
Sangli News: नैसर्गिक संकटाशी दोन हात करून शेतकऱ्यांनी बेदाणा निर्मिती सुरू केली आहे. यंदा नवीन हंगामाच्या सुरुवातीपासून बेदाण्याला चांगले दर मिळत आहेत. सद्यःस्थितीला बेदाण्याचे दर टिकून असून, गत वर्षीच्या तुलनेत यंदा वेगाने प्रति किलो ६० ते ८० रुपयांनी अधिक आहे. त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बाजारात फेब्रुवारी महिन्यापासून नवीन बेदाण्याची आवक सुरू झाली. सुरुवातीच्या काळामध्ये बेदाण्याची आवक कमी होती. त्यामुळे हंगामाच्या प्रारंभापासून बेदाण्याच्या दरात वाढ झाली आहे. या दरम्यान बेदाण्याच्या प्रतवारीनुसार प्रति किलो ७० रुपयांपासून २२५ रुपये असा दर मिळाला. फेब्रुवारीच्या मध्यापासून सांगली, तासगाव आणि पंढरपूर या बेदाण्याच्या बाजारपेठांमध्ये प्रत्येक सौद्याला साठ टनांपर्यंत बेदाण्याची आवक झाली. या दरम्यान बेदाण्याची मागणी चांगली असल्यामुळे उठावही झाला. त्यामुळे गत महिन्यात पंधरा दिवसांत बेदाण्याला प्रति किलोस २५ रुपयांची वाढ झाली.
सध्या होळीच्या सणानिमित्त बेदाण्याच्या बाजारपेठामध्ये बेदाण्याची आवक वाढू लागली आहे. सांगली आणि तासगाव बाजार समित्यांत अनुक्रमे ६०० टन, तर पंढरपूर बाजार समितीत २५० टन प्रत्येक सौद्याला आवक होत आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून बेदाणा विक्रीची गती वाढेल. गेल्या महिन्याभरापासून बेदाण्याचे दर टिकून आहेत. येत्या १५ ते २० दिवसांनंतर भेटण्याचे दरात वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गत वर्षीपेक्षा यंदा दरात वाढ
गत वर्षी बेदाण्याचे उत्पादन वाढले होते. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासूनच बेदाण्याला अपेक्षित दर नव्हता. त्याचा फटका बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. अपेक्षित दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा विक्री थांबवले होते. गतवर्षीच्या मार्च महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत बेदाण्याला प्रति किलो ८० ते १५० रुपये असा दर होता. मात्र, यंदा नैसर्गिक आपत्तीचा फटका द्राक्ष बागेला बसला. त्यामुळे द्राक्षाचे नुकसान झाल्याने बेदाणा निर्मिती उशिरा सुरू झाली. त्यातच उत्पादन कमी होऊ लागले आहे. यामुळे बेदाण्याचे दर हंगामापासून वाढले आहेत. गत वर्षीच्या तुलनेत यंदा बेदाण्याच्या दरात प्रति किलो ६० ते ८० रुपयांनी अधिक आहे.
बेदाणा दर (प्रति किलो)
हिरवा बेदाणा : १७० ते २५०
पिवळा बेदाणा : १६० ते २००
काळा बेदाणा : ७० ते ११०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.