
Onion Farming Trend: कांदा मार्केटमध्ये मागच्या आठवड्यात सरासरी दरात काहीशी नरमाई पाहायला मिळाली. रब्बीचा कांदा बाजारात दाखल झाल्याचा परिणाम दिसून आला. पुढील दोन ते तीन आठवडे बाजारात आता लेट खरीप आणि आगाप रब्बी कांद्याची आवक असेल. तसेच मार्च महिन्यात कांदा बाजारात मोठ्या घडामोडीही घडत असतात. कांद्याच्या बाजारभावाचा कल समजण्यासाठी पुढच्या महिनाभरात कांदा मार्केटमधील आवक, कांदा उत्पादनाचे अंदाज आणि त्याचा बाजारावरील संभाव्य परिणाम याचा आढावा घेणे गरजेचे आहे.
कांद्याची लागवड आणि उत्पादन यंदा राज्यातच नाही तर देशभरात वाढण्याचा अंदाज सर्वच पातळ्यांवरून व्यक्त केला जात आहे. पण दुसऱ्या बाजूला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका पिकाला बसला. त्यामुळे कांद्याच्या लागवडी काहीशा मागे-पुढे झाल्या आणि बाजारात त्यानुसार आवक होत राहिली.
पॅनिक सेलिंग नाही
बाजारात एरवी आवकेचा दबाव वाढल्याने होणारे पॅनिक सेलिंग यंदा अपवाद वगळता दिसले नाही. यामुळे बाजार तुलनेत बरा राहिल्याची परिस्थिती आहे. खरिपातील कांद्याला यंदा सरासरी चांगला दर मिळाल्याचे काही शेतकऱ्यांनीही सांगितले. नाशिक येथील कांदा व्यापारी आणि निर्यातदार मनोज जैन म्हणाले, की खरिपातील कांदा आणखी दोन ते तीन आठवडे बऱ्यापैकी बाजारात येईल. त्यानंतर बाजाराची भिस्त हळूहळू रब्बीच्या कांद्याकडे सरकत जाईल.
उत्पादनात वाढीचा अंदाज
केंद्र सरकारने नुकतेच देशातील २०२४-२५ च्या हंगामातील फळे आणि भाजीपाला उत्पादनाचा पहिला सुधारित अंदाज जाहीर केला. या अंदाजात देशपातळीवर कांदा लागवडीत १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे म्हटले आहे. गेल्या हंगामात देशात १५ लाख ४० हजार हेक्टरवर कांदा लागवड झाली होती, ती यंदा १७ लाख ७४ हजार हेक्टरवर पोहोचल्याचे अंदाजात म्हटले आहे. महाराष्ट्रातील कांदा लागवडही जवळपास २४ टक्क्यांनी वाढून सव्वाआठ लाख हेक्टरवर पोहोचल्याचा अंदाज आहे. हा एकूण वर्षातील लागवडीचा अंदाज आहे. यंदा महत्त्वाच्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये लागवडी वाढल्याचे केंद्राने म्हटले आहे.
देशातील कांदा उत्पादनातही वाढ होईल असा अंदाज केंद्राने व्यक्त केला आहे. देशातील कांदा उत्पादन मागील वर्षी घटले होते. पण यंदा कांदा उत्पादन जवळपास १९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज केंद्राने व्यक्त केला आहे. मागच्या वर्षी २४३ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. ते यंदा २८९ लाख टनांवर पोहचण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थान या महत्त्वाच्या राज्यांमध्ये उत्पादन वाढण्याचा अंदाज केंद्राने व्यक्त केला. इतरही काही राज्यांमध्ये यंदा लागवड आणि उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. कारण गेले वर्षभर कांद्याचा बाजारभाव तुलनेत चांगला होता. त्यामुळे लागवडी वाढल्या, असे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने एकूण वर्षभरातील कांदा लागवड आणि उत्पादनाचा अंदाज दिला. पण कांदा बाजाराचा विचार हंगामनिहाय करावा लागतो. कांद्याचे प्रामुख्याने खरीप, लेट खरीप आणि रब्बी असे तीन हंगाम मानले जातात. पण कांदा लागवडी या तीन हंगामात लवकर आणि उशिरा अशा वेगवेगळ्या टप्प्यात होतात. त्यानुसार बाजारात आवकही त्यानुसार होत असते. आतापर्यंत बाजारात खरीप आणि लेट खरिपातील कांद्याची आवक झाली. खरिपातील कांदा आणखी दोन ते तीन आठवडे बाजारात येईल. त्यानंतर रब्बीचा कांदा सुरू होईल. त्यातही रब्बीत लवकर लागवड झालेला माल सुरू होईल. वर्षभरातील कांदा पुरवठ्यात साधारण ३० टक्क्यांच्या दरम्यान खरीप आणि ७० टक्क्यांच्या दरम्यान रब्बी कांद्याचा पुरवठा होतो.
२०२५ मधील आतापर्यंत बाजारातील कांदा आवक मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक राहिली. जानेवारी महिन्यात सुरुवातीच्या दोन आठवड्यांमध्ये कांदा आवक अधिक राहून दर दबावात राहिले. तर जानेवारीच्या मध्यापासून दरात सुधारणा होत गेली. कारण बाजारातील आवक पुन्हा काहीशी कमी झाली होती. दरात नरमाई आल्यानंतर शेतकऱ्यांनी आवक रोखली. त्याचा परिणाम बाजारावर झाल्याचे दिसून आले. मागील महिनाभरात कांद्याचा सरासरी बाजार प्रति क्विंटल २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहिला. अपवाद वगळता काही दिवस मार्केट निश्चितच यापेक्षा कमी दिसले. पण बाजार पुन्हा सरासरी २ हजारांच्या पातळीवर आला.
फेब्रुवारी महिन्याचा विचार केला तर, सुरुवातीपासूनच बाजारातील कांद्याची आवक जानेवारीच्या तुलनेत कमी राहिली. त्यामुळे कांद्याच्या भावात सुधारणा होत गेली. बाजारात लेट खरीप कांदा येत होता. दुसऱ्या आठवड्यातही आवक कमी राहिली आणि कांदा दरात चांगली सुधारणा होऊन दर २ हजार ५०० ते ३ हजारांच्या दरम्यान पोहोचले. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळत होता. मात्र तिसऱ्या आठवड्यात कांदा बाजारातील गणित बदलले. याचा कारण ठरला आगाप रब्बी कांदा. बाजारात लेट खरिपातील मालाची आवक होत असतानाच आगाप रब्बी कांदाही बाजारात येत आहे. सध्या रब्बी कांद्याची आवक खपच कमी आहे. पण रब्बीचा कांदा बाजारात आला हे सेंटिमेंटच बाजारावर जास्त परिणाम करत असल्याचे काही व्यापारी आणि निर्यातदारांनी सांगितले.
रब्बी कांद्याची आवक राज्यातील नाशिक आणि नगर जिल्ह्यातील बाजारांमध्येच दिसली. लासलगाव, निफाड, विंचूर, अहिल्यानगर, लोणंद, नांदगाव, अकोले, पारनेर, कोपरगाव, नामपूर, रामटेक या बाजारांमध्ये रब्बीच्या कांद्याची आवक येत आहे. लेट खरीप आणि रब्बीचा कांदा बाजारात येत असल्याचा परिणाम दरावर दिसत असल्याचे बाजार समित्यांमधील व्यापारी सांगत आहेत. सध्या रब्बीच्या कांद्याची आवक कमीच आहे. मात्र महाशिवरात्रीनंतर बाजारातील आवक वाढण्याचा अंदाज आहे. मात्र रब्बीची आवक वाढत असताना खरिपातील मालाची आवक कमी होत जाणार आहे.
कांदा आवक आणि दर
बाजारातील कांदा आवक पुढील आठवड्यापासून पासून काहीशी सुधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगाप रब्बीचा कांदा बाजारात येईल. रब्बीच्या उत्पादनाविषयी नेमकं चित्र मालाची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर स्पष्ट येईल. पण चालू आठवड्यात बाजारातील आवक आणि दर तुलनेत काहीसे स्थिर राहू शकतात. सध्या बाजारात कांद्याचे दर २ हजार ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील आठवडाभर मार्केटमध्ये १०० ते २०० रुपयांचे चढ-उतार सोडले तर मोठ्या घडामोडींची शक्यता धुसरच आहे.
मार्च महिन्यात रब्बीचा कांदा येणार असला तरी आवकेचा दबाव लगेच वाढण्यासारखी परिस्थिती नाही. पण जर डिसेंबरप्रमाणे बाजारात पूर्ण पक्व न होताच कांद्याची विक्री वाढली तर त्याचा दरावरही परिणाम दिसू शकतो. त्या वेळचे दर पाहता ही शक्यताही नाकारता येत नाही. मार्च महिन्यातही बाजाराचे गणित शेतकऱ्यांच्या कांदा विक्रीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल. त्यामुळे मार्च महिन्यात कांदा आवकेनुसार दरपातळी १५०० ते २२०० रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. बाजारातील आवक आणि सरकारच्या धोरणाचाही परिणाम बाजारावर दिसू शकतो.
रब्बी कांद्याच्या लागवडीत वाढ
देशपातळीवरही रब्बीची कांदा लागवडही यंदा १२ ते १५ टक्क्यांनी वाढल्याचे अंदाज आहे. मागील रब्बी हंगामात देशात १० लाख हेक्टरवर कांदा लागवड होती. मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशात लागवडी अधिक आहेत. महाराष्ट्रातही रब्बीची लागवड १५ टक्क्यांनी वाढल्याचा अंदाज आहे. राज्यात मागील रब्बी हंगामात ४ लाख ६० हेक्टरवर लागवड होती; ती यंदा ५ लाख ३० हजार हेक्टरवर पोचली.
नाशिक, अहिल्यानगर, पुणे या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनीही लागवडी वाढल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘लागवडी वाढल्या आणि हवामानही पिकासाठी अनेक भागात आतापर्यंत पोषक आहे. त्यामुळे यंदा उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. मार्च महिन्यात बाजारातील आवक वाढेल. ज्या शेतकऱ्यांना आर्थिक नड आहे ते माल काढणीनंतर लगेच बाजारात आणतील. पण आवकेचा दबाव एप्रिल महिन्यात जास्त राहू शकते. याचा परिणाम दरावरही दिसेल,’ असे कांदा प्रश्नाचे जाणकार शेतकरी पंडित वाघ यांनी सांगितले.
महत्त्वाच्या राज्यातील कांदा उत्पादनाचा अंदाज (लाख टनांत)
राज्य २४-२५ २३-२४
महाराष्ट्र १२४ ८६
मध्य प्रदेश ४६ ४२
गुजरात १५ २०
बिहार १३ १४
कर्नाटक २२ १६
राज्य २४-२५ २३-२४
तमिळनाडू ६ ४
उत्तर प्रदेश ८ ६
पश्चिम बंगाल ९ ९
राजस्थान १७ १६
आंध्रप्रदेश ६ ५
(स्रोत : केंद्रीय कृषी मंत्रालय, पहिला सुधारित अंदाज)
(लेखक ॲग्रोवन डिजिटलमध्ये मल्टिमीडिया प्रोड्युसर- मार्केट इन्टेलिजन्स आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.