कापूस आवक घटली
1. पावसामुळं देशातील बाजारात कापूस आवक घटलीय. सध्या गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, पंजाब आणि हरियाना राज्यातील बाजारात कापूस आवक कमी दिसतेय. मात्र आवक कमी असूनही दरात वाढ झालेली नाही. सध्या उत्तर भारतात कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार ते ९ हजार रुपये दर मिळतोय. तर महाराष्ट्रात ७ हजार ते ८ हजार ५०० रुपये आणि दक्षिणेत ७ हजार ते ९ हजार ७०० रुपये दर मिळतोय. उद्योगांकडून कापसाची खरेदी सुरु झाल्यास दरात सुधारणा होऊ शकते. शेतकऱ्यांना यंदा सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
गवारचे दर तेजीत
2. गवारचे दर राज्यात सध्या तेजीत आहेत. राज्यात मागील काही आठवड्यांपासून गवारची आवक कमी होती. त्यातच मागील पंधरवड्यापासून राज्याच्या विविध भागांत पाऊस पडतोय. त्यामुळं इतर भाजीपाला पिकांसह गवार पिकालाही फटका बसला. पिकाची काढणी करता येत नाही. त्यामुळं पुणे, मुंबई, नागपूर आणि नाशिक या बाजार समित्यांमध्ये १५० ते २०० क्विंटलपेक्षाही कमी आवक होतेय. तर इतर बाजारांमधील गवारची आवक २० क्विंटलपेक्षाही कमी होतेय. परिणामी गवारला प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार ५०० रुपये दर मिळतोय. गवारचे हे दर टिकून राहतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
काबुली हरभऱ्याच्या दरात सुधारणा
3. देशात काबुली हरभरा चांगलाच भाव खातोय. देशांतर्गत बाजारात काबुली हरभऱ्याची आवक मर्यादीत आहे. बाजारात मागणीही चांगली आहे. त्यातच निर्यातही जोमात सुरु आहे. आता दिवाळीच्या सणामुळंही काबुली हरभऱ्याला उठाव मिळतोय. त्यामुळं बाजारात काबुली हरभरा दर क्विंटलमागं तब्बल १ हजार रुपयांनी सुधारले. सध्या बाजारात काबुली हरभऱ्याला प्रतिक्विंटल १० हजार ते ११ हजार ७०० रुपये दर मिळतोय. काबुली हरभऱ्याच्या दरातील तेजी कायम राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
टोमॅटो दरातील तेजी कायम
4. देशात पडणाऱ्या पावसामुळं भाजीपाला पिकांच्या लागवडीवर परिणाम होतोय. टोमॅटो लागवडीही पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळं कमी झाल्या. यंदा खरिपात जवळपास २ लाख ५९ हजार हेक्टरवर टोमॅटो लागवड होईल, असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात १ लाख ९२ हजार हेक्टरवरच लागवड झाली, असं सरकारची आकडेवारी सांगते. याचा परिणाम उत्पादनावर होणार आहे. सध्या बाजारातील आवक कमी असल्यानं दर प्रतिक्विंटल ३ हजार ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. टोमॅटोचे दर पुढील काही दिवस टिकून राहतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.
सोयाबीनचे दर वाढतील का?
5. अमेरिकेचा कृषी विभाग अर्थात युएसडीएनं (USDA) यंदा ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन (Soybean Production) वाढेल, असं म्हटलंय. या दोन देशांतील उत्पादन वाढीमुळं सोयाबीनच्या जागतिक पुरवठ्यात (Global Soybean Supply) वाढ होईल, असा युएसडीएचा अंदाज आहे. त्यामुळं सहाजिकच बाजाराचं लक्ष आता ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन पेरणी, पाऊस, पिकाची स्थिती आणि उत्पादनाकडं आहे. या देशांतील सोयाबीन उत्पादनाला ला निना स्थितीचा फटका बसत असतो. ही ला निना स्थिती यंदाही निर्माण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडं अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन घटलंय. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर टिकून आहेत.
तर दुसरीकडे भारतात सोयाबीनचं उत्पादन घटण्याची चिन्हं आहेत. कारण पावसामुळं देशातील सर्वच भागांत सोयाबीनला कमी-अधिक प्रमाणात फटका बसतोय. पीक नुकसानीमुळं सोयाबीन बाजारालाही आधार मिळतोय. तर रूपयाच्या तुलनेत डाॅलर मजबूत असल्यानं निर्यातीसाठी ही बाब फायदेशीर ठरेल. देशातील बाजारात सध्या नव्या सोयाबीनला ४ हजार ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. तर जूनं सोयाबीन ५ हजार ते ५ हजार २०० रुपयाने विकलं जातय. पुढील काळात पिकाची स्थिती काय राहते त्यावरून दर ठरतील. पण सध्या सोयाबीन पिकाचं होणारं नुकसान जास्त आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना सध्या किमान ५ हजार ते ५ हजार ५०० रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन सोयाबीन विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं जाणकारांनी सांगितलं.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.