कापसाचं नुकसान वाढतंय
1. देशातील बाजारात नव्या कापसाची आवक दिवसेंदिवस वाढतेय. उत्तर भारतात कापूस आवक जास्त आहे. मात्र मागील काही दिवसांपासून महत्वाच्या कापूस उत्पादक पट्ट्यात पाऊस पडतोय. त्यातच कापूस पीक सध्या बोंड फुटण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळं सध्या सुरु असलेल्या पावसानं कापूस पिकाचं नुकसान होतंय. त्यामुळं बाजारातील कापूस आवक गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. सध्या कापसाला ७ हजार ५०० ते १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. मात्र यंदा कापसाला सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो, त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन कापसाची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
कारल्याच्या दरात तेजी
2. राज्यातील बाजारात कारल्याला सध्या चांगला दर मिळतोय. बाजारात आवक कमी असल्यानं दरात तेजी आली आहे. कारल्याची आवक मागील दीड महिन्यापासून मर्यादीत स्वरुपात होतेय. राज्यातील पुणे, मुंबई आणि नागपूर या बाजारांमधील आवक काहीशी अधिक असली तरी इतर बाजार समित्यांमधील आवक मात्र खूपच कमी आहे. तर कारल्याला सध्या २ हजार ५०० ते ४ हजार रुपये सरासरी दर मिळतोय. कारल्याचा हा दर पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
हरभऱ्याचे दर दबावातच
3. दिवाळी अगदी तोंडावर आली तरी हरभरा दरावरील दबाव कायम आहे. आवकेच्या हंगामात हरभरा दर दबावात होते. मात्र दिवाळीच्या काळात हरभरा दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज होता. मात्र नाफेडनं खुल्या बाजारात विक्री सुरु केल्यानंतर हरभरा बाजारावरील दबाव कायम राहिला. सध्या हरभऱ्याला सरासरी ४ हजार ३०० ते ५ हजार रुपये दर मिळतोय. हरभरा बाजारात पुढील काही दिवस हीच दरपातळी कायम राहण्याची शक्यता आहे.
उडदाचे दर टिकून
4. देशात यंदा उडदाची लागवड जवळपास दीड टक्क्यांनी घटली. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पावसाचा फटका उडीद पिकाला बसला होता. त्यामुळं यंदा उडदाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र दुसरीकडं उडदाची मागणी टिकून आहे. तर आयात मालाचे दरही तेजीत आहेत. त्यामुळे उडदाचे दर वधारले आहेत. सध्या बाजारात उडदाला ६ हजार ३०० ते ७ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळतोय. उडदाचा हा दर टिकून राहिल, असा अंदाज बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर वाढले?
5. जागतिक पातळीवर सध्या भारत आणि अमेरिकेतील नवं सोयाबीन बाजारात (Soybean Arrival) येतंय. मागील हंगामात ब्राझील आणि अर्जेंटीनात सोयाबीन उत्पादन (Soybean Production) कमी झालं होतं. त्यातच खाद्यतेलाच्या दरात (Edible Oil Rate) तेजी आली होती. त्यामुळं सोयाबीनचे दर तेजीत होते. यंदा अमेरिकेला दुष्काळाचा (America Drought) फटका बसतोय. त्याचा परिणाम सोयाबीन उत्पादकतेवर होतेय. तर दुसरीकडं चीननं मागील दोन महिन्यांमध्ये अमेरिकेकडून सोयाबीन खरेदी वाढवलीये. मागील हंगामात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ब्राझीलमधून जास्त सोयाबीन खरेदी केलं होतं. मात्र यंदा चीन अमेरिकेतून खरेदी वाढत असल्याचं दिसतंय. मात्र चीनची एकूण सोयाबीन आयात अद्यापही कमीच आहे.
तर दुसरीकडं आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दर टिकून आहेत. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे १३.६५ डाॅलर प्रतिबुशेल्सने झाले. शुक्रवारी सोयाबीनचे दर काहीसे सुधारले होते. देशातील बाजाराचा विचार करता आवक हळूहळू वाढतेय. पुढील दोन आठवड्यांत सोयाबीन आवक आणखी वाढेल. सध्या सोयाबीनला ४ हजार ६०० ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. सध्या नव्या सोयाबीनमध्ये ओलावा अधिक असल्यानं दर हमीभावादरम्यान आहेत. तर जुन्या सोयाबीनला सरासरी ५ हजार रुपये दर मिळतोय. नव्या सोयाबीनमधील ओलावा कमी झाल्यानंतर यंदाच्या हंगामात सरासरी ५ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.