
Market Bulletin :
सोयाबीन दबावातच
सोयाबीनच्या भावावरील दबाव आणखी वाढला. प्रक्रिया प्लांट्सचे सोयाबीन खरेदीचे भाव ४ हजार ४०० ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान होते. सोयाबीनच्या भावात घट झाल्याने शेतकरी पुन्हा अडणीत आले आहेत. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची खरेदी ४ हजार ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान सुरु आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन आणि सोयापेंडच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरुच आहेत. आज सोयाबीन ९.९२ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापूस स्थिर
कापसाच्या भावात पुन्हा चढ उतार सुरु आहेत. सध्या बाजारात येणाऱ्या कापसाची गुणवत्ता चांगली आहे. मागील आठवड्यात कापसाचे भाव काहिसे कमी झाल्यानंतर चालू आठवड्यात देशभारात कापसाच्या सरासरी भावात पुन्हा काहिशी सुधारणा झालेली दिसून येते. बाजारातील आवकही चांगली आहे.
रोज जवळपास १ लाख ८० हजार ते १ लाख ९० हजार गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होत आहे. तर देशातील बाजारात कापसाचा आज सरासरी भाव ६ हजार ९०० ते ७ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
गहू काहिसा सुधारला
सरकारने खुल्या बाजारात गव्हाची विक्री केल्यानंतर गव्हाच्या भावात काहिशी नरमाई आली होती. मात्र बाजारातील आवक कमी असल्याने गहू बाजाराला चांगला आधार आहे. परिणामी गव्हाच्या भावात पुन्हा सुधारणा दिसून आली. गव्हाचे भाव मागील आठवडाभरात पुन्हा १०० ते १५० रुपयांनी वाढले.
दुसरीकडे गव्हाचे भाव चांगले असल्याने गव्हाची पेरणीदेखील वाढत आहे. सध्या गव्हाला बाजारात २ हजार ४०० ते २ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान सरासरी भाव मिळत आहे. गव्हाच्या भावातील तेजी आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कांद्याचा भाव टिकून
देशातील बाजारात कांद्याची आवक खूपच कमी आहे. तर दुसरीकडे कांद्याला उठाव चांगला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव टिकून आहेत. बाजारात खरिप लाल कांद्याची आवक सुरु झाली. मात्र आवकेचा दबाव वाढलेला नाही. यंदा खरिपाच्या लागवडी उशीरा झाल्या. त्यातच पावसाचा पिकाला फटका बसला आहे.
त्यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत आवक कमी आहे. त्यामुळे लाल कांद्याला सरासरी ३ हजार ते ३ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर उन्हाळ कांद्याचा भाव ५ हजारांच्या पुढे आहे. कांदा बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
टोमॅटो काहिसा नरमला
मागील काही दिवसांपासून राज्यातील बाजारांमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे. पावसाळी वातावरण निवळल्यानंतर बाजारात आवक जास्त दिसत आहे. याचा परिणाम टोमॅटोच्या भावावर दिसून आला.
टोमॅटोचा बाजार राज्यात मागील काही दिवसांमध्ये क्विंटलमागे २०० ते ५०० रुपयांनी कमी झाला. टोमॅटोला सध्या बाजारात प्रतिक्विंटल सरासरी २ हजार ते ३ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. पुढील काळात बाजारातील टोमॅटोची आवक आणखी वाढेल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.