Sugarcane Production : यंदा अतिरिक्त ऊस समस्या कशी टाळणार?

ऊस लागवडीला १२ महिने झाले असता, उसाचे गाळप व्हावे ही शेतकऱ्यांची इच्छा असते. शेतात तोडायला आलेला ऊस जर उभा असेल, तर खांद्यावर ओझे असल्याचा भास शेतकऱ्यांना वाटतो.
 Sugarcane Production
Sugarcane ProductionAgrowon

ऊस लागवडीला (Sugarcane Cultivation) १२ महिने झाले असता, उसाचे गाळप (Sugarcane Crushing) व्हावे ही शेतकऱ्यांची इच्छा असते. शेतात तोडायला आलेला ऊस जर उभा असेल, तर खांद्यावर ओझे असल्याचा भास शेतकऱ्यांना वाटतो. ऊस कारखान्यावर कसा घालवायचा हा प्रश्‍न सतावत राहतो.

 Sugarcane Production
Vegetable Farming : वेलवर्गीय भाज्यांना दिली ऊस, मोगऱ्याने साथ

विजयादशमीनंतरच्या पंधरवड्यात बहुतांश साखर कारखान्यांच्या बॉयलरचे अग्निप्रदीपन कार्यक्रम घेऊन उसाचा गळीत हंगाम सुरू करण्यात येतो. मात्र गेल्या वर्षीच्या हंगामात पारंपरिक दुष्काळी मराठवाड्यात आणि बागायती परिसर पश्‍चिम महाराष्ट्र असे दोन्ही परिसरात अतिरिक्त उसाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. वर्ष-दीड वर्ष शेतात मेहनत, आर्थिक गुंतवणूक करून पिकवलेल्या उसाला ऊसतोड मिळत नाही, म्हणून अहमदनगर आणि बीड या दोन जिल्ह्यांमध्ये एका-एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतर अतिरिक्त ऊस प्रश्‍नाचे गांभीर्य पुढे आले होते. गेल्या हंगामामध्ये ऊस लागवडीचे नियोजन, ऊसतोडणीचे व्यवस्थापन, साखर कारखान्यांचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद-समन्वयाचा अभाव, शेतकरी जागृती-सहभाग या सर्वच बाबतीतील उणिवा पुढे आल्या. दुसऱ्या बाजूने, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एकजुटीचा अभाव, साखर कारखाने उशिरा चालू करणे, हार्वेस्टर मशिन आणि मजुरांची संख्या कमी असणे, मजुरांचे दुसऱ्या राज्यातील स्थलांतर, शिवाय मजुरांच्या बाबतीत नियोजन आणि नियंत्रणाचा अभाव अशा अनेक उणिवा पुढे आल्या होत्या. त्यामुळे अतिरिक्त उसाचा पेचप्रसंग ओढवला होता. याचा ऊस उत्पादकांना मोठा फटका बसला. सर्वसाधारणपणे ऊस लागवडीला १२ महिने झाले असता, उसाचे गाळप व्हावे ही शेतकऱ्यांची इच्छा असते. शेतात तोडायला आलेला ऊस जर उभा असेल, तर खांद्यावर ओझे असल्याचा भास शेतकऱ्यांना वाटतो. ऊस कारखान्यावर कसा घालवायचा हा प्रश्‍न सतावत राहतो.

 Sugarcane Production
Sugarcane: कांडीकोळसा बनविण्यासाठी ऊस पाचटाचा वापर

ऊस लागवड क्षेत्रात वाढ
२०१६ ते २०१९ या काळात पर्जन्यमान कमी असल्याने अनेक शेतकऱ्यांकडून उसाची लागवड कमी झाली होती. पण २०२० ते २०२२ या तीन वर्षांत सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले. परिणामी, जमिनीवरील पाणीसाठे आणि भूजल पातळीतील पाणीसाठे वाढल्यामुळे शेतकऱ्यांनी हमखास भाव मिळत असलेल्या ऊस या पिकावर भरवसा टाकून लागवड केलेली दिसून येते. अर्थात, परंपरागत, तसेच नव्याने कोरडवाहू आणि दुष्काळी भागांतील अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली. या संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करताना असे दिसून आले, की गेल्या तीन वर्षांपासून पावसाचे प्रमाण वाढल्याने, पाणीसाठे ज्या शेतकऱ्यांकडे सुरक्षित आहेत, त्यांनी चार पैसे मिळतील, या आशेने ऊस पिकाची लागवड केली आहे. गेल्या हंगामात अतिरिक्त उसाचा प्रश्‍न निर्माण झाल्याचा अनुभव पाठीशी असतानाही ऊस लागवड क्षेत्र वाढत आहे. हे या वर्षाचे विशेष आहे. यावरून ऊस पिकावर शेतकऱ्यांचा किती भरवसा आहे, हे लक्षात येते.

 Sugarcane Production
Lumpy Vaccination : ऊस वाहतुकीत बैलांचे लसीकरण बंधनकारक

ऊस लागवडीची नोंद आवश्यक
उसाची लागवड केली असता, जवळच्या साखर कारखान्याला त्याची नोंद करणे गरजेचे आहे. जेणेकरून उसाची वाढ पूर्ण झाल्यानंतर कारखाने ऊसतोडणी करून घेऊन जातील. त्यात ऊस उत्पादक शेतकरी ज्या साखर कारखान्याचे सभासद आहेत, त्या शेतकऱ्यांचा ऊस संबंधित कारखान्यांनी घेऊन जाण्याची जबाबदारी आहे. मात्र बिगर सभासद असलेल्या शेतकऱ्यांनी किती क्षेत्रावर ऊस लागवड केली आहे, याची नोंद कारखान्याच्या
प्रशासनाकडे करावी लागते. बिगर सभासद असलेल्या शेतकऱ्यांचा ऊस तोडून नेण्याची जबाबदारी कारखान्यांवर राहत नाही. मात्र कारखान्याला उसाची गरज असेल, तरच बिगर सभासदांचा ऊस घेऊन जातात. त्यासाठीही कारखाना प्रशासनाकडे उसाची नोंद करावी लागते. नव्याने ऊस लागवड करणारे शेतकरी आणि जास्तीचा ऊस लागवड करणारे शेतकरी अनेक कारणांनी ही नोंद करत नाहीत. त्यामुळे ऐनवेळी (हंगामाच्या शेवटी) कारखाना प्रशासन या उसाची दखल घेत नाहीत. या शेतकऱ्यांची शेवटच्या टप्प्यात कोंडी होऊन धावपळ होते.

ऊसतोडणी यंत्रणा हवी तटस्थ
कितीही नाही म्हटले तरी ऊस गाळपाचे राजकारण कारखाना प्रशासनाकडून (कारखानदारांकडून) झाल्याशिवाय राहत नाही. जवळच्या शेतकरी, राजकीय नेतृत्वाचे कार्यकर्ते, मतदार संघातील शेतकरी, संचालक मंडळाच्या जवळचे शेतकरी या सर्वांच्या ऊस लागवडीस वेळेवर तोड मिळते. परंतु सर्वसामान्य उत्पादकांना ऊसतोडणीसाठी वाट पहावीच लागतेच. दुसरे, साखर कारखाना उभारणीसाठी १५ किमी वरून २५ किलोमीटर हवाई अंतराची अट टाकण्यात आली आहे. यामुळे साखर सम्राट राजकारणी नेतृत्वाचे प्रभावक्षेत्र निर्माण झाले आहेत. तो प्रभाव कमी होऊ नये, यासाठी कारखानदार (राजकीय नेतृत्व) नवीन कारखाना उभारणीस परवानगी देत नाहीत. शिवाय उसापासून उपपदार्थ-प्रकिया उद्योग चालू करत नाहीत. यामुळे ऊस तोडून घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना कारखाना प्रशासन, कारखानदार आणि संचालक मंडळाच्या मागे लागावे लागते. त्यामुळे एका साखर कारखान्याच्या २५ किमी चहूबाजूंनी साखर सम्राटांची उसावर मक्तेदार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मानसिकता कारखानदारांच्या विरोधात संघटित होण्याऐवजी ऊसतोडणी लवकर व्हावी अशी तयार होताना दिसून येते. यामागे साखर कारखान्याने ऊस तोडून नेला नाही, तर ऊस कोठे घालायचा ही भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये असते. त्यामुळे ऊसतोडणी यंत्रणेत तटस्थपणा आणून मक्तेदारीची भूमिका टाळणे आवश्यक आहे.

पारदर्शकता महत्त्वाची
अनेक कारखाने गळीत हंगाम नियोजन आणि व्यवहार यामध्ये पारदर्शकता पाळत नसल्याचे दिसून येते. ही पारदर्शकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील वापर होणे आवश्यक आहे. उदा. अलीकडे अनेक छोट्या-मोठ्या उद्योग, व्यवसाय आणि सेवा क्षेत्रात वेबसाइट आणि मोबाईल अॅपचा वापर वाढवून व्यवसाय, सेवा, व्यवहार यामध्ये पारदर्शकता आणली जात आहे. त्याप्रमाणे साखर कारखाने सहकारी असो किंवा खाजगी असो, त्यांनी वेबसाइट आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून कारखान्यांचे हंगाम, व्यवहार, समन्वय आणि व्यवस्थापन या सर्वांमध्ये पारदर्शकता आणायला हवी. उदा. हंगामातील एकूण साखर उत्पादन, दैनंदिन साखर उत्पादन, कारखाना हद्दीतील पूर्ण ऊस लागवड क्षेत्र, प्रत्येक दिवशी किती क्षेत्रावरील ऊसतोडणी होत आहे, गळीत हंगाम कधी संपेल, असा पूर्ण ताळेबंद कारखान्याशी संबंधित उत्पादक शेतकरी (सभासद आणि बिगर सभासद), कर्मचारी आणि संचालक-व्यवस्थापकीय मंडळ यांना माहिती असायला हवा. एवढेच नाही तर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नोंदी. ऊस लागवडीच्या तारखांच्या नोंदी, संभाव्य तोड कधी येऊ शकते हा क्रम हे शेतकऱ्यांना कळायला हवा. जेणेकरून शेतकऱ्यांना माहितीवर विश्वास ठेवून अवलंबून राहता येईल. दुसरे, तंत्रज्ञानाचा वापर केवळ कार्यालयीन नोंदी आणि रेकॉर्ड तयार करण्यापुरता मर्यादित न राहता सर्व संबंधित घटकांच्या व्यवहारात पारदर्शकता निर्माण होईल असा हवा. त्यामुळे कारखाना प्रशासन, व्यवस्थापन, संचालक मंडळ, ऊस उत्पादक आणि ऊसतोडणी मजूर यांच्यात परस्पर विश्‍वासार्हता निर्माण होईल. साखर कारखाना आपल्या हक्काचा आहे, आपला आहे ही भावना निर्माण होईल, परिणामी पूर्ण गळीत हंगामात परस्पर घटकांमध्ये सहकार्य आणि समन्वय राहून संभाव्य निर्माण होणारे पेचप्रसंग टाळता येतील.

(लेखक हे शेती, पाणी प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com