उन्हाळ्यात गारवा देणारं काकडीचं पीक

काकडीचा गर थंड असतो आणि त्यामध्ये पाण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे काकडीला उन्हाळ्यामध्ये चांगली मागणी असते. परिमाणी दरही चांगला मिळतो.
Cucumber Cultivation
Cucumber Cultivation Agrowon
Published on
Updated on

महाराष्ट्रात काकडीचे पीक खरीप हंगामात आणि प्रामुख्याने उन्हाळ्यात घेतले जाते. काकडीचा गर थंड असतो आणि त्यामध्ये पाण्याचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे काकडीला उन्हाळ्यामध्ये (Cucumber Demand) चांगली मागणी असते. परिमाणी दरही चांगला मिळतो.

काकडी (Cucumber Cultivation) साधारणत: कच्ची खातात. याशिवाय कोशिंबीर करण्यासाठीही काकडीचा वापर केला जातो. तसेच घेरकीन (Gherkin) या प्रकारची काकडी लोणचे (Cucumber For Pickle) बनविण्यासाठी वापरली जाते. काकडीच्या फळात पोटॅशियम, सोडीयम, फॉस्फरस व इतर खनिजे पुरेशा प्रमाणात आढळतात.

Cucumber Cultivation
राज्यात काकडी ५०० ते ३००० रुपये

हवामान -

काकडी ही उष्ण हवामानात येणारी फळभाजी आहे. या पिकाच्या वाढीसाठी १८ अंश ते २५ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. उष्ण कोरडे हवामान या पिकासाठी पोषक ठरते. ११ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानात बियाण्याची उगवण क्षमता मंदावते.

Cucumber Cultivation
राज्यात काकडी ५०० ते २५०० रुपये

जमीन -

काकडीचे पीक मध्यम ते भारी जमिनीत घेतले जाते. हे पीक रेताड जमिनीतदेखील घेतात. मात्र, उत्पादनासाठी पोयटायुक्त व भरपूर सेंद्रीय खताचे प्रमाण असलेली व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. निवडलेल्या जमिनीचा सामू ५.५ ते ६.७ पर्यंत असावा. जमीन हराळी, लव्हाळा या सारख्या तणांपासून मुक्त असावी.

काकडीच्या सुधारित / संकरित जाती -

फुले प्राची -

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली आणि फक्त मादी फुले असलेली ही संकरीत जात आहे. या जातीचे हरीतगृह तसेच प्रचलित लागवड पद्धतीमध्ये चांगले सरासरी उत्पादन ३५९ क्विंटल प्रति हेक्टर मिळते. फळाचे सरासरी वजन १३५ ग्रॅम आणि लांबी १२ ते १८ सें.मी. असून रंग पिवळसर पांढरा असतो.

हिमांगी -

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील भाजीपाला सुधार प्रकल्पात विकसित केलेल्या या जातीची खरीप आणि उन्हाळी हंगामासाठी शिफारस करण्यात आली आहे. ही जात लवकर येणारी असून केवडा रोगाला प्रतिकार करणारी आहे. फळांचे वजन साधारणत: १५० ते २०० ग्रॅम असते. आकार दंडगोलाकार व रंग पांढरा असतो. फळे काढल्यानंतर पिवळी पडत नसल्याने बाजारात भावही चांगला मिळतो. या जातीपासून सरासरी १६० क्विंटल उत्पादन मिळते.

पूर्वमशागत आणि लागवडीची पद्धत -

जमिनीची चांगली नांगरट करावी. त्यानंतर जमीन तापू द्यावी. कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुसीत करावी. कुळवाच्या शेवटच्या पाळीपूर्वी २५ ते ३० टन शेणखत प्रति हेक्टर जमिनीत चांगले मिसळून द्यावे. त्यानंतर जमीन सपाट करावी. लागवडीसाठी सरीच्या मध्यभागी दोन वेलींतील अंतर ४५ ते ६० से.मी. प्रत्येक ठिकाणी ३ ते ४ ठेवून बिया टोकाव्यात. बियांमध्ये थोडेसे अंतर ठेवावे. लागवडीनंतर १५ दिवसांनी रोपांची विरळणी करून प्रत्येक ठिकाणी दोन जोमदार रोपे ठेवावीत. लागवडीसाठी सरासरी प्रति हेक्टर २ ते २.५ किलो बियाणे वापरावे. बियांची उगवण चांगली होण्यासाठी बिया २४ ते ४८ तास ओल्या फडक्यात किंवा गोणपाटात बांधून ठेवाव्या. लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम २० ग्रॅम प्रति १० लिटर या द्रावणात भिजवून लागवड करावी.

लागवड -

काकडीची उन्हाळी हंगामातील लागवड जानेवारी - फेब्रुवारी महिन्यात, तर पावसाळी लागवड जून- जुलै महिन्यात करतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com