा लागेल. ‘वॉल्डन’, ‘पाडस’ सारखाच वाचनाचा अमर्याद आनंद देणारं हे पुस्तक आपल्या संग्रही हवंच.
मराठी भाषेचं वैभव शांताबाईंनी इथं भरभरून लुटलं आहे. त्यांच्या रसाळ शब्दकळेनं या लिखाणाचं वाचनमूल्य वृद्धिंगत झालं आहे. मराठीचं कौतुक आणि अभिमान वाटावा असंच हे संचित. ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’, ‘तोच चंद्रमा नभात’, ‘ही वाट दूर जाते’, ‘ऋतू हिरवा ऋतू बरवा’ यांसारख्या सतत गुणगुणण्याच्या मोहात पाडणारी अनमोल गीतं देणाऱ्या शांताबाईंकडून हा अनुवाद अस्सल ना वठता तरच नवल!
पाश्चात्त्य जगतात या कथानकावर अनेक नाट्य रूपांतरं आली. चित्रपट तर तब्बल सात झाले. अलीकडं म्हणजे २०१९ मध्ये आलेला ‘लिटल विमेन’ याच नावाचा चित्रपट सगळ्यात उजवा मानावा लागेल. त्यानं एक आॅस्कर पटकावलं. मार्च भगिनींचे विलोभनीय विभ्रम आणि हृद्य नातं अनुभवायचं असेल तर हा चित्रपट आवर्जून पाहावा. त्यात ‘हॅरी पॉटर’मधील एमा वॉटसननंही एका बहिणीच्या भूमिकेत रंग भरला आहे.
प्रख्यात अभिनेत्री मेरील स्ट्रीप छोट्याशा भूमिकेत भाव खाऊन गेली आहे. मुलींच्या आईची भूमिका केली आहे लॉरा डर्न यांनी. उत्साहानं सळसळणाऱ्या ज्योची भूमिका आयरिश रक्ताची अमेरिकन अभिनेत्री सार्स रोनान हिनं छान वठवली आहे. या छोकऱ्यांचा हवाहवासा वाटणारा चिवचिवाट चित्रपटभर आपलं मनोरंजन करतो. आपल्या बहिणींची आठवण करून देतो. ‘नेटफ्लिक्स’वर हा चित्रपट अगदी हिंदीतही पाहता येईल.
आयुष्यातला गोडवा टिकवायचा असेल तर अशा सुखांत कहाण्या वाचायला हव्यात. साध्या साध्या लोकांच्या कहाण्या सांगणारे हिंसाचार विरहित चित्रपट पाहिले पाहिजेत. या कहाण्या, हे चित्रपट आपल्या आयुष्यात काठोकाठ आनंद भरून देतात. वाघ मागं लागल्यासारखे धावणारे आणि मायावी दुनियेलाच खरं मानून चालणारे आपण कधी तरी मोडून पडू तेव्हा बँकेत बॅलन्स असेल कदाचित, पण हातात अर्थपूर्ण असं काहीच उरणार नाही.
असाच काळ पुढे सरकत राहिला तर नाती तोंडी लावण्यापुरतीच उरतील की काय, अशी भीती वाटण्यासारखी सध्याची स्थिती. घडीभर थांबून मागं वळून पाहण्याइतकीही उसंत आपल्याला राहिलेली नाही. मराठी चित्रपटातील हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच...
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर...
लोकहो, थोडं थांबा. गती मंद करा, मती जागृत करा. भवतालातली माणसं कितीही त्रासदायक असली तरी क्षमाशील राहा! त्यांच्या वर्तनातला करकरीतपणा तुमच्याच प्रतिबिंबित होऊ देवू नका. मधमाशीसारखं नात्यातला गोडवा टिपण्याचा प्रयत्न करा. आपल्या माणसांवर प्रेम कराल; तसं ते इतरांवरही करा, हाच या चौघा बहिणींचा सांगावा आहे.
कोणी तरी म्हटलं आहे, ‘प्रेम करण्यासाठीही हे आयुष्य पुरेसं नाही, मग नफरत करायला तुम्हाला फुरसत मिळते तरी कशी?’ ‘हे विश्वची माझं घर’ असं म्हणणाऱ्या प्रेमस्वरूप, भक्तिस्वरूप ज्ञानोबारायांचे आपण वंशज. त्यांना शोभेल असं थोडं तरी वागूयात!
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.