
Agriculture Success: शेतीसमोरील आज सर्वांत मोठी समस्या म्हणजे जवळपास सर्वच पिकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. पिकांची उत्पादकता पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पादन घटत आहे. बहुतांश शेतीमालास बाजारात चांगला भाव मिळताना दिसत नाही. परिणामी, शेती व्यवसाय आतबट्ट्याचा ठरत आहे. दुसरीकडे आरोग्याबाबत सजग ग्राहकांकडून रसायन अवशेषमुक्त शेतीमालाची मागणी वाढत आहे. अशा शेतीमालास दोन पैसे अधिक मोजण्याची त्यांची तयारी आहे. अनेक जण सेंद्रिय शेतीमालाची देखील मागणी करीत आहेत.
परंतु बदलत्या हवामान काळात पिकांवर रोग-किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. शिवाय शेणखत वापर कमी झाल्याने जमिनीचा पोत खालावला आहे. अशा परिस्थितीत रासायनिक खते, कीडनाशके न वापरता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेतीमाल उत्पादन घेणे जिकिरीचे ठरते. अशा वेळी रसायन अवशेषमुक्त शेतीमाल हा शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांसाठी एक चांगला पर्याय आहे. कांदा पिकांचे रसायन अवशेषमुक्त उत्पादन घेऊन नाशिक जिल्ह्यातील मधुकर मोरे या प्रगतिशील शेतकऱ्याने राज्यातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
रसायन अवशेषमुक्त कांदा उत्पादनामुळे मोरे यांच्या खर्चात बचत झाली. त्यांच्या जमिनीचे आरोग्य सुधारले. कांद्याची गुणवत्ता सुधारली. काढणीपश्चात तपासणीत त्यांचा कांदा ‘रेसिड्यू फ्री’ असल्याचे देखील सिद्ध झाल्यामुळे त्यास दरही चांगला मिळणार आहे. खर्चात बचत, बऱ्यापैकी उत्पादन, शेतीमालाच्या दर्जा आणि जमिनीच्या पोतातही सुधारणा अशा अनेक अंगानी फायदेशीर प्रयोगाचा अवलंब राज्यातील शेतकऱ्यांनी इतर पिकांतही करायला हवा.
रासायनिक निविष्ठांचा मर्यादित वापर करीत असताना जैविक निविष्ठा वापरांवर भर एवढे साधे सूत्र मोरे यांनी अवशेषमुक्त कांदा उत्पादनासाठी वापरले आहे. आज आपण पाहतोय बहुतांश शेतकऱ्यांचा भर हा रासायनिक खते आणि कीडनाशकांवर आहे आणि इथेच शेतीचे गणित बिघडत आहे. अशा वेळी नैसर्गिक, सेंद्रीय शेतीऐवजी व्यवहार्य अशा अवशेषमुक्त शेतीचा प्रसार-प्रचार कृषी विद्यापीठांसह केंद्र-राज्य सरकारने करायला हवा.
एकात्मिक अन्नद्रव्य आणि कीड-रोग व्यवस्थापनाचा मूलमंत्र कृषी विद्यापीठांनी फार पूर्वीपासून आपल्याला दिला आहे. या पद्धती अवशेषमुक्त शेतीकडे शेतकऱ्यांना घेऊन जातात. परंतु या मूलमंत्राचा अवलंब राज्यातील किती शेतकरी करतात, हा संशोधनाचा विषय ठरेल. या व्यवस्थापन पद्धतीत रासायनिक खते आणि कीडनाशके हा शेवटचा पर्याय म्हणून आणि गरज पडली तरच वापराची शिफारस आहे.
कोणत्याही पिकांचे उत्पादन घेताना शेतकऱ्यांनी आधी माती परीक्षण करून घ्यावे. आणि त्या आधारेच केवळ रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय, जैविक आणि शेवटी कमीत कमी प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करायला हवा. कीड-रोग व्यवस्थापनाच्या बाबतीतही एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन पद्धती अर्थात मशागतीय, यांत्रिक, जैविक आणि शेवटी रासायनिक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे.
रासायनिक नियंत्रण पद्धतीतही आधी वनस्पतिजन्य, जैविक कीडनाशके वापरायला हवीत, त्यातही रोग-कीड आटोक्यात आली नाही तर रासायनिक कीडनाशकांचा प्रमाणबद्ध वापर करायला हवा. अशा प्रकारच्या शेती पद्धतीने पिकांचा उत्पादन खर्च कमी होईल, बऱ्यापैकी उत्पादन मिळेल, उत्पादन हे रसायन अवशेषमुक्त असेल, त्यास चांगला भाव मिळेल. अशा प्रकारची रसायन अवशेषमुक्त शेतीमाल उत्पादनाची पद्धती ही शेतकऱ्यांच्या आर्थिक आरोग्याबरोबर मानवी आरोग्यास चांगली आणि पर्यावरण अनुकूल देखील आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.