Soybean
Soybean Agrowon

Soybean Market: सोयाबीन ५० रुपयांनी वाढले; सोयाबीनचे भाव तीन कारणांमुळे वाढू शकतात 

Market Update : सोयाबीनचा भाव आज ५ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होता. म्हणजेच कालच्या तुलनेत बहुतांशी बाजारांमध्ये सोयाबीनचा भाव क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांनी वाढला होता.

Pune News : तब्बल दोन महिन वाट पाहिल्यानंतर आज सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाली. सोयाबीनचा भाव क्विंटलामागं ५० ते १०० रुपयांनी वाढला होता. सोयाबीनची भाववाढ होण्याला काही महत्वाची कारणं आहेत. तसेच ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादन अंदाजात कपात करण्यात आली आहे.

सुरुवात करूयात भावापासून. सोयाबीनचा भाव आज ५ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होता. म्हणजेच कालच्या तुलनेत बहुतांशी बाजारांमध्ये सोयाबीनचा भाव क्विंटलमागं ५० ते १०० रुपयांनी वाढला होता. तर प्रक्रिया प्लांट्सनीही आपला खरेदीचा भावही ५० ते १०० रुपयांनी वाढवला. प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीनचा खरेदीचा भाव आज ४ हजार ६५० ते ४ हजार ७५० रुपयांच्या दरम्यान काढला होता. 

Soybean
Soybean Market : सोयाबीनला अपेक्षित दर मिळेना; शेतकरी चिंतातुर

सोयाबीनचे भाव वाढण्याला महत्वाचा घटक कारणीभूत ठरला तो तेलाच्या भावातील वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे भाव वाढले. कारण महत्वाच्या इंडोनेशिया आणि मलेशियात एल निनोमुळे पाम उत्पादन कमी झाले. यामुळे मागील दोन महिन्यांपासून पामतेलाचा पुरवठा कमी कमी होत आहे. तर जानेवारीतील उत्पादनातील घट जास्त होती. यापुढील काळातही पामतेलाचे उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. पामतेलाचे भाव वाढल्याने भारताची पामतेल आयातही कमी होत आहे. 

पामतेलाचे भाव वाढल्याने आयातदार सोयातेल आणि सूर्यफुल तेलाची खरेदी करत आहेत. कारण यंदा सोयाबीनचे जागतिक उत्पादन वाढल्याने सोयातेलाचे भाव कमी झालेले आहेत. तर सूर्यफुल तेलही स्वस्त आहे. कच्चे पामतेल आयातीचा दर ९३० डाॅलर प्रतिटन झाला. याउलट सोयातेल आयातीचा भाव ९१५ डाॅलर प्रतिटन आणि सूर्यफुल तेल आयातीचा भाव ९१० डाॅलर प्रतिटन आहे. म्हणजेच देशात पामतेल आयात करणे सोयातेल आणि पामतेलापेक्षा महाग होत आहे. यामुळे सहाजिकच सोयातेल आणि सूर्यफुल तेलाला मागणी वाढली. यामुळे सोयातेलाचेही भाव वाढत आहेत. सोयातेलाला मागणी येत असल्याने गाळपासाठी सोयाबीनलाही मागणी वाढली. याचा परिणाम सोयाबीन भावावर दिसून येत आहे. 

Soybean
Soybean Rate : सोयाबीनला काय दर मिळतोय?

आणखी एक महत्वाचं कारण आहे बाजारातील कमी होत असलेला पुरवठा. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीनच्या भावात मोठी तेजी आली नाही. तसेच बाजारात मोठी तेजी येण्याची शक्यता कमीच असल्याने शेतकऱ्यांनी माल विकला. आता बाजारातील आवक हळूहळू कमी होताना दिसत आहे. आवकेत अजूनही मोठ्या प्रमाणात घट झाली नाही. पण आवकेचे प्रमाम कमी होत आहे. त्यातच तेलासाठी सोयाबीनला मागणी आल्याने भावात सुधारणा दिसून येत आहे. सोयाबीनची आवक आणखी पुढील काही आठवड्यांमध्ये कमी कमी होत जाईल, असे सोयाबीन बाजारातील व्यापारी सांगत आहेत. 

ब्राझीलच्या सोयाबीन पिकाबाबत दोन महत्वाच्या बातम्याही पुढे आल्या. ब्राझीलची सरकारी संस्था असलेल्या कोनाब आणि अमेरिकेच्या कृषी विभागाने म्हणजेच युएसडीएने ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाच्या अंदाजात पुन्हा एकदा कपात केली. कोनाबने म्हणजेच ब्राझीलच्या सरकारी संस्थेने यंदा सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा साडेतीन टक्क्यांनी कमी होणार यावर शिक्कामोर्तब केले. कोनाबने सांगितले यंदा ब्राझीलचे उत्पादन १ हजार ४९४ लाख टन होईल. ब्राझीलच्या अनेक भागात पाऊस कमी आहे. त्यामुळे उत्पादकता कमी राहील, असे या संस्थेचे म्हणणे आहे. 

ब्राझीलमधील उत्पादन कमी झाले तरी जागतिक उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा जास्त राहणार आहे. कारण यंदा अर्जेंटीनातील उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट झाले. चीन, पेरुग्वे आणि इतर देशांमध्येही उत्पादन वाढले. यामुळे सोयाबीनचा जागतिक वापर गेल्यावर्षीपेक्षा जास्त होण्याची शक्यता असूनही शिल्लक साठा मात्र जास्त असेल, असे युएसडीएने म्हटले आहे. 

देशात सोयाबीनचे भाव काहीसे वाढले तरी अपेक्षित भाववाढ झाली नाही. भाववाढीवर देशातील आणखी दोन महत्वाचे घटक परिणाम करत आहेत. त्याचा आढावा आपण पुढच्या व्हिडिओत नक्की घेऊ. कारण यंदा दुष्काळामुळे उत्पादन कमी असले तरी या घटकांमुळे दरावर दबाव आला आहे. तरीही ज्या शेतकऱ्यांना थांबण शक्य आहे त्यांनी सोयाबीनला ५ हजारांच्या दरम्यान टार्गेट ठेवायला हरकत नाही. पण त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com