Washim News : या हंगामात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा तब्बल सहाशे ते आठशे रुपयांनी कमी झाल्यामुळे तसेच सध्या भाववाढीची आशा धूसर झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अनेक शेतकरी याविरुद्ध संताप व्यक्त करीत आहेत. या भागात गेल्या काही वर्षांत सोयाबीन हेच शेतकऱ्यांचे मुख्य पीक झालेले आहे. या पिकावरच शेतकऱ्यांचे वर्षाचे अर्थकारण अवलंबून आहे.
यावर्षी पावसाळा तब्बल एक महिना उशिरा सुरू झाला. त्यानंतरही पाऊस हा अनियमित पडल्यामुळे खरिपाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आली. सोयाबीन एकरी दोन ते चार क्विंटलपर्यंत आले. या उत्पादनात लागवडीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना सोयाबीन पिकामुळे मनस्ताप सहन करावा लागला.
आता सोयाबीनचे भाव वाढत नसल्यामुळे हे सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला आहे. या आठवड्यात बाजार समितीमध्ये सोयाबीन ४००० ते ४४०० दरम्यान विकते आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या वल्गना करणाऱ्या शासनाने बाहेर देशातून आयात होणाऱ्या तेलावरील ३० टक्के असलेली इम्पोर्ट ड्यूटी घेणे बंद केली. त्याचा परिणाम पाम तेल आपल्या देशात आले व सोयाबीनचे भाव पडले, असे व्यापारी सांगत आहेत.
देशातील डीओसीला प्रोत्साहन देण्याऐवजी बाहेर देशातून तेल आयात केल्याचा दुष्परिणाम सोयाबीनच्या भावावर झाला. जाणकाराकडून सोयाबीनचे भाव आणखी कमी होण्याची भीती वर्तविल्या जात आहे. या वर्षी नवीन सोयाबीन बाजारात येताच ५२५० रुपये एवढा भाव मिळाला होता. त्यानंतर सोयाबीनच्या भावात सातत्याने घसरण होत आहे. भाव वाढण्याची आशा धूसर झाल्याने चिंता वाढली.
मागील वर्षी सोयाबीनला सरासरी ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यामुळे या वर्षी त्यापेक्षा जास्त भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. या आठवड्यात सोयाबीनच्या दराने सर्व नीचांकी पातळी ओलांडली आहे.
भाववाढीची शक्यता कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मातीमोल दराने मालाची विक्री करावी लागत आहे. अनेक शेतकऱ्यांनी मागच्या वर्षीची सोयाबीन गोदामांमध्ये ठेवत त्यावर तारण कर्ज घेतले आहे. आता घेतलेल्या कर्जाचे व्याज व गोदाम भाडे, तसेच ऑक्टोबर, नोव्हेंबरच्या तुलनेत भाव कमी झाल्यामुळे हे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.