
Nashik News: वाढता उत्पादन खर्च, घटलेली उत्पादकता व गुणवत्तेअभावी कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यावर मात करत मोरेनगर (ता. सटाणा) येथील प्रयोगशील शेतकरी मधुकर दादाजी मोरे यांनी रासायनिक निविष्ठांचा मर्यादित वापर आणि जैविक निविष्ठा अधिकाधिक वापरून यंदा कांदा उत्पादन घेतले. काढणीपश्चात प्रयोगशाळेत तपासणीनंतर ‘युरोपियन स्टॅंडर्ड’प्रमाणे कांदा उत्पादन ‘रेसिड्यू फ्री’ असल्याचे परिणाम आले आहेत. हा प्रयोग ३० एकर क्षेत्रावर यशस्वी ठरला आहे.
दादाजी मोरे हे जुन्या पिढीतील प्रयोगशील शेतकरी. त्यांचा वसा पुढे नेत मधुकर व किरण हे दोघे बंधू प्रयोगशीलतेने शेती करतात. रब्बी हंगामातील उन्हाळ कांदा हे त्यांचे प्रमुख पीक आहे. शेतीत सुधारित पद्धतींचा अवलंब व कृषी रसायन साक्षरतेतून त्यांनी बदल केले. दरवर्षी ३५ ते ४० एकरांवर कांदा घेतात. यंदा ३० एकरांवर कांदा लागवड पीक घेतले.
कांदा रोपेनिर्मितीपूर्वी बीजप्रक्रिया व रोपे पुनर्लागवड, कीड व रोग नियंत्रण या कामकाजात लागवड ते काढणीदरम्यान रासायनिक खतांचा वापर ३० टक्क्यांवर त्यांनी आणला. तर रासायनिक फवारण्या पूर्णतः टाळल्या. त्यानंतर ११० दिवसानंतर टप्प्याटप्प्याने कांदा काढणी झाली. त्यानंतर मे महिन्यात उत्पादनात रसायन अवशेष (बीएकक्यू) तपासणीसाठी कांद्याचे नमुने वाशी येथील शासनमान्य ‘एनबीएचसी’ प्रयोशाळेत पाठवण्यात आले होते. त्यामध्ये हा उत्पादित कांदा रेसिड्यू फ्री व युरोपियन मानकाप्रमाणे असल्याचे तपासणीअंती समोर आले आहे.
असे राहिले कामकाज
- रोपवाटिका निर्मितीत बीजप्रक्रियेसाठी मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, बीव्हीएमचा संयुक्त वापर.
- लागवडीपूर्व शेणखताचा वापर.
- लागवडीपश्चात लेबलक्लेम शिफारशीनुसार तणनाशकाचा नियंत्रित वापर.
- कांदा पोषणासाठी नत्र, स्फुरद व पालाशयुक्त जिवाणूंचा वापर.
- वाढीच्या अवस्थेत सल्फर जिवाणू, फुगवणीच्या काळामध्ये पोटॅशियम विरघळणाऱ्या जिवाणू वापर.
- रोगनियंत्रणासाठी वातावरण खराब असताना निरीक्षणे नोंदवून सुडोमोनास, बॅसिलस व ट्रायकोडर्मा या घटकांचा बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी जमिनीतून तसेच फवारणीतून वापर.
जमिनीचे आरोग्य सुधारले, खर्च झाला कमी
या पूर्वी रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर व रासायनिक फवारण्यामुळे जमीन कडक झाली होती; मात्र गेल्या ३ वर्षांत जैविक निविष्ठांचा वापर वाढल्याने जमीन भुसभुशीत झाली आहे. माती यापूर्वी चिकट झाल्याने पिकांची अपेक्षित वाढ होत नव्हती. जमिनीत सेंद्रिय कर्बही तुलनेत वाढला आहे. हुमणी अळीचे जमिनीत नुकसान कमी होऊन मातीतील बुरशीजन्य रोग व सूत्रकृमी प्रादुर्भाव कमी होण्यातही मोठी मदत झाल्याचे मोरे सांगतात. कांद्याचा रंग, आकार, टिकवणक्षमता यात मोठा फरक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.