Indian Economy Rank: पोकळ अभिमान

Fourth Largest Economy: भारतीय अर्थव्यवस्थेने देदीप्यमान कामगिरी केल्यामुळे नव्हे, तर जपानची मोठी घसरगुंडी झाल्यामुळे आपण चौथा क्रमांक पटकावला आहे.
India Economy
India EconomyAgrowon
Published on
Updated on

GDP Ranking: भारतीय अर्थव्यवस्थेने जपानला मागे टाकत जगात चौथ्या स्थानावर झेप घेतली, अशी घोषणा निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच्या पुढे आता जर्मनी, चीन आणि अमेरिका हे देश आहेत. त्यामुळे स्वर्ग दोन बोटे उरलेल्या सत्ताधाऱ्यांच्या गोटातून आता प्रचारकी ढोल बडविण्यास सुरुवात झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळातील धडाकेबाज आर्थिक निर्णयाचे हे फलित असल्याचा डांगोरा पिटला जात आहे. वस्तुस्थिती तर अशी आहे, की मोदी सरकारच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा खिळखिळा झालेला आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंक आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थांनी भारताच्या जीडीपी वाढीचे अनुमान घटवलेले आहे. आर्थिक वाढीचा दर उतरणीला लागलेला आहे.

बाजारपेठेतली मागणी घटत आहे. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनी गुंतवणुकीत हात आखडता घेतला आहे. निर्मिती, सेवा, शेती या तिन्ही क्षेत्रांत कामगिरी असमाधानकारक आहे. गुंतवणूक, निर्यातीत पिछाडी आहे. भारताची लोकसंख्या जगात सर्वाधिक असल्यामुळे वस्तू, सेवांचा उपभोग या आघाडीवर आपल्याला जास्त संधी असल्याचे मानले जाते.

India Economy
Maharashtra Economy: आकाशी झेप घे रे...

परंतु लोकांच्या उत्पन्नात होत असलेली घट आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जात झालेली मोठी वाढ यामुळे या बाबतीतही स्थिती चिंताजनक आहे. बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. स्थायी, स्थिर रोजगार उपलब्धतेचे प्रमाण कमालीचे रोडावले आहे. थोडक्यात भारताची अर्थप्रकृती नाजूक आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेने देदीप्यमान कामगिरी केल्यामुळे नव्हे तर जपानची मोठी घसरगुंडी झाल्यामुळे आपण पाचव्यावरून चौथ्या क्रमांकावर गेलो, हे समजून घेतले पाहिजे. जपानची अर्थव्यवस्था सध्या प्रचंड संकटात आहे. जपानची अर्थव्यवस्था ६ ट्रिलियन डॉलर्सवरून ४ ट्रिलियन डॉलर्सवर लुडकली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत अमेरिका आणि चीन हेच खऱ्या अर्थाने बलाढ्य देश आहेत.

India Economy
Indian Economy : भारत तिसऱ्या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेच्या वाटेवर

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा आकार जवळपास ३० ट्रिलियन डॉलर्स आणि चीनचा जवळपास १९ ट्रिलियन डॉलर्स आहे. पहिल्या दहामधील उरलेले आठ देश पाच ट्रिलियन डॉलर्सच्या आतच आहेत. या आठ देशांच्या एकत्रित अर्थव्यवस्थेपेक्षाही अमेरिकेचे आकारमान जास्त आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताने ४ ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा ओलांडत जगात चौथा क्रमांक पटकावल्यामुळे हुरळून जाणे हास्यास्पद आहे.

दरडोई उत्पन्न ही खरी ग्यानबाची मेख आहे. जगातील एकूण १९७ देशांमध्ये आपण दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत १४१ व्या स्थानावर आहोत. अनेक गरीब देश आपल्या पुढे आहेत. इंग्लंड, जपान यांना मागे टाकून आपण चौथा क्रमांक पटकावल्याची फुशारकी मारतो तेव्हा या देशांचे दरडोई उत्पन्न, जीवनमान, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्यविषयक सेवा, सामाजिक सुरक्षा याच्याशी आपली तुलना केली पाहिजे.

आजही आपल्याला देशातील ८० कोटी लोकांना फुकट धान्य द्यावे लागते. तसेच आपल्याकडे पराकोटीची आर्थिक विषमता आहे. देशातील केवळ एक टक्का लोकांकडे एकूण ४० टक्के संपत्ती तर तळातील ५० टक्के लोकसंख्येकडे केवळ तीन टक्के संपत्ती एकवटल्याचे ‘ऑक्सफॅम’चा अहवाल सांगतो.

रोजगारासाठी सर्वाधिक लोकसंख्या अवलंबून असलेल्या शेती क्षेत्राची सरकारच्या धोरणांमुळे वाईट अवस्था झालेली आहे. ही स्थिती बदलायची असेल तर अर्थव्यवस्थेत संरचनात्मक सुधारणा घडवून आणण्याचे शिवधनुष्य पेलावे लागेल. ते करण्याची तयारी नसली, की चौथ्या क्रमांकाचे अप्रूप मिरवण्याशिवाय पर्याय राहत नाही. दिल बहेलाने के लिये गालिब खयाल अच्छा है...!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com