
Market Bulletin:
तुरीचा भाव दबावात
देशातील बाजारात तुरीची आवक वाढत आहे. आवक वाढल्यानंतर भावावर देखील दबाव वाढला आहे. तुरीचे भाव सध्या हमीभावापेक्षा कमी आहेत. तुरीला यंदा ७ हजार ५५० रुपये हमीभाव सरकारने जाहीर केला. तर बाजारात सध्या तुरीला प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ७०० ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. दुसरीकडे सरकारची हमीभावाने खेरदीही सुरु आहे. त्यामुळे बाजाराला एक आधार आहे. पुढील दीड-दोन महिने बाजारातील तुरीची आवक चांगली राहणार आहे. त्यामुळे दरपातळी या काळात हमीभावाच्या आसपास राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
हरभरा नरमला
देशातील बाजारात हरभरा दर सध्या कमी झाले आहेत. पिवळा वाटाणा आणि हरभऱ्याची वाढती आयात याचा दरावर दबाव आहेच. शिवाय देशातील बाजारात नवा हरभराही येत आहे. आवकेचा दबाव हळूहळू वाढत आहे. त्यामुळे दरपातळी हमीभावाच्या खाली आली. सध्या बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हरभऱ्याची बाजारातील आवकही पुढील दी-दोन महिने चांगली राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरपातळीही दबावातच राहू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
मक्याचा भाव स्थिर
देशात मक्याला यंदा चांगली मागणी आहे. इथेनाॅल, पोल्ट्री आणि स्टार्च उद्योगांकडून चांगला उठाव आहे. मात्र दुसरीकडे बाजारातील आवकही स्थिर आहे. देशात मक्याचा स्टाॅकही चांगला आहे. रब्बीतील मक्याची लगावडही वाढली आहे. या कारणांनी बाजार मागील दोन महिन्यांपासून एका दरपातळीच्या दरम्यान दिसत आहे. आजही मक्याला सरासरी २ हजार १०० ते २ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. मक्याच्या भावात पुढील दोन -तीन आठवडे काहीसे चढ उतार राहू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
सोयाबीनमध्ये नरमाई
देशातील प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खेरदीचे भाव आजही काहीसे कमी केले होते. त्यामुळे बाजार समित्यांमधील भावही काहीसा कमी झाला होता. आज प्रक्रिया प्लांट्सनी सोयाबीन खेरदीचे भाव ४ हजार २५० ते ४ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान काढले होते. तर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला ३ हजार ७०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील सोयाबीनची आवकही स्थिर आहे. नाफेडच्या सोयाबीन विक्रीचीही चर्चा बाजारात सुरु झाली. याचाही परिणाम दरावर दिसत आहे. त्यामुळे सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापसात काहीशी सुधारणा
कापसाचे बाजारभाव आज स्थिर होते. बाजारातील कापसाची आवकही मागील आठवडाभराप्रमाणे सरासरी एक लाख गाठींच्या दरम्यान आहे. आज महाशिरात्रीमुळे अनेक बाजार समित्यांमध्ये व्यवहार बंद आहेत. मात्र खेडा खरेदी आणि जिनिंगच्या पातळीवर खरेदी झाली. आजही कापसाला सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. देशात बाजारातील आवक कमी होत असल्याने दराला काहीसा आधार मिळत आहे. कापसाची आवक मार्च महिन्यातही कमी होईल, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.