Pune News : अर्जेंटीनाच्या बहुतांशी भागात मागील दोन आठवड्यांपासून जास्त तापमान आणि कमी पावसाची स्थिती आहे. दोन आठवड्यांपुर्वी अर्जंटीनात विक्रमी उत्पादनाचा अंदाज आला नाही आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव पडले. याचा थेट परिणाम आपल्याही सोयाबीनच्या भावावर झाला. त्यामुळं अर्जेंटीनातील सोयाबीन पिकाबाबत काय काय सुरू आहे ते आपल्यासाठीही महत्वाचं आहे.
मागच्याच आठवड्यात अर्जेंटीनात विक्रमी उत्पादन होईल, असा अंदाज आला आणि सोयाबीनचा बाजार पडला होता. पण अर्जेंटीनातील विक्रमी सोयाबीन उत्पादनाचा अंदाज पावसावर अवलंबून आहे. पाऊस झाला तर ठीक नाहीतर पुन्हा उत्पादनाच्या अंदाजात कपात केली जाईल. पण उत्पादनाच्या या अंदाजात मात्र जगभरातील सोयाबीन उत्पादकांना चांगलाच फटका बसला.
देशात सध्या सोयाबीनचा भाव दबावात आहे. बहुतांशी ठिकाणी सोयाबीन हमीभावापेक्षाही कमी भावात विकले जात आहे. दोन आठवड्यांपुर्वी सोयाबीन ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयाने विकले जात होते. पण अर्जेंटीनातील विक्रमी उत्पादनाची बातमी आली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडचे भाव पडले. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव पडले म्हणून देशातील प्रक्रिया प्लांट्सनीही भाव कमी केले. याचा फटका आधीच दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकऱ्यांना बसला.
फक्त भारतातल्याच नाही तर ब्राझील, अर्जेंटीना आणि अमेरिकेतल्या शेतकऱ्यांच्याही सोयाबीनचे भाव कमी झाले आहेत. ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी तर सोयाबीनचे भाव पाडण्यासाठीच विक्रमी उत्पादनाचे अंदाज दिले जातात, असा आरोप केला. हे आपण कालच्या व्हिडिओत पाहीलच आहे. ब्राझीलच्या उत्पादनाचे अंदाज शेतकऱ्यांना मान्य नाही. आता अर्जेंटीनातही असच काहीसं घडतंय.
अर्जेंटीनच्या ब्यूनस आयर्स एक्सचेंजने ५५० लाख टनांचा उत्पादन अंदाज दिला आणि भाव जास्तच पडला. कारण अर्जेंटीना जागतिक पातळीवर सोयापेंड आणि सोयातेल निर्यातीत आघाडीवर आहे. यामुळे अर्जेंटीनातील हा उत्पादन अंदाज आपल्याही बाजारात मंदी घेऊन आला असं म्हणायला हरकत नाही.
अर्जेंटीनात जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात अनेक भागांमध्ये पाऊस झाला त्यामुळे विक्रमी उत्पादनाचा अंदाज दिला गेला. पण दुसऱ्या पंधरवड्यात मात्र अर्जेंटीनातील बहुतांशी भागात कमी पाऊस आणि तापमान जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी सध्या ४९ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले. मागच्या आठवड्यातही येथे काही ठिकाणी पाऊस पडला. पण हा पाऊस पुरेसा नव्हता. त्यामुळे उष्णता कायम असून पिकावर याचा परिणामही होत आहे.
सध्या अर्जेंटीनातील बहुतांशी भागात ३८ अंश सेल्सिअस ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान आहे. तापमान जास्त असल्याने जमिनितील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पिकाला सध्या पावसाची गरज आहे. कारण येथील सोयाबीन पीक सध्या फुलोऱ्याच्या स्थितीत आहे. तापमान असेच राहीले तर उत्पादकता कमी येऊ शकते, असे येथील शेतकरी सांगत आहेत.
ब्यूनस आयर्स एक्सचेंजने आपला अंदाज दिला तेव्हाही सांगितले होते की हा अंदाज पावसावर अवलंबून आहे. पाऊस कमी पडला तर उत्पादन अंदाजात कपात केली जाईल, असेही सांगितले होते. सध्याची शेतातली परिस्थितीही तशीच आहे. पण या एक्सचेंजने आधीच अंदाज दिला आणि बाजारावर दबाव आणला. आता अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादनाचा पुढचा अंदाज किती येतो? याचीही परिणाम बाजारावर दिसून येईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.